दहशतवाद विरोधी पथकाची पनवेलमध्ये कारवाई  

नवी मुंबई : केन्द्र शासनाने बंदी घातलेल्या पॉफ्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर देखील पनवेलमध्ये मिटींग घेऊन आपल्या कारवायांना सुरुवात केल्याने दहशतवाद विरोधी पथकाने पनवेलमध्ये कारवाई करत पीएफआय संघटनेचा स्टेट एक्सपान्शन कमिटी पनवेलचा सदस्य व पनवेलचा पीएफआय सेक्रेटरी तसेच दोन कार्यकर्ते या चौघांना अटक केली आहे.  

केन्द्र शासनाने पॉफ्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर 27 सफ्टेंबर 2022 रोजी अधिसुचना काढून बंदी घातली आहे. त्यानंतर देखील पॉफ्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे पनवेल भागातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते पनवेलमध्ये मिटींग घेऊन आपल्या कारवायांना पुन्हा सुरुवात केल्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने बुधवारी पीएफआय संघटनेचा स्टेट एक्सपान्शन कमिटी पनवेलचा सदस्य व पनवेलचा पीएफआयचा सेक्रेटरी तसेच पीएफआयचे पनवेल मधील दोन कार्यकर्ते या चौघांना अटक केली आहे. गुरुवारी या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघांविरोधात मुंबईतील काळाचौकी येथील दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाण्यात यासंदर्भात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 चे कलम 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दहशतवाद विरोधी पथकाकडुन सदर गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मित्राच्या मृत्यूस कारणीभुत ठरला मित्र