सानपाडा सेक्टर-5 भागात राहणा-या एका विवाहितेने पती व सासुच्या छळाला कंटाळुन आत्महत्या

पती व सासुच्या छळाला कंटाळुन सानपाडा येथे विवाहितेची आत्महत्या

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर-5 भागात राहणा-या एका विवाहितेने पती व सासुच्या छळाला कंटाळुन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणी मृत विवाहितेचा पती व सासु या दोघांविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

या घटनेतील मृत विवाहितेचे नाव श्रद्धा सोनावले (28) असे असून ती पती अनमोल सोनावले, 8 वर्षाचा मुलगा कुशाल व सासु कल्पना सोनावले यांच्यासह सानपाडा सेक्टर-5 मध्ये अप्पा कॉलनीत राहण्यास होती. श्रद्धा व अनमोल हे दोघे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर या दोघांनी जानेवारी 2014 मध्ये प्रेम विवाह केला होता. लग्नानंतरचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर श्रद्धाचा पतीने व सासुने तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती. घरातील किरकोळ कारणावरुन श्रद्धा सोबत वाद घालुन तिला घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करुन, मारहाण करणे असे प्रकार तिच्या पती व सासुकडुन सुरु होते. याबाबत श्रद्धा आपल्या आई वडीलांना नेहमी सांगत होती. श्रद्धाचे आई-वडील तिची समजुत काढुन त्यांच्यात मध्यस्थी करत होते.  

चार वर्षापुर्वी श्रद्धाने पती व सासुच्या त्रासाला कंटाळुन स्वत:चे हात कापुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर देखील श्रद्धाचा तिच्या पती सासुकडुन छळ सुरुच होता. वर्षभरापुर्वी श्रद्धाचे आई वडील व नातेवाईकांनी तिचा पती व सासु यांची समजुत काढली होती. मात्र त्यानंतर देखील श्रद्धाला मारहाण करणे, दमदाटी करुन मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरुच होते. अखेर सततच्या या छळाला कंटाळुन श्रद्धाने गत 24 डिसेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनेनंतर सानपाडा पोलिसांनी श्रद्धाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन श्रद्धाचा पती अनमोल सोनावले व सासु कल्पना सोनावले या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांशी संगनमत करुन फेरीवाले आणि व्यावसायिकांना अभय