ज्यादा पैशाच्या आमिषाने खाजगी बस चालकाकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक

वाशी ः महाराष्ट्र राज्यात खाजगी आणि स्कूल बसेसना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे खासगी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर  आला आहे. या पार्श्वभूमिवर वाशी (नवी मुंबई) आरटीओ कार्यालय सतर्क झाले असून, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून अनधिकृतपणे जादा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा फार्स आवळण्यात आला आहे. गेल्या २ दिवसांमध्ये खाजगी प्रवाशी बसमधून अनधिकृतपणे जादा मालवाहतूक करणाऱ्या १८ बसेसवर कारवाई करत त्यांच्याकडून ६० हजार रुपये दंड वाशी आरटीओ कार्यालय द्वारे वसूल करण्यात आला आहे.

ज्यादा पैशाच्या आमिषाने राज्यात खाजगी बस चालकाकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त प्रवासी भरुन वाहतूक केली जात आहे. अलिकडेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या बस अपघातात निष्पाप १२ जणांचा बळी गेला. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे खासगी बस वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अनेकदा काही खासगी बसेस मधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यावसायिक मालवाहतूक देखील केली जाते.

खाजगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी आहेत. मालवाहतुकीसाठी खाजगी बसेसचा वापर करणे कायद्याच्या चौकटीत नसून, खाजगी प्रवाशी बसमधून अनधिकृतरित्या मालवाहतूक केली जाते. या पार्श्वभूमिवर वाशी आरटीओ कार्यालय सतर्क झाले असून, खाजगी प्रवाशी बसमधून अनधिकृतरित्या मालवाहतूक करणाऱ्या बसेसवर वाशी आरटीओ कार्यालय द्वारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाशी आरटीओ कार्यालयाने केलेल्या तपासणीत मागील दोन दिवसांत प्रवासी कमी तर मालवाहतूक जास्त करणाऱ्या, वाहन विमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या १८ खाजगी बस दोषी आढळल्या आल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या बसची संख्या अधिक आहे. त्यामुळे या बसवर मोटार वाहन कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करुन ६० हजार दंड वाशी आरटीओ कार्यालयाने वसूल केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

हद्दपार केलेल्या एम.के.मढवी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल