सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून ज्येष्ठ नागरिकांकडून उकळले 2 लाख 15 हजार रुपये

नवी मुंबई : सायबर चोरट्यांच्या टोळीने पनवेलमध्ये राहणाऱ्या एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून त्याद्वारे तयार करण्यात आलेले त्यांचे अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्यांच्या टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

 या प्रकरणातील 68 वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरीक पत्नीसह पनवेल मध्ये राहण्यास असून त्यांची दोन्ही मुले परदेशामध्ये राहण्यास आहेत. गत जुन महिन्यात सदर ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह लंडन येथे राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्या कालावधीत या ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्सअपवर निशा शर्मा नावाच्या महिलेने अश्लिल व नग्न फोटो पाठवले होते. त्यानंतर सदर महिलेने त्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकाला व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क साधुन स्व:ताचे अश्लिल व नग्न फोटो दाखवुन त्यांना सुद्धा तसे करण्यास भाग पाडले होते.

त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ नागरिक भारतामध्ये आल्यानंतर निशा अग्रवाल नावाच्या महिलेने त्यांच्या व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल करून  स्व:ताचे नग्न फोटो दाखवुन त्यांना त्याप्रमाणे करण्यास सांगितले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने भावनेच्या आहारी जावुन सदर महिलेने सांगितल्यानुसार कृत्य केले होते.

 मात्र सदर महिलेने या ज्येष्ठ नागरिकाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सदरचा व्हिडीओ ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअपवर पाठवुन दिला. त्यानंतर त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. अन्यथा सदरचे व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने घाबरून सदरचे व्हिडीओ डिलीट केले.

मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सदर टोळीतील सायबर चोरट्यांने अहमदनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून या ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधून त्यांचे अश्लिल व्हिडिओ यु ट्युबवर अपलोड झाल्याचे सांगितले. तसेच यु टयुबचे राहुल शर्मा यांचे पत्र त्यांच्याकडे आल्याचे सांगून त्यांचे व्हिडीओ त्वरीत डिलीट करण्यासाठी यु टयुबच्या राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची भीती दाखवली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने घाबरून राहुल शर्मा याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने सदरचे अश्लिल व्हिडीओ डिलीट करण्यासाठी  21,999 भरण्यास सांगितले.

त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांने पैसे पाठविल्यानंतर दुसरा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी पुन्हा 42,999  पाठविण्यास सांगितले. ती रक्कम सुद्धा ज्येष्ठ नागरिकांने पाठविली.  अशा प्रकारे सदर टोळीने ज्येष्ठ नागरीकाला धमकावून त्यांच्याकडून एकूण 2 लाख 15 हजार रुपये उकळले. मात्र त्यानंतर देखील सदर टोळीने वेगवेगळी करणे सांगुन आणखी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यानंतर आपली फसवणुक होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सदर प्रकारची माहिती आपल्या पत्नीला देऊन सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे.   

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाळू माफियांविरोधात धडक कारवाई