विखारी प्रवक्त्यांचा महाराष्ट्रालाही रोग...

देशाचं सरकार जणू आपणच चालवतो, अशा तोर्‍यात सध्या प्रवक्ते सुटले आहेत. दुसर्‍यावर चिखल फेकलं की आपण सौजन्य मूर्ती होतो, असा या प्रवक्त्यांचा दावा असावा इतक्या विकृत पध्दतीने ते आपले मुद्दे मांडतात. समाजात दुहीची पेरणी करणारे हे प्रवक्ते केंद्रातल्या सत्तेला कधीतरी अडचणीत आणतील, हे स्पष्टच दिसत होतं. मात्र तरीही त्यांच्याकडे डोळेझाक केली जात होती. कोणाच्याही सहज लक्षात येईल, इतकं दुर्लक्ष त्यांच्याकडे होत होतं. नुपूर शर्मा ही प्रवक्ताही याच पठडीतील. तिने तोडलेल्या तार्‍यांनी देशाला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. मुस्लिम धर्मियांचे सर्वेसर्वा महंमद पैगंबर यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करत, त्यांच्यावर विकृत आरोप करत नुपूर यांनी अकलेचे बारा वाजवले. आपण खूप काही तीर मारलाय असं त्यांना झालं असेल. चेहरा पाहिल्यावर नुपूर खरंच सौजन्याच्या मूर्ती वाटायच्या. पण तोंड उघडलं की त्या बेसूर आणि विकृतीच्या महानायक वाटू लागतात. एकट्या भाजपमध्ये असले बोलघेवडे आहेत, असं मानायची आवश्यकता नाही. सगळ्याच पक्षांनी असल्या वाचाळांची फळी आपली बाजू मांडण्यासाठी उभी करून ठेवली आहे. प्रवक्त्यांनी आपल्या पक्षाच्या धोरणांविषयी बोललं पाहिजे. आपल्या सरकारची बाजू घेतली पाहिजे. सरकारी धोरणाविषयी लोकजागृती करावी अशी अपेक्षा असते. ते करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला रोखण्यासाठी प्रसंगी तिला घालून पाडून बोलण्याची प्रथा भाजपच्या प्रवक्त्यांनी जोपासली आहे. समोरच्या प्रवक्त्याला नामोहरम करण्यासाठी आपण वाकडंतिकडं बोललंच पाहिजे, असं जेव्हा प्रवक्त्यांना वाटतं तेव्हा परिणाम गंभीर होतात. सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता बोलतो तेव्हा तर त्याची जबाबदारी मोठी असते. भाजपच्या किती प्रवक्त्यांना जबाबदारीची जाणीव आहे, ते एकूणच परिस्थितीवरून लक्षात येतं.
नुपूर शर्मा हे निमित्त आहे. महाराष्ट्रापासून देशभरात भाजपची बाजू घेणारे असंख्य प्रवक्ते हा नुपूरचाच अवतार असल्याचं जाणवेल. विरोधी सरकारच्या मंत्र्यांबरोबर बोलतानाही भाजपचे प्रवक्ते स्वत:ला आवरू शकत नाहीत, हे महाराष्ट्रातील जनतेने डोळे उघडे ठेवून पाहिलंय. संयम हा दाखवण्यासाठी नसतो. तो कृतीतून दिसला पाहिजे. संयम ढळला की संपलं. विरोधक डिवचतो म्हणून तुम्ही मेंदू रिकामा ठेवू शकत नाही, याची जाण प्रवक्त्यांना नाही. आपली बाजू अधिक स्पष्टपणे यावी, अशी अपेक्षा चुकीची नाही. पण ती येण्याऐवजी समोरील कसा नालायक आहे, हे दाखवण्याचीच स्पर्धा वाहिन्यांवर पाहायला मिळते. त्यात आग लावण्याचा पराक्रम अँकर करत असतात. आजवर असल्याच अँकरमुळे देशात अराजक परिस्थिती उद्भवलीय, हे लक्षात येईल. पातळी सोडून बोलणार्‍यांची हकालपट्टी करण्याची हिंमत किती अँकरनी केली हे शोधलं तर हाताच्या बोटाइतकेही मिळणार नाहीत.

