दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची । १।
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती । धृ।
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी, कुमकुम केशरा
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । २।
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा, वाट पाहे सदना
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती । ३।
श्रीगणेश हे ज्ञान, बुध्दी व कोणत्याही नव्या प्रारंभाचे दैवत व प्रतिक आहे. गणेशोत्सव सुरु झाला की घरोघरी गणपतीच्या आरतीचे सुर घमू लागतात. गावामध्ये व शहरी भागांतील इमारतींमध्ये घरोघरी श्रीगणेश प्रतिष्ठापना केली जात असल्यामुळे सकाळ सायंकाळ मोठया उत्साहात आरती गणपतीसमोर सामूहिकरित्या आरती गायली जाते. सुखकर्ता दुखहर्ता म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा. गणपतीला उद्देशून रचलेले काव्य हे समर्थ रामदास स्वामी ह्यांनी लिहिले आहे. या आरतीने गणेशासमोर नतमस्तक होऊन आपले गा-हाणे मांडण्याचे एक विलक्षण समाधान प्राप्त होते. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात व नित्य पूजेतही म्हटली जाते.
गणपती आपल्या जिवनात सुख आणून दुःख दूर करतो आणि भक्ताचे जीवन प्रेमाने भरुन टाकतो ह्याचे वर्णन या आरतीमध्ये करण्यात आलेले आहे. मंगलमूर्तीच्या केवळ दर्शनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
दुसऱ्या कडव्यात गणपतीचे गौरी (पार्वती) पुत्र म्हणून वर्णन आहे. भरपूर रत्ने असलेला एक दागिना लावलेले त्याचे कपाळ चंदन, कुंकू, व केशर लावून हिऱ्याचे मुकुट व दागिन्यांनी सजवलेले आहे असे वर्णन केलेले आहे.
शेवटचं कडव्यामध्ये गणपतीस लंबोदर संबोधण्यात आले असुन त्याने पितांबर नेसला आहे. त्याच्या कंबरेभोवती कंबरपट्टा आहे. या गणपतीला तीन डोळे असून त्याचे तोंड वाकडे पण सोंड सरळ आहे. मोरगावच्या गणपतीच्या मूर्तीला तिसरा डोळा आहे. शेवटी कवीचे नाव आहे व दास रामदास हा देवाची वाट पाहतो आहे, असे वर्णन आहे. ह्या कडव्यात भक्त संकटात असताना गणपतीला प्रसन्न होण्याची व अखेरच्या क्षणी रक्षण करण्याची विनंती केली गेली आहे.
गणपतीची ही आरती परंपरागत आरत्यांच्या चालीत घरोघरी म्हटली जाते. पण १९७० साली लता-उषा मंगेषकरांनी नव्या चालीत ही आरती म्हटली व तीसुद्धा लोकप्रिय झाली आहे. तिन कडव्यांची ही आरती गणेशात्सवामध्ये कितीही वेळा म्हटली तरी मनाला एक नवी उभारी देते. या आरतीशिवाय गणपतीचे आगमन व विसर्जन संपन्न होत नाही त्यामुळे सुखःकर्ता, दुखःहर्ता या आरतीचे महत्व सर्व गणेशभक्तांच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. - वैभव मोहन पाटील