मुशाफिरी

     वाकडेपणाने, छिद्रान्वेषी वृत्तीने, केवळ चूकाच शोधण्याच्या भावनेने पहायला गेल्यास जगातील कोणताच धर्म, रुढी, पध्दती, परंपरा, सण, उत्सव  हे परिपूर्ण आढळणार नाहीत. त्यात काही ना काही वैगुण्ये, उणीवा, त्रुटी, कालबाह्यपणा सापडणारच! तशा त्या गणेशोत्सवातही आहेत, ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. त्यातूनही जे  चांगले, विधायक, सकारात्मक असेल ते निवडून पुढे जायला हवे.

     बुधवार दि.३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा लेख वाचकांच्या हाती जाईल तोवर ठिकठिकाणच्या दिड दिवसाच्या घरगुती गणपतींचे विसर्जनही पार पडले असेल. घटस्थापना-नवरात्री (म्हणजेच दसरा) किंवा दिवाळी या मोठ्यात मोठ्या मानल्या गेलेल्या सण-उत्सवांपेक्षाही जास्त लांबीचा (दहा दिवसांचा ) हा गणेशोत्सव असून तो सातत्याने अधिकाधिक लोकप्रियता मिळवत आहे. या गणेशोत्सवाचा ‘सार्वजनिक उत्सव' म्हणून प्रारंभ, त्याचे जनकत्व टिळकांकडे की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडे, मग त्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात हा उत्सव कुठे होता, त्यानंतर शिवजयंती साजरी होऊ नये म्हणून म्हणे टिळकांनी काही सनातन्यांना हाताशी धरुन शिवाजी महाराजांवरील लोकांचे लक्ष उडावे..विशिष्ट लोकांची सोय व्हावी म्हणून याला सार्वजनिक रुप मिळवून देत त्याची जोड स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याशी घालून दिली असे केले जाणारे आरोप, नास्तिकांचे त्यावरील हल्ले, माणसाच्या धडाला असे हत्तीचे मुंडके जोडता येते का वगैरे केले जाणारे प्रश्न, हल्ली या सणाचे बाजारीकरण-व्यापारीकरण-राजकीयीकरण-इव्हेंटीकरण झाले आहे असे घेतले जाणारे आक्षेप वगैरे वगैरे सारे सोबत घेऊनही सार्वजनिक गणेशोत्सव अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आता काही जण असेही म्हणतील की लोकप्रिय काय.. तसे शाहरुख, सलमान किंवा भोजपुरी गाणीपण होतातच की! त्यात काय मोठे? लोकप्रियता हा काही तुमच्या अस्सलपणाचा, अव्वलपणाचा, दर्जा-श्रेणीचा निकष होऊ शकत नाही.

     ...त्यामुळे वाद-प्रतिवाद, आरोप-आक्षेप, हरकती, टिका हे सारे होतच राहणार. हिंदु सोडून अन्य धर्मांतही अशा अनेक समजूती, रुढी, परंपरा, पध्दती आहेत..ज्यांवर सहज टिका करता येईल. त्यातून केवळ द्वेष, आकस, कट्टरताच निर्माण होते. हा न संपणारा विषय आहे. त्यामुळे असल्या आरोपांना  उत्तरे देत बसण्यात काही अर्थ नाही. श्रध्दा, आस्था हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे. प्रत्येकाला आपापल्या श्रध्दा जपण्याचा, बाळगण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. त्या श्रध्दांचा इतरांना उपद्रव, त्रास, त्यापासून हानी, नुकसान, फसवणुक वगैरे काही होत असेल तर मात्र कायदा-सुव्यस्थेला बाधा उत्पन्न होण्याचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये याची काळजी सरकार व पोलीस यंत्रणा तसेच विचारी, विवेकी, प्रबोधनकारी व्यक्ति तसेच संस्थांनी घ्यायची असते. आपल्याला यातून चांगले, सकारात्मक, विधायक  तेवढेच घेत पुढे जायचे आहे. मागील आठवड्यात समाजमाध्यमांवरुन माझ्या हाती एक चांगले चित्र लागले..ज्यात एका गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवत असलेला डोवयावर जाळीची टोपी घातलेला मुस्लिम युवक दिसत होता व शेजारी लिहिले होते..‘पोटाचा प्रश्न सुरु झाला की जाती-धर्माचा विषयच उरत नाही.'  इतक्या कमी शब्दात केवळ एका चित्रात इतका प्रभावी, प्रबोधनपर संदेश मी अनेक दिवसांनी पाहिला.

     महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव गेली कित्येक वर्षे गणपतींच्या मूर्तींचे गाव म्हणून जगाच्या नकाशावर ओळख मिळवून आहे. ते माझे आजोळ. माझा जन्म  मुंबईतला व कल्पक देखावे, प्रबोधनकारक संदेश, आकर्षक गणेशमूर्ती, चलत्चित्रांची विविधता दाखवण्यासाठी ज्या शहराची ओळख आहे त्या कल्याणमध्ये मी लहानाचा मोठा झालो..त्यामुळे गणेशमूर्ती, त्यामागचे अर्थकारण, गणेशोत्सवाचे राजकारण, व्यापारीकरण, राजकीयीकरण या साऱ्या बाबी मी जवळून पहात आलो आहे. त्यावर लिखाण करत आलो आहे. शेकडो मूर्तीकारांच्या मुलाखती गेल्या सत्तावीस वर्षांपासून घेत आलो आहे. सजावटकार, प्रकाशयोजनाकार यांच्याशी बोलून या साऱ्या मागची प्रेरणा समजून घेत आलो आहे. सत्तावीस वर्षांपासूनच्या नवी मुंबईतील वास्तव्यात व त्याआधी मी पाहिले की बुध्दीची देवता, कडक दैवत, नवसाला पावणारा वगैरे बिरुदांनी ज्या गणपतीला पूजले, भजले जाते त्याच्या सार्वजनिक उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळात अनेक पदाधिकारी हे मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द धर्माचेही असतात. त्यांना कुणीही धरुनमारुन मंडळात आणलेले नसते..अतिशय मनापासून, स्वेच्छेने ही सारी मंडळी या उत्सवात सामील होतात. त्यांना कुणी सोवळे ओवळे, शुध्दी, पावित्र्य, मांगल्य शिकवायला जात नाही... आणि हे सारे अ-हिंदुंनी केल्याने गणपती कोपत बिपत नाही. मला माझ्या या साऱ्या बिगरहिंदु सदस्यांच्या मनाच्या उमदेपणाचे नेहमीच कौतुक व अभिमान वाटत आला आहे.  ‘चरणी ठेवितो माथा' हे गाणे गेली कित्येक वर्षे प्रचंड लोकप्रिय आहे, ते ज्या प्रल्हाद शिंदे यांनी गायिले ते हिंदु नव्हते. त्यांची मुलेही गणपतीची गाणी मोठ्या तल्लीनपणाने, भान हरपून गात आली आहेत. त्यांचा धर्म, जात याच्या आड आले नाही. लहान मुलांत सर्वात प्यारे, लाडके, प्रिय दैवत कोणते असेल तर ते गणपती! गेल्या वर्षी सुरेश वाडकर यांची नात दिया वाडकर हिने गायिलेले ‘माझा मोरया किती गोड दिसतो' हे गाणे प्रचंड गाजले. त्याचे कवी व संगीतकार प्रवीण कोळी हे नवी मुंबईकर आहेत. गतवर्षी हे गाणे अनेकांच्या कॉलरट्युनमध्ये होते.

     सण हे आपल्याला उर्जा देतात. एकत्र येण्याची संधी देतात. वैचारिक देवाणघेवाण वाढते, करोनाने माणसामाणसात निर्माण केलेले अंतर मिटवण्यातही यंदा गणेशोत्सव मोठी भूमिका बजावताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात तर अनेक मोठ्या मंडळांनी सारे भपकेबाज कार्यक्रम रद्द करत आरोग्य-तपासणी-रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय दिला होता. करोनाग्रस्तांना दिलासा दिला होता. जमलेल्या वर्गणीतील मोठा हिस्सा पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठवला होता.  मला सांगा...असे अन्य कोणत्या सणाबद्दल घडते बरे? गणेशोत्सवातील नकोशा, उपद्रवकारक, कालबाह्य बाबी बाजूला सारुन त्याच्या या सकारात्मक अंगाकडे विधायकपणाने बघायला काय हरकत आहे? ढोल, ताशे, फटाके , डीजे, आगमन-विसर्जन मिरवणुका वगैरे बाबी प्रमाणात असल्या तर त्याचा कुणालाही त्रास होणार नाही. अति सर्वत्र वर्ज्ययेत..! ‘मशिदीची सकाळ-संध्याकाळची बांग स्पिकरवरुन नको' असे म्हणताना आपल्याही ‘आवाजी' सणांबद्दल आपण जागरुक राहिलो तर कुणाला तक्रारीची संधीच मिळणार नाही. माझ्या निरीक्षणानुसार गणेशोत्सव हा असा एकमेव सार्वजनिक उत्सव आहे की जो हिंदुंचा एक धार्मिक उत्सव असूनही त्यात सर्वधर्मियांच्या कलागुणांना वाव दिला जातो. गणपतीच्या मंडपात सर्वधर्मसमभावाबद्दल व्याख्याने दिली जातात. त्यात मुस्लिम विचारवंतही येऊन गेले आहेत. गणेशमंडपात अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावून ‘चमत्कारांमागचे विज्ञान' व त्याबद्दलची प्रात्यक्षिके सादर करणारे कार्यक्रम आयोजित करुन देण्यात मीही पुढाकार घेतला आहे व त्याला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही सार्थ प्रतिसाद दिला आहे. एवढा लवचिकपणा इतर कुणाच्या सणांत पहायला मिळेल बरे? यंदा तर गणेशोत्सवात अंधश्रध्दा निर्मुलन विषयक देखावे करणाऱ्या मंडळांना महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे असा शासन निर्णयच ( जी.आर. ) जारी करण्यात आला आहे.

     आस्तिक विरुध्द नास्तिक, श्रध्दाळू विरुध्द अंधश्रध्दा निर्मुलनवाले, देवभोळे विरुध्द देवांच्या मूर्त्या फेकून द्या म्हणणारे अशी टोकाची दुश्मनी येथे उपयोगाची नाही. कारण हा देशच मुळी विविध जाती-धर्म-रुढी-परंपरा-चालीरीती-भाषा-समजुती यांना मानणाऱ्या अनेकविध गटांनी बनला आहे. त्या साऱ्यांच्या त्याग, समर्पणाच्या जोरावर  परक्या शक्तिवान आक्रमकांविरोधात लढा देऊन या देशाने स्वातंत्र्य मिळवले आहे व त्याचा यंदा आपण अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत. जाति-धर्माच्या नावावर या देशाचे आणखी विघटन आपल्याला कधीच परवडणार नाही. परस्परांच्या धर्मांतील चांगल्या, लोककल्याणकारी, विधायक बाबी एकमेकांनी स्विकारायला हव्यात. फुटीरतावादी, कट्टरतावादी, अलगतावादी, विघटनवादी बनण्याऐवजी समन्वयवादी, विवेकवादी बनू या. त्याची संधी गणेशोत्सव किंवा अन्य धर्मियांचे सण देत असतील तर तिचा जरुर लाभ उठवू या. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातून राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद