बार मालकांडून खंडणी उकळणारा जेरबंद  

नवी मुंबईसह मुंबई, ठाण्यातील बार मालकांकडून लाखो रुपये खंडणी उकळल्याचे उघड  

नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बारवर शासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्याची धमकी देऊन बार मालकांकडून खंडणी उकळणाऱ्या हितेश रामकृष्ण कुंभार (३३) आणि त्याच्या दोन साथीदारांना भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. या खंडणीखोराने नेरुळ मधील सर्व बार मालकांना देखील धमकावून त्यांच्याकडून देखील खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी या खंडणीखोराविरोधात गुन्हा दाखल त्याचा ताबा घेण्याची तयारी सुरु केली आहे.  

भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी हितेश कुंभार मुळचा अहमदनगर जिह्यातील अकोले येथे राहणारा असून सध्या तो कांदिवली पूर्व येथील मोरारजी मिल बिल्डींगमध्ये राहण्यास आहे. हितेश कुंभार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर परिसरतील ऑर्वेÀस्ट्रा बार आणि सर्व्हिस बारमध्ये जाऊन त्यांचे बार बेकायदेशीरित्या चालवले जात असल्याचे सांगून संबंधित बारवर शासकीय यंत्रणेमार्फत कारवाई करण्याची धमकी देत होता. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत होता. २० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता नेरुळ मधील शिरवणे भागात जाऊन हितेश याने नेरुळ मधील सर्व बार सील करण्याची तसेच मंत्रालयातील ओळखीतून सरकारी यंत्रणेमार्फत त्यांच्या बारवर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच प्रत्येक बारकडून त्याला ३ लाख रुपये त्याला द्यावे लागतील, असे बजावले होते. शिवाय त्याने सुरुवातीला गुडविल म्हणून ११ लाख रुपये देण्याची मागणी सुध्दा केली होती.

त्यावेळी घाबरलेल्या सर्व बार मालकांनी त्याला २५ हजार रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर आरोपी हितेश कुंभार याने अशाच पध्दतीने भिवंडीतील बार मालकांना सुध्दा मुंबईतील ‘भाजपा'चा नगरसेवक असल्याचे सांगून धमकावले होते. तसेच भिवंडीतील सर्व बार चालू ठेवण्यासाठी ऑर्वेÀस्ट्रा बारचे ५ लाख रुपये आणि  सर्व्हिस बारचे ३ लाख रुपये देण्याची, दरमहा २५ हजार रुपये देण्याची देखील मागणी केली होती.  

त्यानंतर हितेश कुंभार २२ डिसेंबर रोजी पुन्हा मुंबई नाशिक मार्गालगत भिवंडी येथील बार मालकांकडून खंडणी उकळण्यासाठी गेला असताना कोन गांव पोलिसांनी सापळा लावून त्याला आणि त्याचे सहकारी देवेंद्र खुंटेकर, राकेश कुंभकर्ण या तिघांना बार मालकांकडून २७ हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक केली आहे. हितेश कुंभार या खंडणीखोराने नेरुळ मधील  बार चालकांना धमकावून त्यांच्याकडून देखील खंडणी उकळल्याने नेरुळ पोलिसांनी देखील त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कोनगांव पोलिसांकडून त्याचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे.  

खंडणीखोर हितेश कुंभार मुंबईतील ‘भाजपा'चा नगरसेवक असल्याचे अथवा मुंबईतील समाजसेवक असल्याचे सांगून तसेच त्याची मंत्रालय, महापालिका, एक्साईज डिपार्टमेंट आणि न्युज चॅनल या सर्व ठिकाणी ओळख असल्याचे सांगून बार मालकांना धमकावत होता. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागत होता. या खंडणीखोराला घाबरुन नेरुळ मधील बार मालकांनी २५ हजार रुपये दिले असले तरी या खंडणीखोराने अशाच पध्दतीने अनेक बार चालक आणि मालकांना धमकावून त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

जेएनपीटी बंदरात परदेशातून आलेल्या कंटेनरमधुन 5 कोटी 77 लाख रुपये किंमतीचे सिगारेट जप्त