मुक्तांगण - छोट्या दोस्तांसाठी धमाल बालकविता
मोठ्या वयाच्या माणसाने मनाने लहान होवून लहानांच्या भाव भावना शब्दात मांडणे सोपे नाही. मुक्तांगण बाल काव्यसंग्रहात सौ. चित्रा बाविस्कर यांनी तो प्रयत्न केला. हा पूर्ण कवितासंग्रह हस्तलिखित अक्षरांचा आहे. कलेच्या बाबतीत या संग्रहावर खुप मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. या कथासंग्रहात एकूण ८१ कविता आहेत. काही पाने निव्वळ सुंदर चित्रांची आहे. हे एक देखणे पुस्तक असून त्याची किंमत ३२०/ रूपये आहे. बालकांसाठी इतक्या किंमतीचे पुस्तक विकत घेणारे पालक लाभले पाहिजेत.
ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित, कवयित्री सौ. बाविस्कर लिखित मुक्तांगण हा बालकवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. सौ.बाविस्कर ह्या नवी मुंबई महापालिकेतील एक कर्मचारी.. टप्प्याटप्प्याने त्या मोठ्या अधिकारी झाल्या होत्या. मागील ३१ डिसेंबर रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे सात/आठ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यापैकी मुक्तांगणबद्दल मुक्त चर्चा करणार आहोत. कवयित्रीच्या नावात चित्रा असल्याने या काव्यसंग्रहाचे नाव चित्रांगण असायला हवे होते, असे मला वाटले. पण ते नाव थोरामोठ्यांनी दिले आहे, असे त्यांनी मला सांगितले आहे. या बालकवितांच्या संग्रहास डॉ. श्रीपाल सबनीस या मोठ्या साहित्यिकाची प्रस्तावना लाभली आहे. ते आपल्या प्रस्तावनेत लिहितात - श्रीमती बाविस्कर यांची बालकविता नाजूक, तरल भावनांची आहे. नवनव्या कल्पना त्यांनी यात अविष्कारीत केल्या आहेत. निसर्ग किमया, मानवी अनुबंध मांडताना त्यांची निरिक्षण दृष्टी दिसते. प्राण्यांची शाळा त्यांच्या कवितांतून आली आहे. त्यांची कविता विज्ञानास साद घालणारी ठरते. संपूर्ण जगाने निरागस बनावे, आनंदी व्हावे असे कवयित्रीस वाटते. बालमनाची स्पंदने टिपणारी त्यांची कविता आहे. आपल्या मनोगतात कवयित्री लिहितात - बालक पालक संवाद होणे काळाची गरज आहे. या कवितांतून बालमनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
हा बालकवितांचा संग्रह सर्वांना प्रिय वाटो. १७६ पानांचा हा संग्रह पूर्णता आर्ट पेपरवर छापला आहे. प्रत्येक कवितेभोवती रेखीव चित्रे आहेत. शैलेश भुसे, पुणे यांची मांडणी आहे. हा पूर्ण कवितासंग्रह हस्तलिखित अक्षरांचा आहे. कलेच्या बाबतीत या संग्रहावर खुप मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे. या कथासंग्रहात एकूण ८१ कविता आहेत. काही पाने निव्वळ सुंदर चित्रांची आहे. हे एक देखणे पुस्तक असून त्याची किंमत ३२०/ रूपये आहे. बालकांसाठी इतक्या किंमतीचे पुस्तक विकत घेणारे पालक लाभले पाहिजेत. पहिली कविता - ‘पावसाची बासरी' नावाची आहे. ही प्रतिमा छान आहे. रेखाचित्रही छान आहे. पुस्तकं नावाच्या कवितेत - पुस्तकं स्वतः गप्प राहतात, वाचायल बोलायला शिकवतात. ह्या ओळी लक्षवेधी आहेत. ढुम ढुम ढग - या कवितेत - ढुम ढुम ढगातून, आला पाऊस, स्वागत त्याचे करू - या ओळीत सहजता आहे. पक्षांची शाळा - चिव चिव चिमणी ये गं ये, दाणे देते घे गं घे .या काव्य ओळी मुलीचे लाड करतो तशा आहेत. मनीची मंगळागौर - या कवितेत तिसऱ्या ओळीत मणी शब्द आलाय तो मनी असायला हवा होता. रंगांची सभा - या कवितेत सात रंगांची सात कडव्यात मांडणी केली आहे. ही कल्पना छान आहे.
आला फुगेवाला - आला फुगेवाला आला, चाळीत गळका झाला - या कवितेत शब्दचित्र उभे राहिले आहे. पिंज-यातील पोपट - पिंज-यातील पोपट उडला कुठे? आकाश त्याला मिळेल तिथे. या काव्य ओळीत यमक नाही. सहजता आहे. पावसाचे ताल सूर - रिमझिम पाऊस झुळझुळ वारा, तालासुरात दुमदुमला आसमंत सारा- ही काव्य ओळ पावसाची सुरवात नजरे समोर दृश्य उभे करते. हे शरण तुला विज्ञाना - प्रगतीची शिखरे गाठली, कृपा ही तुझीच दयाघना, हे शरण तुला विज्ञाना - आजची सर्वागीण प्रगती ही विज्ञानाचीच कामगिरी आहे. मुलांच्या कोवळ्या मनावर बिंबवण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. बैलपोळा - बैलपोळा सर्जा राजाचा सण, आपण त्याचे ऋणी होऊ या, बैल पोळा साजरा करू या. या शेवटच्या कवितेत एक मोठा संदेश आहे. शहरातील मंडळी शेतीपासून/गावापासून दुर आहेत.
त्यांना अन्न धान्य कसे पिकते? कोण कष्ट करते ते दिसत नाही. त्याचे कुतूहल जागे करणारी ही काव्यपंक्ती आहे. मोठ्या वयाच्या माणसाने मनाने लहान होवून लहानांच्या भाव भावना शब्दात मांडणे सोपे नाही. मुक्तांगण बाल काव्यसंग्रहात सौ. चित्रा बाविस्कर यांनी तो प्रयत्न केला. इंदिरा संताच्या ‘गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे, तुझा लळा.' किंवा बालकवींच्या - ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चहूकडे, क्षणात येई सर सर शिरवे, क्षणात येऊन उन्ह पडे.' इतक्या उंचीच्या त्या कविता नसल्या तरी निसर्ग सुंदर, लाडी गोडी करणा-या, नाजूक भावनांच्या आहेत. हेही नसे थोडके. बालकविता गुणगुणत लिहिल्या तर ती गाणी होतात. सहज सोपे शब्द योजले तर मोरपीस होतात. गवतावरचे दवबिंदू, फुलावरचे फुलपाखरू, हसणारे लेकरू, चिवचिवणारे पाखरू, झाडावरची खारू या निसर्गाने प्रत्यक्षात आणलेल्या कविताच आहेत. त्यासाठी लहान होता आलं पाहिजे. हेच या बाल काव्यसंग्रह परिक्षणाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.
मुक्तांगण - छोट्या दोस्तांसाठी धमाल बालकविता
प्रकाशक- ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन्स पुणे
पाने - १७० किंमत- ३२०/रु.
- गज आनन म्हात्रे