देशात निर्माण झालेल्या प्रवक्त्यांच्या फळीत सर्वाधिक वाचाळ प्रवक्ते हे भारतील जनता पक्षाच्या पॅनेलवर आहेत. खोट्या माहितीच्या आधारे समोरच्यावर दबाव टाकण्याचं तंत्र भाजपने आपल्या प्रवक्त्यांना पध्दतशीर शिकवलेलं दिसतं. संभित पात्रा असो वा गौरव भाटीया यांनी तर सार्‍या मर्यादा सोडल्या. त्यात आता नुपूर शर्मासारख्या वाचाळांची भरती झाल्यावर भाजपच्या नेत्यांना आणि श्रध्दाळूंना हायसं वाटत असेल यात नवल नाही. पण ट्रिलियन डॉलरवर प्रवक्ते उताणे पडतात, हनुमान चालिसा म्हणताना उघडे पडतात तेव्हा किमान पक्षाने दखल घ्यावी? अशा घटनांवेळी प्रवक्त्यांची तोंडं पाहण्यासारखी असतात. नापास झाल्यावर त्यांना आठवतात राहुल गांधी आणि सोनिया गांधी. देशभरात त्या पक्षाने असे 38 प्रवक्ते पोसलेत. ज्यांनी खोट्याचं खरं करत देशातल्या लोकांना फसवलंय. याद्वारे त्यांनी सत्तेला आणि भाजपलाही अडचणीत आणलं. वकूब असलेल्यांची संख्या रोडावू लागल्यावर असले वाचाळ त्यांची जागा घेत असतात. पुलावरून पाणी जाऊ लागल्यावर आता या वाचाळांना तोंड आवरायला सांगावं लागलं आहे. आजवरच्या त्यांच्या टिपण्ण्या देशातील दिवंगत पंतप्रधानांविषयी असायच्या. टीका होऊनही कोणी फारसं त्यांना मनावर घेतलं नाही. प्रवक्त्यांची लायकी काढत या बाबी नजरेआड करण्यात आल्या. मात्र थेट पैगंबरांवरच हल्ला होतोय म्हटल्यावर त्याचे परिणाम होणं स्वाभाविक आहे. जे देशात व्हायचं ते आखातात दिसू लागलं. कारण देशात कितीही दाद मागितली, न्यायाचा प्रयत्न केला तरी सरकार त्यांची दखल घेत नाही, हे लक्षात घेऊन लोकंही आता स्वत:लाच समजावू लागली आहेत. नुपूरच्या प्रकरणाने हेच दाखवून दिलंय. आखाती देशांनी पैगंबरांवरील लज्जास्पद टिपण्णीचा जाहीर निषेध केला आणि भारताची लाज रस्त्यावर आणली. पंतप्रधान मोदी यांचे चप्पलचा छाप असलेले फोटो कचरा कुंडीवर पाहण्याची नामुष्की देशवसीयांवर ओढावली. लाज निघाल्यावर निलंबनाचं निमित्त करण्यात आलं. भाजपतील प्रवक्त्यांनी सत्ता आल्यापासून 2700 वेळा वादग्रस्त वक्तव्यं करत भारताला मान शरमेने खाली घालायला लावली. तेव्हा देशाच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ नको, असं छातीचा कोट करून सांगणार्‍यांना आज याचं गांभीर्य कळलं असेल तर नशिब. आता हातातून निसटल्यावर पळता भूई थोडी झाली. देशात वाद आणि दंगेसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. ज्या 38 प्रवक्त्यांची नावं पुढे आली त्यातल्या 27 जणांंवर तर तुम्ही धर्मावर बोलायचं नाही, अशी अट घालावी लागली. सरकार आपल्या शिरावरच चालतंय, अशी शेखी मिरवणार्‍या अनंतकुमार हेगडे, शोभा वरंदलाजे, प्रत्मा सिम्हा, महेश शर्मा, टी.राजा सिंह, विक्रमसिंग सैनी, साक्षी महाराज, संगीत सोम, नुपूर शर्मा यांना रोखण्याची वेळ भाजपवर ओढावली. संभीत पात्रा, गौरव भाटीया यांच्यासारख्या प्रवक्त्यांच्या जिभेमागून चालणार्‍या वात्रटिका लक्षात घेता ते कधीतरी पक्षाला अडचणीत आणतील, हे कोणीच लक्षात घेतलं नाही. या दोन वाचाळ प्रवक्त्यांनी कंमरेचं सोडल्याचा परिणाम असा झाला की इतरांनीही आपली मर्यादा ओलांडली. महाराष्ट्रातही अशा प्रवक्त्यांची कमी नाही. प्रवक्ते नसलेले तर वाचाळवीरच आहेत. स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांचीच तोंडं इतकी फाटकी आहेत, तिथे इतरांना काय वाटोळं सांगणार? भालचंद्र शिरसाठ, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर असल्या प्रवक्त्यांनी प्रदेश भाजपला आधीच खड्ड्यात घातलंय. त्यात आता चित्रा वाघ, राम कदम यांची भर भाजपला खायित टाकेल, हे सांगायला नको. विनायक आंबेकर या प्रवक्त्याच्या घरावर हल्ला करण्याची वेळ येईपर्यंत राज्यातल्या नेत्यांना जाग येत नाही. किरीट सोमय्यांसारखे वाचाळवीर टीका करताना कसलाच विचार करत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर, त्यांच्या कुटुंबियांवर टीका करण्यासाठी त्यांनी गाठलेली खालची पातळी पक्षाची इज्जत रस्त्यावर आणायला कारण ठरली. सातत्याने तोेंड वाजवणारे नितेश राणे यांच्यासारख्या बिनप्रवक्त्यांना तर काय बोलावं आणि काय नाही, याचेही धडे नाहीत. तेव्हा प्रवक्त्यांमधली विकृती ही दिल्लीतच नव्हे तर समृध्द महाराष्ट्रातही पोहोचली आहे, हे लक्षात येते.


विकृतीची हद्द तेव्हा पार पडली जेव्हा असल्या वाचाळांचं उघड समर्थन भाजपचे नेते करू लागले. नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या प्रवक्त्यांच्या उद्दामपणानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असला तरी पक्षातल्या अनेक नेत्यांना तो रुचलेला नाही. पक्षाने कारवाई केल्यावर याच पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेली खासदार साध्वी प्रज्ञासिंग हिने उघडपणे नुपूरच्या वक्तव्यांचं समर्थन केलं आहे. मुस्लिम, ख्रिस्तांविरोधी आग ओकणार्‍यांचं खुलेआम समर्थन करणार्‍यांकडे दुर्लक्ष करून कारवायांचं महत्व पक्षानेच कमी केलं आहे. यामुळे निलंबनाची कारवाई म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, असं दाखवण्याचा प्रकार म्हणता येईल. भारतात धार्मिक उन्माद घडवणार्‍यांच्या मुस्कटं खुली ठेवण्यात आल्याचे परिणाम कधीतरी दिसणारच होते. एकीकडे गोहत्येच्या निमित्ताने देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जात असताना दुसरीकडे मशिदींच्या जागांवर मंदिरांच्या अस्तित्वाचं कारण देत देशात अराजकता निर्माण करणार्‍यांवर यंत्रणेचा काहीही धाक नाही. तो असता तर जगभरातील मुस्लिम देशांना भारताचा निषेध करावा लागला नसता. भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा लागला नसता. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सत्तेच्या उकिरड्यावरचे मुंगळे... !