घरातील वातावरण भारुन टाकणारे उत्सव

 घर हे केवळ चार भिंतीचे नसावे, त्याला खऱ्या अर्थाने घरपण येते ते तेथे रहाणाऱ्या माणसांमुळेच, वास्तूदोष, अथवा त्या वास्तूतून होणारी प्रगती, लाभ, याबाबत दुमत असणे स्वाभाविकच आहे. पण आपल्या घरावर असलेली श्रद्धा, प्रेम, हे तिथे राहूनच मनात निर्माण होत असतें. पूर्वी घरे मोठी आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे संस्कार, संस्कृती, यांची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अलिखितपणाने हस्तान्तरीत होत गेली. काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मातीची घरे, चिरेबंदी वाडे, चौपेटी घरे, हे कालबाह्य होत गेली.

..त्याचबरोबर एकत्र कुटुंबे विभक्त होत गेली. उंच उंच टॉवर्स, टोलेजंग इमारती, वन बिएच के, टू बीएचके, या गोंडस नावातून कुटुंबे दुरावली गेली. एखाद्या लाकडी चौकोनी खोक्याच्या आत मी आणि माझे कुटुंब  ही भावना जास्त दृढ होत गेली. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात निदान सण उत्सवाच्या माध्यमातून तरी आज अनेक कुटुंब एकत्र येऊन सण उत्सव मोठ्या हौशीने आणि उत्साहाने साजरे करतायत, ही एक फार मोठी जमेची बाजू आहे. आपला मानसिक ताण, दुःख, चिंंता, या सर्व नकारात्मक व्याधी दूर ठेवून त्या घराला खऱ्या अर्थाने घरपण देत आहेत. घरातील त्या आठ-दहा दिवसाच्या एकत्र सहवासातून त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्या वास्तूत सण उत्सव साजरे करताना जुन्या, पारंपरीक आठवणीं यांना उजाळा मिळत असतो. त्यातूनच एक मानसिक आनंद, समाधान मिळत असतें हेसुद्धा नाकारता येणार नाही. इतकेच नाही, तर त्या काही दिवसांत घरातील एकत्र   सहवासाने आणि सण उत्सवाच्या आनंदातून मिळणारी ऊर्जा, प्रेरणा ही पुढील वर्षी येणाऱ्या सण उत्सवापर्यंत ताजीतवानी रहाते, हाच त्या वास्तूचा खऱ्या अर्थाने लाभ आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण या वास्तवाचा अनुभव आपल्यापैकी सर्वांनांच आलेला असेल; तर काहीजण अनुभवतसुद्धा असतील. यात काही शंका नाही. कारण सण उत्सावाच्या निमित्ताने घरामधील सकारात्मक वातावरण आणि त्याला आनंद   उत्सहाची जोड अशा मंगलमय व पवित्र वातावारणामधूनच नाती अधिक दृढ होतात. हे निश्वित!   - पुरुषोत्तम कृ आठलेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समस्येपासून पळायचं नाही, लढायचं आहे