एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत  

लाखो रुपये उकळणा-या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला नेरुळ पोलिसांनी केली अटक

नवी मुंबई : एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन गरजु विदयार्थी व पालकांकडुन लाखो रुपये उकळणा-या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजु विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडुन कोटÎवधी रुपये उकळल्याचे तपासात आढळुन आले आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबई, रायगड, भंडारा या भागात केलेले फसवणुकीचे 5 गुन्हे उघडकीस आले असले तरी या टोळीविरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी अर्ज दाखल आहेत. त्यामुळे या टोळीने केलेले अशाच प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी व्यक्त केली.   

पोलिसांनी अटक केलेल्या टोळीमध्ये सौरभ कृष्णा उपाध्याय (39), इफ्तेखार अहमद मुस्ताक अहमद उर्फ अभय सिंग उर्फ गौतम (31), लव अवधकिशोर गुफ्ता (35), आकिब नौशाद अहमद (28) आणि अभिजात्य राधेशाम सिंग (41) अशी या पाच जणांचा समावेश आहे. या टोळीने काही महिन्यापुर्वी खोटे नाव धारण करुन छत्तीसगड येथील विनोदनी यादव यांच्या मुलीला नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल युनिवर्सिटीमध्ये एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखविले होते. तसेच त्यांच्याकडुन डोनेशन आणि फिच्या नावाखाली 33 लाख 50 हजार रुपये उकळून त्यांना डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल युनिवर्सिटीचे बनावट ऍडमिशन लेटर देवुन त्यांची फसवणुक केली होती.  

नेरुळ पोलीस ठाण्यात या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर परिमंडळ - 1 चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांच्या सूचनेनुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत व  गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे व सत्यवान बिले त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने या गुन्हयातील आरोपींबाबत माहिती मिळविली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाशी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन अटक केली. या टोळीने आतापर्यंत मुंबईतील ग्रेट वैदयकीय महाविद्यालय (सर जेजे), सायन वैदयकीय महाविद्यालय, नायर वैदयकीय महाविद्यालय, अलीबाग शासकीय वैदयकीय महाविद्यालय, नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील वैदयकीय महाविद्यालय, तेरणा वैदयकीय महाविदयालय, एमजीएम वैदयकीय महाविदयालय या नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयासह इतर काही वैदयकीय महाविदयालयांत ऍडमिशन मिळवुन देण्याच्या बहाण्याने 3 कोटी 30 लाखांची रक्कम उकळल्याचे तपासात आढळुन आल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिली.  

नागरिकानी एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याच्या कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये, जर कुणाची अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी. त्याबाबत तत्काळ कारवाई करण्यात येईल. असे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महावितरणचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात