विद्यार्थ्याला मारहाण केल्याच्या वादातून शिक्षिकेला मारहाण  

 शिक्षिकेला मारहाण; दिघा यादवनगर महापालिका शाळेतील प्रकार

नवी मुंबई ः विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याला शिक्षा केल्याच्या वादातून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना दिघा यादवनगर येथील महापालिका शाळेत घडली. या मारहाणीच्या घटनेनंतर शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन रबाले एमआयडीसी पोलिसांनी विद्यार्थ्याची आई, आजी, मामी तसेच त्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देणारे माजी नगरसेवक राम आशिष यादव अशा चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शिक्षा देऊन मारहाण केल्याप्रकरणी सदर शिक्षिकेविरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  


दिघा यादवनगर मधील महापालिका शाळा क्रमांक-७७ मध्ये ६ ऑगस्ट रोजी ५वीत शिकणारा एक विद्यार्थी वर्गामध्ये पाय घसरुन पडल्याने त्याच वर्गातील दुसरा विद्यार्थी मोठ्याने हसल्याने शिक्षिका अनिषा यादव यांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण करुन वर्गामध्ये त्याला कोंबडा बनवून शिक्षा दिली होती. या प्रकारामुळे सदर विद्यार्थी रडत आपल्या घरी गेल्याने त्याच्या आईने शिक्षिकेला फोन करुन त्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी शिक्षिकेने त्यांना उध्दटपणे बोलून शाळेत येऊन मुख्याध्यापकांना भेटण्यास सांगितले होते. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी सदर विद्यार्थ्याची आई, आजी आणि मामी या तिघीजणी शाळेत मुलाला घेऊन गेल्या होत्या. यावेळी शिक्षिका अनिषा यादव यांनी त्यांच्या वर्गात सदर विद्यार्थ्याला बसू न देता, त्याला दुसऱ्या वर्गात बसविण्यास सांगून मुख्याध्यापकांना भेटण्यास सांगितले.


 या गोष्टीवरुन विद्यार्थ्याच्या आईचा सदर शिक्षिकेसोबत वाद झाल्याने आई, आजी आणि मामी या तिघींनी वर्गात शिकवत असलेल्या शिक्षिका अनिषा यादव यांना आपल्या मुलाला शिक्षा का केली? याचा जाब विचारत त्यांना मारहाण केली. यावेळी शाळेतील इतर महिलांनी त्यांची सोडवणूक केली. या प्रकारानंतर सदर शिक्षिकेने रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी विद्यार्थ्याची आई, आजी आणि मामी तसेच त्यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देणारे माजी नगरसेवक रामआशिष यादव या चौघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  


तर शिक्षिका अनिषा यादव यांना मुलगा आजारी असल्याची माहिती असताना, देखील त्यांनी आपल्या मुलाला मारहाण करुन त्याला शिक्षा केली. त्यामुळे त्यांच्या मारहाणीला घाबरुन आपला मुलगा शाळेत जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या आईने केला आहे. तसेच सदर शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिक्षिका अनिषा यादव यांच्यावर मारहाणीसह अल्पवयीन मुलांची काळजी-संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसी मार्केटमधील हत्या प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशमधुन अटक