आंबा

विदेशातील आरामको ही एक सौदीस्थित अमेरिकन टि्‌वन नेशनल जागतिक दर्जाची तेल कंपनी. त्यांतील दाहरान येथील अल-मुनिराह केंम्पस मधील एकमेव सुपर मार्केटला अमेरिकन्स असं बोलतात. हे मला त्यावेळी प्रथमच कळलं. तसं इंग्रजी-अरेबिक भाषे मध्येही ठळकपणे बोल्ड अक्षरांत लिहिलेलं होतं. प्रथम दिनी ओरिंएटेशन मध्ये त्या विषयीं कसलीच माहिती ना कंपनी प्रतिनिधी कडून देण्यांत आली ना आम्ही त्यावेळी उपस्थित न्यू हायर्स ग्रुपने विचारली! शेवटीं एका माहितगार व्यक्तीकडून माहिती घत थेट कोमीसारी मध्यें प्रवेश केला. नवीनच..तेही तत्काळ आयडी कार्ड मिळाल्याने आत प्रवेश सहज मिळु शकला. आम्हीं नवीन असल्याचे आमचा चेहराच सांगत असावा. इतरत्र खाद्यपदार्थ ज्या दरांत विकले जात असतील त्यापेक्षा दहा ते वीस टक्यांनी कमी दरात खाद्यवस्तु मुबलक प्रमाणात ठेवलेल्या होत्या. थोडक्यात काय तर आपल्या देशातील खेड्यात जसं सरकारमान्य रास्त दराचे राशन दुकान असतं तोच हा काहीसा सुधारित पाश्चात्य अवतार! 

माझं लक्ष लगेच तेथील फळ विभागाकडे गेले. विविध प्रकारची ताजी फळं तेथे विक्रीस ठेवलेली होती. महिना जानेवारी असूनही तिथल्या फ्रोझन रॅकवर देखणे, केशरी रंगाचे मध्यम आकाराचे गोल आंबे विक्रीस ठेवलेले होते. तेथे दर विचारायची पद्धत नव्हती. प्रत्येकाला रेटटेग लावलेला होता. आंबे झांबिया या आफ्रिकन देशातले होते, तशी तेथे नाेंद केलेली दिसली. विशेष म्हणजे तेथे केळी सुद्धा वजनावर विकली जातात, हा प्रकार मला नवीन वाटला. आपल्याकडे हापूसची दोन-चार डझनी पेटी मिळते. तर केळी ही डझनावारी विकली जातात. ते कॉमिसारीमध्ये नव्हते!!

हे विवरण देण्यामागचा हेतू एवढाच की मार्च ते मान्सून सुरू होई र्पयंत आपल्याकडे मंबंई-पुणे-बंगळुरू आणि इतरत्र फळ मंडईतून सर्व प्रकारचे आंबे उपलब्ध असतात. मात्र तद्‌नंतर मंडईतला उलगलेला आंबा पुढे त्याचा रस आगोटीच्या ऊन्हात वाळवून त्याची आमपोळी तयार केली जाते. चविष्ट आंब्याचे साठे केले जातात. विविध प्रकारचे मसाले वापरून आंबट-गोड लोणची केली जातात. पिक्या आंब्याचा आमरस डबा-बाटलीबंद केला जातो व वर्षभर पुरवला जातो. पण तिकडे आखाती देशात मात्र असला प्रकार नसतो. प्रत्येक महिन्याला विविध देशातून आंबा आयात करून खवय्यांना सहज उपलब्ध होत असेल तर पुढील फळ प्रक्रिया कोण करणार? म्हणजेच बारोमास आंबा आयात करून विकला जातो. देशा-विदेशातील आंबा तेथे उपलब्ध असतो. हा एक वेगळा अनुभव होता. त्यांना पल्प, साठे, लोणची इत्यादि प्रकार त्यावेळी ज्ञात नसतील कदाचित. आजही त्याची आवश्यकता नसावी. असो.

अगदीं तोच प्रकार अलीकडे जेव्हां नवी मुबंई येथील एपीएमसी भागांत गेल्यावर मी अनुभवला. मार्च महिन्यात महाराष्ट्र तसेच कर्नाटक व इतर राज्यातून विविध प्रकारच्या आंब्याची आवक सुरू होते तेव्हां काळ्या आणि लालमातीतले आंबे सर्वत्र खुलून दिसू लागतात. तशी सजावटच तेथे केली जाते. मी स्वतः आंबा बागायतदार असूनही काही क्षण गाेंधळून गेलो. कोकणातला रत्नागिरी हापूस म्हणजे खवय्यांची प्रथम निवड. डॉलर मिळवून देणारे सोनेरी पीक! त्यातच रत्ना, केशर, राजापूर, पायरी आंबे सुद्धा तसेच सजवून ठेवलेले!! बागायती तसेंच डाेंगरी हापूस हे दोन्ही प्रकार त्या फळ मंडईत विक्रीसाठी ठवलेले दिसतात. खवय्ये त्यावर तुटून पडतात! अगदी आजही तेच चित्र दिसेल.

तुम्ही कितीही आंबेतज्ञ असाल पण वाशी मार्केटमध्ये माणूस पार बावरुन जातो. अनेक जातीचे, विविध प्रांतातील लहान मोठ्या आकाराचे रंगीत आंबे घाऊक दरात विकले जातात. ग्राहक आंबा चवीनुसार हमखास खरेदी करताना दिसतील.

एकदां भर उन्हाळ्यात गावाहून मी रत्नागिरी येथें जात असताना संगमेश्वरच्या टेपीवर गाडी रस्त्याच्या कडेला स्थानिक तीन-चार गृहिणी रायवळ आंबे विकत असल्याचे पाहिले. आंबे टोपलीत ठेवलेले होते. तेव्हाच माझ्या ध्यानी आले की जो मान-सन्मान हापुसला मिळतो, जी  मागणी इतर कलमी आंब्याना मिळते तो मान रायवळ आंब्याना मिळत नाही. त्याला मंडई, मॉल किंवा इतरत्र बाजारपेठ केव्हांच मिळत नाही. स्थानिकांना कायम उन्हात, झाडाच्या सावलीत, रस्त्यालगतच येऊन बसावे लागते. मंुबईहून कोकणात येतांना गोरेगांवच्या वळणात सुध्दा स्थानिक महिला टोपलीत रायवळ आंबा घऊन विक्रीस बसलेल्या दिसतात. मात्र तेथील बाजारपेठ मोठी असल्याने स्थानिकांपेक्षा प्रवासी किंवा इतर पर्यटक आपापल्या गाड्या थांबवून रायवळ आंबा खरेदी करतांना दिसतात. तेंव्हा मनास समाधान प्राप्त होते.

माझ्या गावी निमुर्डे वाडी लगत वायंगणकर वाडी (पंचनदी) आहे. मे महिन्यांत बहुतांश चाकरमानी कुटुंबातील अनेक लोक हमखास गावी येऊन आपापल्या घरीं मस्त रमतात. शहरी वातावरण आणि गावातलं स्वच्छ हवेशीर जगणं यांतील फरक त्यांना नक्कीच कळतो. ते सर्व एकजुटीने गावी येतात, लाईटचा उपद्रव कितीही असला तरीही ते गावातल्या जगण्याचा मनस्वी आनंद घतात. हापूस आंबा तोही पिका, साऱ्यांनाच भावतो. असेच एकदां तीन-चार गृहिणी अचानक दिवेलावणीच्या वेळीं माझ्या राहत्या घरी आल्या. स्वच्छ धुतलेले चविष्ट जाम त्यांना खायला दिले. त्या मूळच्या शहरी पण पंचनदी त्यांची सासुरवाडी! एकमेकांची ओळख झाली. खरं तर पिका आंबा खरेदी करायचा बेत होता त्यांचा. लगेचच मी दोन पिके हापूस आंबे कापून त्यांना खायला दिले. पण त्या मुली जाणकार होत्या. शहरातील नामवंत कंपनीत कार्यरत होत्या. सुशिक्षित होत्या. त्यांना रायवळ तोही आडीचा रायवळ आंबा विकत घ्यायचा होता. पूर्ण माहिती घऊन त्या माझ्या घरी आल्याचे त्यांनीच बोलून दाखविले. मी आतल्या-आत हसलो. तीन विविध रायवळ झाडांवरचे  रायवळ आंबे मी आडी लावून ठेवले होते. ती आडी त्यांना दाखवली. प्रत्येक झाडावरील आंब्याची चव ही वेगळी असते, हे त्यांना विशेष सांगावेसे वाटले. रायवळ आंबा एरव्ही कसाबसा विकला जातो; पण असा आग्रहाने रसिक रायवळ आंबा बोलल्या किंमतीत विकत घतील, तो खरं तर माझा पहिलाच अनुभव!!

लहानपणी एक आज्जी रायवळ आंबा विकण्यासाठी म्हणून आमच्या वाडीत यायची. म्हणजेच काय तर असा दारोदारी फिरून रायवळ आंबा विकावा लागत असे त्यांना. आज चक्क शहरी माणसं हापूस नको तर रायवळचा आग्रह करतांना दिसली त्यामुळे मन तृप्त झाले. 

रायवळ आंबा हा कदाचित नाशिवंत असल्याने (अपेक्षेपेक्षां लवकर नासला जातो म्हणून कदाचित) कोकणातून हापूस जसा पेटीत भरून शहरी मंडईत धाडला जातो तसा मान रायवळ आंब्यास मिळणे अवघड आहे. रायवळ आंबा उतरवून झाल्यावर त्याची आडी लावावी लागते. किमान सात दिवस तरी जातात. आडी म्हणजेच गवती आवरणात ठेवलेला कच्चा  आंबा. सात दिवसाने खायला तयार मिळतो. आकाराने खूपच लहान असला तरीही चवीला गोड! त्याच्या पलेव्हरला तोड नाही. कलम नसलेल्या झाडावरचे आंबे, ते रायवळ आंबे! त्या झाडाचे सांगोपन, निगा फक्त निसर्ग करतो. पावसाळ्यात पाणी मिळते. वाहून आलेल्या केरकचऱ्याचे त्यांस नैसर्गिक खत मिळते. एकूण काय तर रायवळ आंब्याचे झाड तसे पूर्ण स्वावलंबी असूनही पीक मात्र इतरांना देते! हिच तर खरी निसर्गाची किमया आणि शिकवणही!

रायवळ आंबा पूर्ण  पिकल्याखेरीज त्यांस रंग येत नाही. फळ विषेशतः एकाच आकाराचे असेल असेही नाही. पिकल्यावर त्यांस हापूस किंवा इतर आंब्यागत सुरी-चाकूने कापता येईल असं ही नाही. रायवळ आंबा कायम चुपुन खाल्ला जातो. असा हा गावरान आंबा कायमच दुर्मिळ होत चालला आहे. ग्रामीण भागातील दुर्लक्षित झाड ते रानटी झाड. त्यावर मोहोर येतांच औषध फवारणी केली जात नाही. फांद्याची डागडुजी आवश्यक समजली जात नाही. कदाचित शेतकऱ्यांना रायवळ आंब्यापासून विशेष आर्थिक फायदा मिळत नसावा, हेंच कारण असावे किंवा आंबा झाडावरून उतरवणे ही एक खूपच खर्चिक आणि किचकट बाब होय. आकाराने लहान असलेले हे गावरान फळ झेल्यात येते कमी व जमिनीवर पडते जास्त! म्हणजेच नुकसान जास्त होते व पिकल्यावर त्यांस बाजारपेठ मिळत नाही. कारण फळ जास्त काळ टिकत नाही. एकूण काय, तर घाटे का सौदा! 

 रायवळ आंबा हा गावरान म्हणून दुर्लक्षित आहे का? का त्याचा पल्प केला जात नाही ? केल्यास तो टिकत नाही, म्हणून? रायवळ आंबा हा रानटी किंवा गावठी अशी ह्याची ओळख पूर्वी होती ती आजही तशीच आहे. विद्यापीठाच्या फळप्रक्रिया विभागाने यावर जर काही शास्त्रीय संशोधन केले असल्यास ते ग्रामीण शेतकऱ्यांर्पयंत जाऊ शकेल, असे सेमिनार घतल्यास रायवळ आंबा दुर्लक्षित राहणार नाही व पुढे शेतकरी संशोधनात्मक दूरदृष्टिकोन ठेऊन व्यवसाय करू शकतील.

वनोशी (दाभोळ) येथील एक अभ्यासू व्यक्तिमत्व जे आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही त्यांनी परिसरातील अनेकांना रायवळ आंबा लागवडीसाठी प्रेरित केले, त्या म्हणजे स्वर्गीय आशाताई लुकतुके मॅडम. त्यांनीच सांगितल्यामुळे प्रायोगिक म्हणून का होईना, मी बागेच्या कुंपण-फेन्सिंग धरून जून महिन्यात आजवर शंभर तरी आंबा कोय (बाट) लावली आहे. त्यांतील काहींनी आज पीक द्यायला सुरू केले आहे. अशा झाडांची मुद्दामच लागवड केली गेली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. अन्यथा कोकणातून रायवळ आंबा संस्कृती नाहीशी होईल. तिचं जतन केलं गेलं पाहिजे.हा एक नैसर्गिक ठेवा आहे. 

पूर्वी लहानपणी कोकणी मुस्लिम घरांतून मातीच्या भांड्यातून जेवण वाढलं जायचं. पडपड आंब्या पडीच्या, नाही पडलास तर आडीच्या असं एक स्लोगन आम्हां बच्चा कंपनीचे असायचे. रायवळ आंब्याच्या झाडाखाली आम्हीं एखादं फळ खाली पडेल या आशेने धमाल करत असू. एखादा अडद पिका आंबा नशिबाने मिळाल्यास गृहिणी त्याचे लगेच आंबट-गोड असे ‘कुवल’ बनवत असत. आंबा चुलीत नीट भाजून घतल्यावर त्याचा गर हातानी कुसकरून त्यांत लाल मिरची, बारीक किसलेला कांदा, चवीनुसार मीठ व गोडीनुसार गूळ असे मिश्रण तयार केले जायचे व ते कुवल वरण-भाता सोबत खाल्ले जायचे. विशेष म्हणजे आंब्याचा चविष्ट कुवल हा सानकेत (मातीच्या भांड्यातुन) वाढला जात असे. आता चुलीच गायब झाल्या तर असे गावठी प्रकार तयार होणार कसे? जवळपास नामशेष झालेत, हे वास्तव आहे.

दापोली कृषी विद्यापीठालगत बुराेंडी नाक्या र्पयंत गाडी रस्त्याच्या दुतर्फा अनेक प्रकारचे आंबे विक्रीस ठेवलेले दर वर्षी दिसतात. अशी सजावट केवळ हापुसलाच मिळते. त्याच रांगेत काेंकणी गावाकडला गावरान रायवळ आंबासुद्धा विक्रीस ठेवला जाईल.. हिच सदिच्छा. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 सगळ्यांचीच विश्वासार्हता मातीत!