नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छुपे डान्सबार चालवत असलेल्या बारवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोपरखैरणेतील नटराज रेस्टॉरंट अँड ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून बार चालविणाऱ्या नवी मुंबईतील बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार फक्त गाण्यांपुरतेच मर्यादित न राहता त्यात अश्लिल नाच-गाण्यांचा आणि नोटा उडवण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक बार विहीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालविण्यात येत असल्याचे तसेच बारचे प्रवेशद्वार बाहेरुन बंद असले तरी बारच्या आतमध्ये बिनबोभाटपणे महिला वेटर्सचे अश्लिल चाळे सुरु असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे. शहरातील अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियम धाब्यावर बसवून ते बिनबोभाट चालविण्यात येत असल्याने ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील बारची तपासणी करुन त्यात गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छुपे डान्सबार सुरु असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात
केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अचानक छापा मारुन या बारची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कोपरखैरणे मधील नटराज ऑर्केस्ट्रा बार आस्थापनेची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान सदर ऑर्केस्ट्रा बारने त्यांना दिलेल्या परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सदर ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत सुनावणी घेतली होती. या सुनावणीत नटराज रेस्टॉरंट ॲन्ड ऑर्केस्ट्रा बारच्या आस्थापनेकडून नियमांचे, अटींचे उल्लंघन झाल्याची खात्री झाल्यानंतर ५ जानेवारी रोजी सदर बारचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नटराज ऑर्केस्ट्रा बारकडून सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम नियम १९९९ मधील तरतुदींचा आणि परवान्यातील अटींचा भंग करण्यात आल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. बारमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात देखील परवान्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हिस बारवर कडक कारवाई करण्यात येईल. - गजानन राठोड, सहाय्यक पोलीस आयुवत - गुन्हे शाखा.

यापूर्वी बार वर झालेली कारवाई...
यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या वाशीतील ऑन्टेरिओ हॉटेल्स प्रा.लि, पनवेल तालुक्यातील टाईम्स बार ॲन्ड रेस्टारंट, गोल्डन पाम बार ॲन्ड रेस्टॉरंट, क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड बार त्याचप्रमाणे रबाले एमआयडीसी मधील हॉटेल माया पॅलेस या पाच ऑर्केस्ट्रा बारचे परवाने काही पंधरा दिवसासाठी निलंबित केले होते. तसेच कपल रेस्टारंट ॲन्ड बार, हॉटेल मेघराज बार ॲन्ड रेस्टारंट आणि माया रेस्टारंट ॲन्ड बार या तीन ऑर्केस्ट्रा बारचे परवाने एक महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित केले आहेत. तर हॉटेल कॅप्टन एनएक्स बार ॲन्ड रेस्टॉरंट या आर्केस्ट्रा बारचा परवाना तीन महिन्याकरिता निलंबित केला होता. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी कोपरखैरणेतील नटराज ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई केली आहे.

 

 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

इराणी टोळीचा सराईत सोनसाखळी चोरटा गजाआड