फॅमिली शेतकरी

शहरी जीवनात विषमुक्त अन्नाकरिता गच्चीवरील शेती अर्थात टेरेस गार्डन

आपण मागील लेखात ‘फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली शेतकरी का असावा याबद्दल माहिती घेतली. पण, सर्वानाच काही असे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी उपलब्ध होतील असे नाही. कारण नैसर्गिक शेती करणारे फार कमी शेतकरी महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आपणा सर्वांना नैसर्गिकरीत्या पिकवलेला भाजीपाला, फळभाज्या आपल्याला दररोज मिळणे शक्य नाही. यासाठी एक अभिनव संकल्पना पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी मांडली आहे.

नैसर्गिक जीवनशैली कशी असावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन गुरुजींनी केले आहे. रासायनिक शेतीत युरिया टाकला जातो. हा घातक युरिया पुढे विविध प्रक्रियेद्वारे फळ, भाजी, धान्यात जाऊन त्याद्वारे आपल्या पोटात जातो. घरी भाजीपाला आणून धुतला तरी त्यातील विषारी घटक नष्ट होत नाही. यामुळे स्त्रियांमध्ये हार्मोनल इन्बॅलन्सची समस्या जाणवते. रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे मानवासह पशुपक्षी, जिवाणू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देशात रासायनिक, सेंद्रिय शेती दिवसेंदिवस हानिकारक होत असून, त्यामुळे मातीतील उपयुक्त जीवाणू नष्ट होत आहेत. यासाठी नैसर्गिक शेती करण्याचा पर्याय उपलब्ध असून, यानुसार निरोगी शरीर बनण्यास मदत होते. यासाठीच ही टेरेस फार्मिंग संकल्पना जन्माला आली आहे. ज्यांना हे नैसर्गिक शेतीचे महत्व आपल्या आरोग्यासाठी पटले आहे. ज्यांच्याकडे आपल्या सोसायटीत किंवा टेरेसवर मोकळी जागा आहे आणि ते करण्याची आवड आहे. त्यांना तर ही संकल्पना म्हणजे जणू एक वरदानच आहे.

गच्चीवरील शेती का हवी?

एक हजार चौरस फुटांवर चार माणसांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला नैसर्गिकरित्या छतावर किंवा सोसायटीच्या मोकळ्या जागेत पिकविता येणे शक्य आहे. एक हजार चौरस फूट जागा दिवसातून साडेबारा किलो कॅलरी सौरऊर्जा देते. यातून रोज दीड ते दोन किलो अन्नधान्य आणि पाच ते सहा किलो फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ शकते. पालेभाज्यांपासून ते फळभाज्या आणि फळांसह वेलीवर येणाऱ्या भाज्यांचेही उत्पादन घेणे शक्य आहे. सध्या होणाऱ्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पार्किंग, प्रदुषण, रसायने आणि रासायनिक खतांमुळे घसरणारा जमिनीचा पोत पाहता भविष्यात टेरेस गार्डन वा छतावरील शेती हाच पर्याय राहणार आहे. विविध घातक रसायनांमुळे शहरातील नाले, तळी प्रदुषित होत आहेत. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या बाजूच्या मोकळ्या जमिनींवर पिकवला जाणारा भाजी पाला हा गटाराच्या पाण्यावर केला जातो. याकडे रेल्वे प्रशासन, स्थानिक प्राधिकरणे यांनी पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. आणि त्याच भाज्या जवळच्या भाजी मार्केटमध्ये त्या ताजी भाजी म्हणून विकावयास येतात. त्यामुळे रोज सर्वसामान्यांच्या ताटात येणाऱ्या भाज्यांपासून ते अन्नधान्यापर्यंत सगळेच विषयुक्त आहे. या विषयुक्त खाद्यपदार्थांमुळे पिढ्यांमधील रोग प्रतिकारशक्ती नष्ट होऊन शरीर आजारांना, रोगांना बळी पडत आहे. या पिढ्या जगवायच्या असतील तर रसायनांमुळे मरणयातना भोगत असलेल्या शेतजमिनीला आधी वाचविले पाहिजे. खते, रासायनिक घटक असलेल्या फवारण्या शेती उद्ध्‌वस्त करणाऱ्या किटकांना मारतात, हा दावाच मुळात खोटा आहे. जमीन ही अन्नद्रव्यांनी समृद्ध आहे. जमिनीतले अनंतकोटी जीवाणू या घटकांचे पोषण करतात. मुळांमार्फत हे अन्नघटक पिकांना जातात. रसायनांमुळे तेच नष्ट होतात आणि रासायनिक पदार्थ अन्नाद्वारे पोटात जातात. त्यामुळे ताटातले अन्न विषयुक्त आहे. यामुळेच आपल्या कुटुंबाला विविध रोगांना सामोरे जावे लागते. यामुळे आपण आता जागृत झालं पाहिजे म्हणूनच ही टेरेस फार्मिंग संकल्पना जन्माला आली आहे.

कशी करावी गच्चीवरील शेती?

गच्चीवरील बागेची मशागत ही एक खूप आनंददायी गोष्ट असते. बागेतील भाजीपाला, फुलझाडे याबरोबर अनेक वनस्पती त्याबरोबर म्हणजे तणे उगवत असतात. ती उपटून पुन्हा मातीत टाकावीत आणि यातील काही भाज्या म्हणून खाताही येतात. भाजीपाल्याची पिवळी पडलेली पाने तोडून टाकावीत. पाणी टाकताना उघड्या पडलेल्या मुळावर पुन्हा माती टाकणे. अशी आठवड्यातून एकदा दहा पंधरा मिनिटांची मशागत ही बागेच्या आणि आपल्या आरोग्यालाही लाभदायक असते. आता शहरीकरणाच्या वाढत्या रेट्याबरोबर जसा परसबाग हा शब्द अडगळीत गेला आहे तसा एक नवीन शब्दही वापरत येत आहे तो म्हणजे टेरेस गार्डन किंवा गच्चीवरील बाग. टेरेस गार्डन हा शब्द आणि संकल्पना म्हणून आज ब-यापैकी सर्वांनाच ओळखीची झाली आहे. काही लोक एकत्र येऊन नियमित प्रत्यक्ष भेटतात; तर काहींचे व्हाट्‌सॲप ग्रुप्स करुन खूप सक्रियपणे नव्याने टेरेस गार्डनिंग करणा-यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडील विचारांची रोपांची, बीयांची देवाणघेवाण करतात. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. हैद्राबाद आणि चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणत टेरेस गार्डन केले जाते असे माझ्या वाचनात आलेे आहे. आता पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा विविध मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या ठिकाणी टेरेस गार्डनिंग ही संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे.

गच्चीवरील शेती-बागकामाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ कोणते?

टेरेस गार्डनिंग किंवा बागकाम केले की मानसिक ताणतणाव कमी होतात. अनेक डॅावटर तसेच नैसर्गिक उपचार तज्ञ बागकामाचा सल्ला देतात. दैनंदिन जीवनातील ओढाताण, दडपण, वाढत्या वयात स्मृतिभ्रंश आणि अनेक प्रकारचे मानसिक आजार यावर बागकाम ही एक चांगली उपाययोजना ठरू शकते. आपल्या घरात किंवा टेरेसवर असलेल्या एक दोन कुंड्यांमधील तण काढणे, मातीची मशागत करणे यामधून सकाळी संध्याकाळी ताजेतवाने वाटायला लागते. सध्याच्या डिजिटल जगात आपण तासनतास मोबाईल, टॅब, लॅपटपवर घालवतो. त्यातून डोळ्यांची जळजळ, डोळ्यांचे विकार तसेच डोकेदुखी, जागरणामुळे होणारे आजार असे अनेक प्रकार होतात. मग थोडावेळ ब्रेक घेऊन गच्चीवरील बागेत, टेरेसवर किंवा सोसायटीच्या बागेत थोडा फेरफटका, थोडी मशागत केली तर डोळ्यांवरील ताण कमी होतो. दिवसाची सुरुवात आपण जितकी हिरवळ पाहतो किंवा हिरवळीवर चालण्यात वेळ घालवतो तितका आपला दिवस चांगला, आनंदी जातो हे अनेक संशोधनातूनही सिध्द झाले आहे. त्यामुळे घरी गॅलरीत किंवा गच्चीवर फुलझाडे व भाजीपाला यांची बाग करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ठाण्यातील काही सोसायट्यांनी असे उपक्रम चालू केले आहेत. आपल्या घरातील ओला व सुका कचरा, झाडाचा पाला पाचोळ एकत्र करुन तो एका कुंडीत कुजवतात त्याचे चांगले नैसर्गिक खत तयार करतात ते वेळोवेळी आपल्या घरातील बागेत किंवा वा सोसायटीच्या बागेत वापरतात.

 (उर्वरित पुढील लेखात)

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी