मुशाफिरी : पासष्टावी कला

पासष्टावी कला

     जाहिराती म्हणजे कमीत कमी वेळ, कमीत कमी शब्द, कमीत कमी दृश्ये आणि अधिकात अधिक परिणाम होय. एखादा पूर्ण लांबीचा लेख, बातमी, वार्तापत्र जेव्हढे नीट सांगत नसेल त्याहुन अधिक प्रभावीपणे एखादी दिड दोन मिनिटांची दृकश्राव्य जाहिरात अनेकदा सांगून जाते...मात्र ते करण्यामागे कल्पकता, सृजनशीलता हवी. पाट्या टाकणाऱ्याचे ते काम नव्हे!

     तुमचा जन्म १९७० च्या मागेपुढे पाच-सहा वर्षे झाला असेल तर तुम्ही ‘त्या' काळच्या ब्लॅक ॲण्ड व्हाईट टीव्ही युगाचेही साक्षीदार असाल. ॲल्युमिनियमच्या काड्याकाड्यांचे ॲन्टेना नि मग त्यावर कावळा बसला किंवा पतंग अडकली की इकडे पडद्यावर मुंग्या दिसल्याच म्हणून समजा. मग कौले, पत्रे, स्लॅब, टेरेस.. जे काही असेल त्यावर एकाने जाऊन खाली असलेल्याला ‘आता दिसतंय का ?' म्हणून ओरडून विचारणे या सगळ्या अनुभवातून जायला कुणालाही कसला कमीपणा वाटत नसे असा तो काळ! भवती बर्वे-इनामदार, अनंत भावे, प्रदीप भिडे, रत्नाकर तारदाळकर, वासंती वर्तक आदिंच्या आवाजात मुंबई दूरदर्शनच्या बातम्या पाहण्याचे ते संस्मरणीय दिवस. दूरदर्शनच्या जोडीला आकाशवाणी मुंबई व आकाशवाणी पुणे हेही होतेच.

     हल्ली आपण विविध च्यानेलांवरील बातम्यांच्या आगेमागे आणि बातम्या वाचल्या जात असतानाही संगीतही ऐकतो, मध्येच जाहिरातीही घुसडल्या जातात. मध्येच अन्य काही महत्वाचे सुरु असले तरी ते पटकन थांबवून ‘ब्रेकींग न्युज'च्या नावाखाली काहीबाही दाखवले जाते. त्या अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्ही वर तर ‘आरडा ओरडा करत बातम्या सांगता यायला हव्या' हा तेथील नोकरीसाठीचा बहुधा एकमेव महत्वपूर्ण निकष असावा. नव्याने तिथे दाखल झालेल्या पोरीटोरीही बेंबीच्या देठापासून ओरडतच बातम्या देत असतात. 'त्या' काळी मात्र बातम्या म्हणजे ओन्ली बातम्या. नो विमल, नो कमल..असा प्रकार असे. मला आठवते...आकाशवाणीवर त्यावेळी प्रकाशचे माक्याचे तेल म्हणून एका उत्पादनाची जाहिरात असे. ‘आई गं वैतागले मी या केसांना.'  मग आई म्हणे ...‘अगं तू केसांना प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदीक तेल का लावत नाहीस ? त्यामुळे डोके शांत राहुन झोपही छान लागते.'   साधी सोपी मायलेकींना चटकन अपिल होईल अशी ती जाहिरात असे. त्याकाळात पंधरा मिनिटांचे ‘रेडिओ प्रोग्राम'ही काही उत्पादनांच्या निर्मात्यांनी प्रायोजित केलेले असत. ‘क्रिकेट विथ विजय मर्चंट' हाही एक कार्यक्रम दर रविवारी दुपारी प्रक्षेपित केला जाई. आपल्या खड्या आवाजात व फडर्या इंग्रजीत विजय मर्चंट मैदानावरील व बाहेरील किस्से रंगवून सांगत असत. कोहिनूर कपड्याच्या उत्पादकांनीही काही कार्यक्रम प्रायोजित केलेले असत. नव्याने प्रदर्शित होणाऱ्या किंवा झालेल्या हिंदी चित्रपटांचा रेडिओ प्रोग्रामही तेंव्हा आकाशवाणीवर ऐकायला मिळे. अमिन सायानी, मनोहर महाजन सारखे शानदार आवाजाचे निवेदक हे कार्यक्रम खुलवत असत. शोले, गीत गाता चल, जय संतोषी माँ, अमर अकबर अँथनी, गौतम गोविंदा, परवरीश, आतिश, डॉन अशा कित्येक चित्रपटांनी आपली प्रेक्षक संख्या अशा रेडिओ कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढवीत नेली होती. तेंव्हा ‘टी आर पी' नावाची भानगड नव्हती व समाजमाध्यम नावाच्या अजस्त्र यंत्रणेचा जन्मही झालेला नव्हता.

     ‘मोअर ॲण्ड मोअर पिपल इन मोअर ॲण्ड मोअर कंट्रीज युज टोपाझ ब्लेड..' अशी एक धीरगंभीर आवाजातील निवेदकाने केलेली जाहिरात अनेकांच्या स्मरणात असेल. ‘बुलंद भारत की बुलंद तस्विर...हमारा बजाज, हमारा बजाज' ही बजाज स्कुटरची जाहिरातही अनेकांना सहज आठवण्यासारखी आहे. ‘नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड' अशी ओनिडा टेलिव्हिजनची जाहिरात पेपर, रेडिओ, टीव्हीवरुनही केली जात असे. आजमितीस टोपाझ ब्लेड,  बजाज स्कुटर आणि ओनिडा टीव्ही कुठे पहायला मिळणेही अवघड झाले आहे. कारण काय ? तर म्हणे ते काळानुसार बदलले नाहीत. मी म्हणतो काळानुसार बदललेल्यांनी काय मोठे दिवे लावलेत? जेम, केल्विनेटर, जी ई सी, झेनिथ असे रेफ्रिजरेटर बनवणाऱ्या कंपन्या होत्या. त्यांची उत्पादने दर्जेदार असत व वर्षेनुवर्षे ती हजारो कुटुंबांच्या स्वयंपाकघरात झकास सेवा देत असत. अलिकडे मात्र ‘युज ॲण्ड थ्रो' चा काळ अवतरला. ‘वस्तू जास्त कुणाकडे टिकली तर कंपन्या कशा चालायच्या?' अशी वृत्ती उत्पादकांमध्येही वाढीला लागली. त्यामुळे स्वयंपाकघरातील, माजघरातील  महिलांना सदान्‌कदा उपयोगी पडणाऱ्या वस्तू लगेच नवनव्या कशा घ्याव्यात, त्यासाठी एकत्र कुटुंबे कशी फोडून विभक्त करावीत ( म्हणजे या विभक्त कुटुंबांना स्वतंत्रपणे तेवढे फ्रिज, पंखे, मिवसर, एसी लागून त्यांंचेही खप वाढतील ) यासाठी अनेक मालिकांचे निर्माते कथालेखकांना सांगून कुटुंबातील सासवा-सुना-जावा कशा एकमेकींविरोधात कारस्थाने करीत राहतील अशी कथानके घुसडुन ती दाखवत राहतात. टीव्हीचा दिवाना बनलेला महिला प्रेक्षकवर्ग आयताच त्यांच्या हाती लागतो आणि यांचा खप वाढतो व टीव्ही मालिकांचा टीआरपीही! बघाना..नुकताच गणेशोत्सव पार पडला. पण ज्या ज्या मालिकांतील कथानके डिसेंबर किंवा मे महिन्यातील कालखंडापर्यंत पोहचली होती त्यांच्यापैकी अनेकांनी लगेच कथानकांमध्ये गणेशोत्सव घुसवले व भोळ्या भाविकांना लुभावण्याचे काम साधून घेतले.

