अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांशी संगनमत करुन फेरीवाले आणि व्यावसायिकांना अभय

अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिकांना अधिकाऱ्यांचेच अभय

नवी मुंबई ः विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये  लक्षवेधी सूचना क्रमांक ५२७१०३१ मांडून त्यानुसार वाशी येथील सिडको निर्मित इमारतींमध्ये अनधिकृतरित्या सुरु असलेल्या व्यवसायांची लक्तरे वेशीवर टांगून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. मात्र, असे असूनही वाशी विभाग कार्यालयातील विभाग प्रमुख आणि अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी फेरीवाल्यांशी संगनमत करुन येथील अनधिकृत फेरीवाले आणि व्यावसायिकांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे.

वाशी, सेक्टर-९, १०, १, २, ३, ४ येथे ‘सिडको'ने सुमारे ४० वर्षांपूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्पउत्पन्न गट, मध्यम गट, उच्च उत्पन्न गट यांच्याकरिता सदनिका बांधलेल्या आहेत. सदर सदनिका रहिवासी वापराकरिता असताना देखील अनेकांनी तळ मजला, पहिल्या मजल्यावरील जागा रहिवाशी वापराऐवजी किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, हॉटेल्स, सलून-ब्युटी पार्लर, बँक एटीएम, मिठाईची दुकाने, दुध डेअरी, भाजीपाला विक्री, वाहनांचे टायर विक्री-दुरुस्ती आदिंसाठी बेकायदेशीररित्या भाडे करारावर दिलेली आहे किंवा संबंधित स्वतः त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाकडून तात्पुरती थातुरमातुर कारवाई केली जाते. मात्र, नंतर जैसे थे प्रकार तसाच सुरु आहे.

वाशी, सेक्टर -१० येथे सिडको निर्मित  एफ टाईप रेन्बो आणि इतर  सोसायटीच्या इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे असताना देखील तेथील सोसायटीच्या अंतर्गत आणि बाह्य जागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान थाटलेले आहे. महापालिकेने याठिकाणी पे ॲन्ड पार्क करिता नियोजन केलेले  असताना देखील सदर ठिकाणची जागा फेरीवाले बिनधास्तपणे वापरत आहेत. महापालिका आयुक्तांच्या वैयवतीक मोबाईल क्रमांकावर बँक ऑफ बडोदा समोरील पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे फोटो पाठविल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने सदर जागेवरील बाकडे हटवले गेले. यानंतर देखील पुन्हा फेरीवाले त्याठिकाणी हजर झालेले आहेत.

एफ टाईप रेनबो इमारत ४० वर्षे जुनी असून तिची दुरावस्था झालेली आहे. तरी देखील इमारतीला लिपट बसवण्यात येत आहेत. वाशी विभाग कार्यालयाने वाशी-कोपरखैरणे मुख्य रस्त्यालगत असलेल्या सेक्टर-९ आणि १० मधील पदपथावर फेरीवाले बसू नयेत म्हणून सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत. सदर सुरक्षा रक्षकांना देखील येथील फेरीवाल्यांनी मारहाण केल्याच्या घटना याआधी घडलेल्या आहेत. शनिवार-रविवार सायंकाळी तर या पदपथाला आठवडा बाजाराचे स्वरुप आलेले असते. नागरिकांना तर चालण्यासाठी जागा शिल्लक नसते. त्यामुळे यावेळी सुरक्षा रक्षक कुठे गायब झालेले असतात? असे प्रश्नचिन्ह आहे.  

महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनात वाशी विभागातील अनधिकृत व्यवसाय आणि फेरीवाल्यांच्या प्रश्नावर विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी उपस्थित करुन येथील अनधिकृत व्यवसायाची जंत्री मांडून त्याची लक्तरे वेशीवर टांगली. असे असताना देखील वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी ढीम्मपणे त्याला अभय देताना दिसून येत आहेत. याआधीच्या आयुक्तांनी नेरुळ विभागात रस्त्याच्या कडेला गॅरेजवाले व्यवसाय करत असल्याचे आढळून येताच तेथील विभाग अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. मात्र, विभाग विभाग कार्यालय त्यातून काहीही बोध घेताना दिसून येत नाही किंवा त्यांना आयुक्तांचा देखील धाक राहिलेला नाही, असे दिसून येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या विरोधात जुहुगाव ग्रामस्थ आक्रमक