कोपरखैरणे सेक्टर-23 मध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या,

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर -15 मध्ये राहणाऱ्या साहिल शांताराम गोळे (17) या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून तसेच तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साहिलचा मृतदेह कोपरखैरणे, सेक्टर-23 मधील भुमीपुत्र गार्डन लगत आढळुन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोपरखैरणे पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकाऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील मृत साहिल गोळे हा कोपरखैरणे सेक्टर-15 मध्ये आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासह राहत होता. तसेच तो कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 12 चे शिक्षण घेत होता. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी साहिल हा काही दिवसांपूर्वीच चॉकलेट कंपनीत कामाला लागला होता. त्यासाठी तो दिवसा कॉलेज आणि रात्रपाळीवर कामाला जात होता. मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास साहिल कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र रात्रीच अज्ञात मारेकऱ्यांनी कोपरखैरणे सेक्टर-23 मधील भुमीपुत्र गार्डनमध्ये सहीलचा चेहरा दगडाने ठेचुन तसेच त्याच्या ओंठावर व पोटावर तीक्ष्ण हत्याराने भोसकुन त्याची हत्या केली.

बुधवारी सकाळी कोपरखैरणे सेक्टर-23 मधील भुमीपुत्र गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना सहिलचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसाना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन साहीलचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात साहिलची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकाऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दहशतवाद विरोधी पथकाची पनवेलमध्ये कारवाई