सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये विकसित करणार एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क
जागतिक पुस्तक दिन
प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला; तर २३ एप्रिल १६१६ रोजी त्यांचे निधन झाले. योगायोग म्हणजे अनेक जागतिक किर्तीच्या नामवंत कवी, लेखक यांची पुण्यतिथी अथवा जयंती याच दिवशी येत असल्यामुळे ‘युनेस्को' ने १५ नोव्हेंबर १९९५ ला पॅरिस येथे झालेल्या परिषदेमध्ये २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिवस' म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
२३ एप्रिल १९९६ रोजी पहिला जागतिक पुस्तक दिवस साजरा झाला. पुस्तकांचे महत्व जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो. साने गुरुजी पुस्तकांना प्रेम, त्याग आणि मांगल्याची पेरणी करणारी शिदोरी मानायचे. ‘मानवी जीवनाला प्रगल्भ करणारी निष्ठावान मैत्रीण म्हणजे पुस्तक' असे त्यांचे मत होते.
‘पुस्तक आणि वाचन' हेच मनुष्याच्या गतीचा व प्रगतीचा आधार आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. बाबासाहेबांनी योग्य सांगितले आहे. माणूस अनेक वर्षापासून वाचन करत होता; परंतु १८०५ साली मुद्रित करण्यात आलेल्या ‘मराठी व्याकरण' या पहील्या पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर खऱ्या अर्थाने माणसाच्या वाचनाची गती वाढली आणि माणसाची प्रगती झाली. १९ नोव्हेंबर २००७ या दिवशी आधुनिक वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने एक महत्वाची घटना घडली. अमेझॉन कम्पनीने त्या दिवशी ‘किडल' हे कागदाविना पुस्तक वाचता येईल असे उपकरण बाजारात उपलब्ध केले. या साऱ्या क्रांतीची बीजे ॲडॉबने १९९३ मध्ये तयार केलेल्या पीडीएफ फाईल फॉर्मॉटमध्ये पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट (पीडीएफ ) ची निर्मिती मध्ये आहेत. हे ई -बुकच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल. पीडीएफचा वापर करून अनेक पुस्तकांच्या डिजिटल आवृत्या काढण्यात आल्या. कालांतराने नव्या तंत्राने डिजिटल आवृत्त्यांत मोठे बदल झाले. सध्या लेखकाने लिहिलेले पुस्तक दुसऱ्याच क्षणी ई -बुक स्वरुपात उपलब्ध होणार आहे. साधारणपणे एका ई-बुक्सच्या एक लाख प्रती प्रसारित करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येतो. यामुळे कागदाची बचत होते, छपाईचा त्रास नाही. ईमेलनेच पुस्तक पाठवले जाणार असल्याने जगांत कोठेही वाऱ्याच्या वेगाने जाणार आहे. ई-बुक्स ऐकता येत असल्याने अंधांनाही त्याचा फायदा होत आहे.
२०१२ अखेरपर्यंत इंग्रजीत साडेचार कोटी ई -बुक्स तयार होती. चीनी, जपानी, भाषेतही मुबलक ई-बुक्स तयार आहेत. भारतात तमीळ, बंगाली भाषासुध्दा याबाबतीत आघाडीवर आहेत. मराठीत नवीन साहित्य डिजिटल स्वरुपात थोड्या प्रमाणात येत आहे. परंतु जुने साहित्य लवकरात लवकर डिजिटल स्वरुपात आणणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वानी शासनाकडे पाठपुरावा केला तर वाचकासाठी माहितीचा मोठा खजिना उपलब्ध होईल यात शंकाच नाही. - दिलीप प्रभाकर गडकरी