सीवूड्‌स मधील आश्रमशाळेतील ३ मुलींवर लैंगिक अत्याचार  

मुलींचे लैंगिक शोषण करणारा पास्टर पोलिसांच्या ताब्यात  


नवी मुंबई ः ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने ५ ऑगस्ट रोजी कारवाई केलेल्या सीवुडस्‌, सेवटर-४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्च मधील पास्टरने (केअरटेकर) चर्चमध्ये सुरु असलेल्या आश्रमशाळेतील तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील १४ वर्षीय मुलीने १२ ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीनंतर एनआरआय पोलिसांनी पास्टर राजकुमार येसुदासन याच्या विरोधात विनयभंग तसेच पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या इतर मुला-मुलींची महिला-बाल विकास विभागाकडून चौकशी करण्यात येत असून त्यातून या आश्रममधील आणखी काही गैरकृत्ये उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  


 सीवुडस्‌, सेवटर-४८ येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेत मुला-मुलींचा छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे जिल्हा महिला-बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ५ ऑगस्ट रोजी ठाणे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि युवा चाईल्ड लाईनच्या प्रतिनीधींसह सीवुडस्‌ मधील बेथेल गॉस्पेल ट्रस्टच्या चर्चमध्ये सुरु असलेल्या आश्रमशाळेची तपासणी केली होती. या तपासणीत तेथील आश्रममध्ये ३ ते १८ वयोगटातील ४५ मुला-मुलींना एकाच ठिकाणी दोन छोट्या अस्वच्छ आणि मोडक्या खोल्यांमध्ये गलिच्छ वातावरणात ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तेथील मुला-मुलींच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे जिल्हा महिला-बाल विकास विभागाने सदर आश्रमशाळेतील ४५ मुलमुलींना उल्हासनगर येथील शासकीय बालगृहात ठेवले आहे.  


त्यानंतर महिला-बाल विकास विभागाने यातील मुला-मुलींकडे चौकशी केली असता, चर्चमधील पास्टर राजकुमार येसुदासन अंगाला विक्स आणि तेल लावण्याच्या बहाण्याने मुला-मुलींच्या संपूर्ण अंगाला स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यातील एका १४ वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीनंतर महिला-बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी १२ ऑगस्ट रोजी एनआरआय पोलीस ठाण्यात येथील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या आश्रमशाळेसह तेथील पास्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी येथील चर्चचा पास्टर राजकुमार येसुदासन याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घ्ोतले आहे.  

गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींच्या अंगाला व्हिक्स लावले जाते, असे सांगून पास्टर राजकुमार येसुदासन आश्रमशाळेत दाखल होणाऱ्या मुलींना विक्स लावण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगाला स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत होता. जी मुलगी व्हिक्स लावण्यास विरोध करेल तिच्या चुका काढून यांना पास्टर बेदम मारहाण करत होता. त्यामुळे घाबरुन  मुले-मुली त्याच्या विरोधात कुणाकडेही तक्रारी करत नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. पास्टर राजकुमार येसुदासन मुला-मुलींना गुंगी आणणारे पदार्थ देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तसेच त्यामुळे एक मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात देखील केल्याचे काही मुला-मुलींच्या चौकशीत उघडकीस आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला-बाल विकास अधिकारी रामवृष्ण रेड्डी यांनी दिली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या वादातून शिक्षिकेला मारहाण