ऑनलाईन कपडे खरेदी करणे पडले महागात, 950 रुपये किंमतीचे कपडे पडले 1 लाख 68 हजार रुपयांत

 

सायबर चोरटयानी केली महिलेची फसवणूक

नवी मुंबई : फेसबुकवरुन ऑनलाईन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागात रहाणा-या एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणातील सायबर चोरटयाने कुरीयर कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवून सदर महिलेने मागविलेले ऑनलाईन कपडयाचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी या महिलेला ऑनलाईन 5 रुपये पाठविण्यास सांगून त्याद्वारे तिच्या बँक खात्याची माहिती मिळविली. त्यानंतर त्याने सदर महिलेच्या खात्यातून 1 लाख 68 हजार रुपये परस्पर काढुन घेतल्याचे उघडकिस आले आहे. न्हावाशेवा पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरटयाविरोधात फसवणूकिसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

या प्रकरणात फसवणूक झालेली 45 वर्षीय महिला उलवे भागात रहाण्यास असून गत एप्रिल महिन्यामध्ये या महिलेने फेसबुकवरील जाहिरातीतून मिळालेल्या व्हॉट्सऍप नंबरवरुन ऑनलाईन महिलांचे ड्रेस मटेरीयलचे कपडे मागवले होते. सदर कपडयाची 1300 रुपये फोन पे द्वारे पाठवुन दिल्यानंतर तीन दिवसामध्ये त्यांच्या कपडयाचे पार्सल त्यांना कुरीयरद्वारे घरपोच मिळाले होते. त्यामुळे गत जुन महिन्यामध्ये या महिलेने पुन्हा त्याच व्हॉट्सऍपवरुन चॅट करुन 950 रुपये किंमतीचे ड्रेस मटेरियलचे कपडे मागविले होते. त्याचे पैसे देखील त्यांनी ऑनलाईन पाठवुन दिले होते. त्यानंतर या महिलेने 800 रुपये पाठवुन आणखी एक ड्रेस मटेरियल मागविले होते.  

या ड्रेस मटेरियलचे पार्सल पाठवण्यात आल्याचा मेसेज या महिलेला तत्काळ मिळाला. मात्र, दोन दिवसापुर्वी मागविलेल्या पार्सलबाबत मेसेज न आल्याने सदर पार्सलची माहिती घेण्यासाठी या महिलेने मारुती कुरीयरला गुगलद्वारे ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका सायबर चोरटयाने मारुती कुरीयर कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवून या महिलेला संपर्क साधला. तसेच त्यांनी ऑनलाईन मारुती कुरीयर ट्रॅक केल्यामुळे त्यांच्या पार्सलचे कुरीयर डीऍक्टीवेट झाल्याचे सांगुन ते ऍक्टीवेट करण्यासाठी 5 रुपये पाठविण्यासाठी युपीआय क्रमांक पाठवुन दिला. सायबर चोरटयाच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन या महिलेने 5 रुपये पेटीएमद्वारे पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर व्यवहार पुर्ण झाला नाही. याच माध्यमातून सायबर चोरटयाने या महिलेच्या बँक खात्याची माहिती मिळविली.  

त्यानंतर सायबर चोरटयाने पुन्हा या महिलेला संपर्क साधुन 5 रुपये न पाठविल्यामुळे त्यांचे पार्सल रद्द होईल अशी भीती दाखविली. त्यामुळे या महिलेने कुरीयरच्या डीलिव्हरी बॉयला 5 रुपये देणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याने फोन बंद केला. त्यामुळे या महिलेला संशय आल्याने तीने गुगलवरुन एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधुन त्यावर संपर्क साधला. तसेच आपले खाते बंद करण्यास सांगितले. मात्र समोरील महिलेने सर्व्हर डाऊन असल्याचे सांगुन या महिलेचे बँक खाते बंद न करता, 18 मिनिटे या महिलेचा मोबाईल फोन चालु ठेवून नंतर फोन बंद करुन टाकला. याच कालावधीत सायबर चोरटयाने वेगवेगळ्या युपीआय ट्रान्झेक्शनद्वारे या महिलेच्या खात्यातील 1 लाख 68 हजार रुपये काढुन घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर महिलेने न्हावाशेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

 

 
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात खुले आम जुगार सुरू?