थेट मंत्रालयातून राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद

नमोंचा सूट आणि राहूलचा बूट!

आपल्या सत्तेला आव्हान मिळू लागलं की भाजपचे नेते कसे कासावीस होतात, हे आता जगालाही कळून चुकलं आहे. मग आव्हान देणारा राष्ट्रीय पक्ष असो किंवा त्या पक्षाचा नेता असो. प्रादेशिक पक्ष असो वा त्या पक्षाचे नेते असोत. आपल्या उणीवांवर कोणी बोलू नये, असं भाजप नेत्यांना वाटत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहच काय पक्षाच्या मंत्री आणि तळागळातल्या भाजप नेत्यांनाही ते सहन होत नाही. यामुळेच प्रदेश पातळीवरील शिवसेना असो वा तेलंगणा राष्ट्र समिती यासारख्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा या पक्षाचे नेते करत असतात. काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजप नेत्यांना काँग्रेस कळलीच नाही. केवळ पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहण्याची चूक तो पक्ष करतो आहे. पण तो एक विचार आणि संस्कृती असल्याने त्याला संपवणं हे जाहीर सभेत बोलण्याइतकं सोपं नाही. पक्ष कमजोर जरूर होईल पण संपणार नाही, याची जाणीव भाजप नेत्यांना नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या भारतजोडो यात्रेतून हे स्पष्ट होत आहे. या यात्रेवर भाजप नेते करत असलेली टीका पाहाता मोदींच्या 21 लाखांच्या सुटाहून राहुल गांधींचे बूट बरे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. राहूल यांच्या या यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाने भाजपचे नेते चांगलेच बिथरलेले दिसतात. सर्वच राज्यांमध्ये त्या पक्षाची अवस्था बिकट असताना काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा काँग्रेसला यश देईलच याचा भरवसा नव्हता. पण घडलं वेगळंच. यात्रा त्या पक्षाला उर्जा मिळवून देत आहे. पहिल्या दिवशी कन्याकुमारीत राहुल यांनी 20 किमी अंतर पायी चालत पार केलं तेव्हा त्यांना मिळालेला जन प्रतिसाद हा कमालीचा बोलका होता. आठ वर्षांच्या सत्तेनंतर लोकं काँग्रेस पक्षाला विसरली असतील, असं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भक्तांना वाटणं स्वाभाविक होतं. पण हा विसराळूपणा टिकवून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या भाजपच्या सत्तेनेच काँग्रेसच्या आठवणी जागृत करून दिल्या आहेत. काँग्रेस परवडली, असं उघडपणे व्यक्त होणारी लोकं सत्तेला शाप देऊ लागली आहेत. याचीच बोच म्हणजे भाजपेयींची भारतजोडो यात्रेवरील टीका होय.

सत्ता आल्यापासून सामान्यांच्या गरजांचा जराही विचार मोदींच्या सरकारने केला नाही. मोठाल्या गप्पा मारायच्या, डोळ्यात अश्रृ असल्याचा आव आणायचा आणि खोट्याच्या नावावर लोकांना आपल्याकडे वळवायचं सोंग मोदींनी आजवर उत्तमपणे वठवलं. सुशिक्षित यात सजग होते. सत्तेच्या पहिल्या तीन वर्षात त्यांना फारशा अपेक्षा नसतात. मात्र ही तीन वर्षं उलटली की सत्तेचा गूण दिसतो, अशी सुशिक्षितांची मांडणी असते. तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या शब्दात सांगायचं तर मोदींच्या नेतृत्वातील पहिल्या सत्तेत भाजपने केवळ आणि केवळ जुमलेबाजी केली. मोठाली आश्‍वासनं दिली पण एकाही आश्‍वासनाची पूर्तता करता आली नाही. ज्यांच्या जीवावर सत्तेची कमान आली त्या युवा वर्गाच्या रोजगाराच्या प्रश्‍नात तर मोदी-शहांनी केवळ चुना लावण्याचं काम केलं. वर्षात दोन कोटी रोजगार निर्माण करण्याच्या बोलीवर सत्तेत आलेल्या या जोडीला वर्षाकाठी दोन लाख नोकर्‍याही देता आल्या नाहीत. नोकर्‍यांचा प्रश्‍न हा उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर विसंबून असतो. हे कारखानेच बंद झाल्याने नवे रोजगार निर्माण होण्याचा प्रश्‍नच नव्हता. हे लक्षात आल्यावर मग पकोडे तळण्याचे उद्योग त्यांनी युवकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला.

