महावितरणचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

कंत्राटदाराकडून 15 हजार रुपये लाच घेताना महावितरणचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता रंगेहाथ अटक 

नवी मुंबई  : महावितरणच्या बिल प्रिंटींग व बिल वितरणाच्या कामाच्या बिलावर समाधानकारक असा शेरा मारून सदर बिल मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी कंत्राटदाराकडे  20 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वाशी उपविभाग कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता रविंद्र केशवराव जाधव यांना ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदार गणेश शिंदे हे मनाली इंटरप्रायझेस कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. मनाली इंटरप्रायझेसमध्ये महावितरणच्या वाशी कार्यालयांच्या हद्दीतील ग्राहकांचे लाईट मिटर रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वितरणाचे कामकाज चालते. डिसेंबर 2022 मध्ये मनाली इंटरप्रायझेस कंपनीने वाशी उप विभागातील मिटर रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वितरणाचे काम पूर्ण करून केलेल्या कामाचे एकुण 7 लाख 21 हजार रूपयाचे बिल एम.एस.ई.डी.सी.एल.च्या वाशी येथील उप विभागीय कार्यालयात गत आठवड्यात सादर केले होते.

 त्यांनतर गणेश शिंदे यांनी महावितरणच्या वाशी उपविभागीय कार्यालयात जाऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र जाधव यांची भेट घेतली होती. तसेच मनाली इंटरप्रायझेसच्या बिलावर शेरा मारून मंजुरीसाठी पुढे पाठविण्याबाबत विनंती केली होती. त्यावेळी रविंद्र जाधव यांनी सदरच्या बिलावर समाधानकारक शेरा मारून मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी शिंदे यांच्याकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अन्यथा त्यांचे बिल मंजुरीसाठी पुढे जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे गणेश शिंदे यांनी ठाणे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर गणेश शिंदे यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या सूचनेनुसार रवींद्र जाधव यांची भेट घेऊन तडजोड केली असता, जाधव यांनी 15 हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एम.एस.ई.डी.सी.एल.च्या वाशी येथील उप विभागीय कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी रविंद्र जाधव यांनी गणेश जाधव याच्याकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांनतर त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

उत्तरप्रदेश येथील हत्या प्रकरणातील चार फरार आरोपी अटकेत