‘ब बळीचा की बाईचा?' बाईपणाच्या आपल्या वाटणाऱ्या कविता

 ‘ब बळीचा की बाईचा?' असा थेट प्रश्न काळाला विचारणाऱ्या कवयित्रीचा ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून' काव्यसंग्रह मिळाला. खरंतर कवयित्री प्रतिभा खैरनार यांना मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ना कधी संवाद साधला; पण त्यांच्या कवितांनी मात्र मनाशी एक वेगळंच नातं जोडून टाकलं. त्यांच्या कविता आपल्यासोबत खूप संवाद साधतात. बाईपणाची प्रत्येक कविता आपली वाटते.

नाशिक ते पनवेल प्रवास सुरू असताना, मित्राच्या हातातलं पुस्तक सहज हातात घेतलं आणि कधी ते पूर्ण वाचून झालं, ते कळलंच नाही. आश्चर्य प्रवास संपल्याचं नव्हतं; आश्चर्य होतं त्या कवितांनी मनावर उमटवलेल्या गहिऱ्या रेघोट्यांचं आणि प्रत्येक कवितांनी मनाला पाडलेली भुरळ, त्यातून सहजासहजी बाहेर न पडलेले मन..

जणू  पहिल्या पावसाची सर, गुलाबी थंडी, रखरखतं ऊन आणि हळूहळू मोकळं होत जाणारं मन. जणू कुणाच्या मिठीत विसावतंय, भावना, वेदना, कष्ट, विरह, प्रेम, अगतिकता या भावभावना वंशावळीच्या प्राचीन सरीतून वाहताय.

माणूस पुस्तकातून समजतो, असं म्हणतात; पण बाई समजून घ्यायची असेल, तर तिला अनुभवावी लागते ही जाणीव या कवितांमधून प्रकर्षाने होते. या कवितांमध्ये बाईच्या अस्तित्वाची, तिच्या देहाची, तिच्या मनाची आणि तिच्या वेदनांची जाणीव तीव्रतेने उमटते. ओटीपोटावर कोरलेल्या लेण्यांमधून अर्थस्वर घुमतात तिच्या मातृत्वाच्या खुणा स्पष्ट करत, आनंदाची अनुभूती देतात..आणि त्यातून आशयघन कविता जन्म घेते.

"आयुष्यभर शिणलेला माझा देह..” यातून कवयित्री स्त्री जातीचा तिच्या कष्टांचा अखंड आलेख मांडतेय. शारीरिक वेदना क्षणिक असतात; पण अंतर्मनातील जखमा खोलवर रुतलेल्या असतात. आयुष्याने आधीच इतकं जाळलेलं असतं, की बाह्य वेदना किरकोळ वाटतात. मला पडलेल्या प्रश्नांपेक्षा तुझ्या टोकदार उत्तरांनीच मन अधिक जखमी होतं. उत्तर इतकं जड असतं, की त्यात स्वतःचं अस्तित्वच हरवतं आणि शेवटी उरते एक अनुत्तरित मी. हे उरणंसुध्दा कवयित्रीला महत्त्वाचे वाटतं.

स्त्री प्रत्येक जन्मात आई होण्याचं भाग्य स्वीकारते; पण त्या भाग्यासोबत येणाऱ्या वेदनाही तितक्याच शांतपणे पेलते आणि वेदनेसोबत सुखाचे स्वागत करते.  बाईच्या अस्पष्ट जखमांवर कवयित्री सुगंधी गजरा माळते तेव्हा ती सहनशील, संवेदनशील पेक्षा अधिक कणखर, संघर्षमय जाणवते.

बाई आणि चूल जणू जुळ्या बहिणी
दोघींचाही जन्म कुणाच्या तरी पोटाची खळगी भरण्यासाठी.
स्वतःवर कविता लिहिणं म्हणजे स्वतःच्या खोल डोहात उतरावं लागतं हरवलेल्याचा आणि सापडलेल्याचा मागोवा घेत, स्वतःलाच पुन्हा भेटेपर्यंत.
कागदी फुलांनाही कळू लागतं की काही रात्री बेपत्ता होतात; कुठे नोंद नसते, फक्त काळोखात विरघळलेली जाणीव उरते.

बाई जन्मापासूनच जिरवत जाते शालीनता, सभ्यता, संसार
स्वप्नं देत जाते, पण अलंकार स्वतःसाठी राखून ठेवत नाही.
मग प्रश्न उरतोच
‘ब' बळीचा की ‘ब' - बाईचा?

प्रतिभा खैरनार यांच्या कविता वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात; पण त्याहून जास्त मनावर उमटणारी स्पंदनं खूप खोलवर भिडतात. प्रत्येक कविता बाईपणाचा अर्थ नव्याने उलगडत जातात.

लेखिकेला न भेटताही, त्यांच्या कवितांमधून मी त्यांना भेटले...म्हणून हा अभिप्राय.
त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
  - माधवी नितिन मोतलिंंग 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 जागतिक पुस्तक दिन