काळ्या पैशाच्या नावाने तर त्यांनी देशवासीयांची पुरती फसवणूक केली. हा काळा पैसा देशात आला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये असे जमा होतील, अशी मखलाशी करणार्‍या मोदींना गेल्या आठ वर्षात काळ्या धनाचा एक पै शोधून काढता आला नाही. उलट ज्यांच्याकडे काळा पैसा होता तो नोटबंदीच्या रुपाने पांढरा करण्याचे उद्योग सरकारने केले आणि यातून 40 टक्के कमिशन स्वत:च्या नावाने पचवूनही घेतलं. या नोटबंदीनंतरच देशात आर्थिक विसंगती निर्माण होऊ लागली हे उघड सत्य भाजपचा एकही नेता मानायला तयार नाही. आज देशात निर्माण झालेल्या महागाई आणि आर्थिक मंदीला केवळ भाजप सरकारचं धरसोड धोरण कारणीभूत आहे, हे मान्य केल्याविना पर्याय नाही. लोकांची मतं मिळणं अवघड आहे, हे लक्षात आल्यावर पुलवामासारख्या घटना घडवून आणत भावनाविवषाने भाजपने लोकांची मतं मिळवली. सत्तेविरोधी कोणी आवाज केला की त्याच्या मुसक्या बांधण्याची कला 70 वर्षांच्या राजवटीत काँग्रेसला कधी जमली नाही. आज इडी, सीबीआय, आयकर, एनसीबी या संस्थांना कामाला लावून त्यांच्याकरवी विरोधकांना तुरुंगात डांबण्याचं तितकं काम सरकारने इतक्या बेमालूमपणे केलं की त्याची तुलनाच करता येणार नाही. सर्वच स्तरात देश मागे गेल्याचे परिणाम लोकांच्या जीवनमानावर होऊ लागले आहेत. गरीबाला जगणं असह्य होत असताना श्रीमंत मात्र अधिकच श्रीमंत होत आहेत आणि गरीब रसातळाला जातो आहे, याची जाणीव सत्तेला राहिलेली दिसत नाही. यामुळेच दोन लाख कोटींचा कर्जदार बनलेल्या आदांनींना खुलेआम पुन:पुन्हा कर्ज मिळतो आहे. एकाच गुजरात राज्यातील 22 धनदांडगे बँकांना चुना लावून मोकळे होऊनही त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. सामान्यांना एकावेळच्या जेवणाची मोताद असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या अशीर्वादाने देशात लुटीचा सुकाळ सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेचा अवलंब व्हावा हा काही योगायोग नाही. हे होऊ नये म्हणून राहुल यांच्या मागे चौकशांचा फेरा लावला. हे केलं की भारतजोडोचा फज्जा उडेल, असे मनसुबे रचले गेले. पण झालं वेगळंच. यात्रेला अपेक्षेहून लोकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने संपलेल्या काँग्रेसचं भूत भाजपच्या मानगुटीवर बसू लागलं आहे. आनंद शर्मा, मनीश तिवारी, गुलामनबींसारखे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असूनही लोकं काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होतात, हेच सत्ताधार्‍यांना पचेनासं झालं आहे. यामुळेच यात्रेच्या वाटेवर काटे टाकण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. राहुल यांच्या यात्रेच्या प्रवासावर टीका करताना कंटेनर वाहनाची व्यवस्थाही भक्तांचं अपचन करू लागली आहे. सामान्यांच्या नावाने गमजा मारायच्या आणि स्वत:साठी कोट्यवधींचं विमान खरीदण्याचे उद्योग राहुल यांनी केले असते तर त्यांच्या यात्रेची कोणी दखल कशाला घेतली असती? आट्याची किंमत चुकून लिटरमध्ये मोजण्याचा भक्तांना झालेला आनंद म्हणजे त्यांच्या विकृतीची परिसिमाच होय. राहुलकडून झालेली ही तर सामान्य चूक होती. पण पंतप्रधान मोदी जेव्हा बेटी बचाव, बेटी पटावचा नारा देतात तेव्हा मात्र हेच भक्त मौनी बनतात. मोदींच्या असल्या पटवापटवीपेक्षा आटा लिटरमध्ये मोजणं केव्हाही चांगलं. इतिहासाची मोडतोड करणारे गृहमंत्री अमित शहा यांची तर्‍हा तर औरच. न जन्मलेल्या सावरकरांनाही 1857च्या उठावात आणण्याचा प्रताप ते करतात. अर्धवट ज्ञान आणि शिक्षणाचा अभाव असला की जे व्हायचं ते या दोघांच्या मुखातून आपसूक बाहेर येतं.

अच्छे दिनचा मंत्र जपणार्‍या मोदी सरकारच्या काळात 2021 या वर्षात जीवनाची अखेर करणार्‍यांची संख्या कैक पटीने वाढली आहे. वर्षभरात एक लाख 39 हजार 123 लोकांनी स्वत:ची जीवन यात्रा संपवून टाकली आहे.  रोजगाराच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या तुटीने बेरोजगारांची संख्या दिवसगणिक वाढते आहे. आत्महत्या करणार्‍यांच्या या संख्येत बेरोजगारांची संख्या ही 32 हजारांहून अधिक आहे. रोजगार नसल्याने जगायचं कसं असा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. महागाईच्या झळीने सामान्य रोजंदारालाही जगणं मुष्कील झालंय. असलेल्या नोकर्‍या जाण्याचे परिणाम देशातला प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब सोसत असताना सरकार आणि त्यातले मंत्री केवळ धार्मिक तेढीला  महत्व देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींचा देशजोडोचा नारा देशावरील संकट परतवायला कामी येवो, याच सदिच्छा...

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : पासष्टावी कला