शासनाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बक्षीस रक्कमेत वाढ

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष-महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये १.५० लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये ५ लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये १ लाख पारितोषिकाची रक्कम रुपये ३ लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये ७५ हजार पारितोषिकाची रक्कम रुपये २ लाख करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केली. अन्‌ ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू -प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदूमून गेला.

क्रीडा-युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य-पुणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने ठाणे मधील धर्मवीर आनंद दिघे पहिल्या क्रमांकाला ५ लाख, दुसरा क्रमांक ३ लाख तर तिसऱ्या क्रमांकाला २ लाखक्रीडानगरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष-महिला) स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण १६ मुलांचे आणि १६ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ‘क्रीडा मंत्रालय'चे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन'चे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, इतर पदाधिकारी, मंत्रालयातील उपसचिव सुनील हांजे, आदि उपस्थित होते.

स्वर्गीय मनोहर जोशी यांनी २५ वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, बुवा साळवी यांचेही यासाठी अमूल्य योगदान होते, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आठवणींना उजाळा दिला. आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडुंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे. राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडुंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडिया आदिंच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाने सदर स्पर्धेसाठी ७५ लाख रुपये तर ठाणे महापालिकेने १.११ कोटी रुपये इतका निधी दिला आहे. कबड्डी खेळासाठी ठाणे महापालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा. मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला, यासाठी शासनाच्यावतीने मैदानी खेळांसह पारंपारिक ‘क्रीडा महाकुंभ' भरविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेबाबतची माहिती दिली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राणाप्रताप तिवारी यांनी केले. दरम्यान, सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के आणि ठाणे महापालिका क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

अ.भा.आंतरविद्यापीठीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये भोईर जिमखाना खेलो इंडिया अकादमीचे खेळाडू चमकले