नवीन पनवेल व सुकापुर भागातील दोन घरे फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास

नवी मुंबई : घरफोडया करणा-या चोरटयानी गणपतीसाठी बाहेरगावी गेलेल्या नवीन पनवेल व सुकापुर भागातील दोन घरे फोडून त्यातील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.   

नवीन पनवेल सेक्टर-12 मधील स्वप्नपूर्ती  रो-हाऊसमध्ये राहणारा राहुल क्षिरसागर (31) हा गत 2 सप्टेंबर रोजी त्याच्या सास-याच्या मुळ गावी रोहा येथे कुटुंबासह गणेशोत्सवसाठी गेला होता. यादरम्यान त्याचे घर बंद असल्याने चोरटयाने त्यांच्या घराची कडी व लॅच तोडून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी राहुल आपल्या कुटुंबासह घरी परतला असता, त्याच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्याच्या घरातील सर्व दागिने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घरफोडी प्रमाणेच सुकापुर भागात देखील चोरटयानी घरफोडी करुन 60 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस  आले आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी या दोन्ही घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अधिकाऱ्यांची टोलवा-टोलवी; खारफुटीवरील भरावाकडे दुर्लक्ष