     जाहिराती म्हणजे कमीत कमी वेळ, कमीत कमी शब्द, कमीत कमी दृश्ये आणि अधिकात अधिक परिणाम होय. एखादा पूर्ण लांबीचा लेख, बातमी, वार्तापत्र जेव्हढे नीट सांगत नसेल त्याहुन अधिक प्रभावीपणे एखादी दिड दोन मिनिटांची दृकश्राव्य जाहिरात अनेकदा सांगून जाते. देश-विदेशातील अनेकविध घडामोडींवर भाष्य करणाऱ्या अमूल दुध उत्पादक कंपनीच्या कल्पक जाहिराती आणि बॅनर्स तुम्ही पाहिली असतीलच. गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो, भारताने ट्‌वेन्टी 20 चा चषक जिंकलेला असो, पी. व्ही. सिंधुने पदके मिळवलेली असोत की बराक ओबामा, चिनी राज्यकर्ते, युक्रेन-रशिया युध्द यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय घडामोडी असोत...त्यावर अमुलवाल्यांची लक्षवेधी बॅनर्स व वर्तमानपत्रांतील सुरेख जाहिराती लगेच पहायला मिळतात. हे करणे खचितच सोप्पे काम नव्हे. त्यासाठी सृजनशील वृत्तीचे, कल्पक, मेहनती व समाजाच्या विविध स्तरात वावर असणारे कुणी वरिष्ठ पत्रकार, चतुरस्त्र कॉपी रायटर, कंटेन्ट रायटर मंडळी खपून काम करत असतात. त्यात त्यांचे नाव (शक्यतो) कुठेही नसते. त्याचा त्यांना योग्य तो मोबदला मात्र मिळतो, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो..कारण या प्रकारचे काम मीही केले आहे. २०१९ साली चितळे मिठाईवाल्यांची एक जाहिरात समाजमाध्यमांवर खूपच अग्रेषित झाली होती. कोकणात जाणाऱ्या एस टी ने एक महिला तिच्या चिमुरड्या मुलीसह प्रवास करत असते. तिला उतरायच्या ठिकाणी घ्यायला येणाऱ्या भावाला पुलावर पाणी साठल्याने मोटारसायकलने लांबचा वळसा घालून यावे लागते. रात्री उशिर झालेला असतो व थांब्यावर भरपूर अंधार असतो. विठ्ठल नावाचा तो सहृदयी एस टी ड्रायव्हर पाऊण तास एस.टी तिथेच थांबवून ठेवतो. एस टी तील अन्य मोजके प्रवासीही याबद्दल कटकट न करता शांत बसतात. मग भाऊ येऊन तिला घेऊन जातो. ती महिला नंतरच्या दिवसात त्या ड्रायव्हरचे घर रक्षाबंधनाच्या दिवशी शोधते व ‘राखी बांधू तुम्हाला ?' असे विठ्ठलला विचारते. ‘नात्यातला गोडवा जपतो आम्ही' या कॅचलाईनसह ही ५ मिनिटे १० सेकंदाची चित्रफित संपते तेंव्हा एखाद्या पूर्ण लांबीच्या संवेदनशील चित्रपटाइतका परिणाम या मिठाईच्या जाहिरातील सामाजिक संदेशाने तुमच्या मनावर केलेला असतो. ही चित्रफित पाहताना ज्याचे-जिचे डोळे भरुन येत नाहीत असे भाऊ-बहिण विरळाच ! ही जाहिरात एस टी कर्मचाऱ्यांसह जनमानसात प्रचंड नावाजली गेली.

     काही जाहिराती त्यातील जिंगल्स (काव्यमयता) आणि संगीतामुळे गाजतात. ‘हेमा-रेखा-जया आणि सुषमा सबकी पसंद निरमा' किंवा ‘ये ढेरसे कपडे मै कैसे धोऊ..अच्छा साबुन कौनसा लाऊ' या जाहिराती संगीतकार अशोक पत्की यांच्या कॅची चालींमुळे लोकांच्या तोंडात बसल्या आणि त्यांच्या घरात निरमा आणि धन्तकचा डबल बी साबण वर्षेनुवर्षे जाऊन बसले. पारंपारिकतेेने ६४ कला असल्याचे मानले जाते. प्रबंधकोशात कलांची संख्या ७२ दिली आहे. तर ललितविस्तर या ग्रंथात हीच यादी ८६ पर्यंत जाऊन पोहचते. तरी आपण त्या ६४ असल्याचे मानू या. यात जाहिरात या ६५ व्या कलेची भर पडली आहे. वीस वर्षांपूर्वी बलबीर पाशा आणि मंजुला यांच्या जाहिरातींचे फलक विविध रेल्वे स्थानके, चौक, मोठमोठाल्या ईमारतींवर झळकले होते. २००२ च्या सुमारास भारतात दोन लाखाहून एड्‌स रुग्ण आढळून आले होते. एकाहुन अधिक मार्केटींग कंपन्यांनी एकत्र येऊन ग्राऊंड झिरोवर जाऊन काम करताना कोणताही मोबदला न घेता सामाजिक बांधिलकीच्या भावनेने हे कॅम्पेन यशस्वी केलं होतं. ती जाहिरात गर्भनिरोधकांची होती. ‘हे करु नका, ते करु नका' अशा नकारात्मकतेपेक्षा काय करताना कोणती काळजी घेऊन करा याचा सकारात्मक संदेश असल्याने या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळाला व एड्‌सची महामारी रोखण्यात यश आले होते.

     ..त्यानंतरच्या काळात व्हाट्‌स अप युनिव्हर्सिटी प्रस्थापित बनून गेली नि समाजमाध्यमांचेही पीक आले. त्यावर तुम्ही आम्ही पाठवीत असलेली चित्रे, संदेश, स्व-लिखित लेख साहित्य म्हणजे एक प्रकारची आपली कलात्मक व प्रच्छन्न जाहिरातच असते की!

Read Previous

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व

Read Next

सुरूवात कोणापासून करायची?