तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या

किरकोळ कारणावरून दिघा येथे तरुणाची हत्या

नवी मुंबई : ताडी पिताना मोठ्याने बोलण्यावरून झालेल्या किरकोळ कारणावरून सोनु पांडे (25) या तरुणाने राज शरद उतेकर (20) या तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना दिघा आनंद नगर मधील ताडी माडी विक्री केंद्रात गत बुधवारी रात्री घडली. या घटनेनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सोनु पांडे याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

या घटनेतील मृत राज उतेकर व त्याची हत्या करणारा आरोपी सोनु पांडे हे दोघेही दिघा परिसरात राहण्यास असून, दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. गत बुधवारी रात्री राज उतेकर हा त्याचे मित्र कल्पेश पाटील व राजु सुर्यवंशी यांच्या सोबत दिघा आनंद नगर येथील ताडीमाडी विक्री केंद्रात ताडी पिण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी सोनु पांडे हा त्याच्या काही मित्रांसोबत त्याठिकाणी गेला होता.यावेळी सोनु पांडे हा ताडी केंद्रातील काउन्टरवर पैसे मागून तेथील टेबलवर ताडी पिण्यासाठी बसला. 

यावेळी राज उतेकर हा मोठमोठ्याने आपल्या मित्रांसोबत बोलत असल्याने सोनु पांडे याने त्याला कमी आवाजात बोलण्यास सांगितले. त्यामुळे राज याने उलट त्याला तू काय करणार अशी विचारणा केली. या गोष्टीचा सोनु पांडे याला राग आल्याने त्याने राज याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राजच्या मित्रांनी सोनु पांडे याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनु पांडे याने त्यांना ढकलून राज उतेकर याला 10 ते 15 मिनटे लाथाबुक्यांनी, छातीवर, पोटावर बेदम मारहाण केली. त्यामुळे राज उतेकर बेशुध्द होवुन खाली पडला.त्यानंतर त्याने राजला सोडल्यानंतर राजच्या मित्रांनी त्याला कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सोनु पांडे याला ताब्यात घेऊन अटक केली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

इंटरनेट बार ॲण्ड रेस्टोरन्टवर मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास छापा