मनाचे श्लोक लेखमाला

मना सर्व जाणीव सांडूनि राहे आपल्या विद्येचा, बुध्दीचा, सर्व सामर्थ्याचा दाता भगवंत आहे. साऱ्या ऐश्वर्याचे तो अक्षय भांडार आहे. मग त्याच्याहून अधिक विद्वान, अधिक सामर्थ्यवान, अधिक श्रेष्ठ कोणी असू शकेल का याचा माणसाने विचार करावा आणि आपल्या क्षुद्र, नश्वरदेहाचा, मय्राादित बुध्दीचा वृथा अभिमान सांडावा. परब्रह्मस्वरूप सद्गुरूंना शरण जावे, आपले इहपर हीत साधावे आणि अखंड समाधानात रहावे.

जनी हीत पंडित सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षेस जाले।
तयांहूनि वित्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडूनि राहे । श्रीराम ११३।

आत्महीताकरिता वादविवाद सोडून सुखकारक संवाद करावा हे समर्थ सांगत आहेत. मानवाच्या संपूर्ण ऐहिक व पारलौकिक कल्याणासाठी समर्थ मनाला बोध करीत आहेत. वादविवाद होण्याचे मुख्य कारण आहे ‘अहंकार'. कोणत्याही विषयावर चर्चा करताना जेव्हा मूळ मुद्यापेक्षा स्वतःचा अहंकार वरचढ ठरतो तेव्हा चर्चा संपते आणि विवाद सुरू होतो. माझेच बरोबर, माझेच ऐकले पाहिजे, माझे ऐकलेच पाहिजे, मी विद्वान, मी शहाणा हा "मीपणा” माणसाचा घात करतो. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करत राहण्याचे त्याला एक प्रकारे व्यसन जडते. व्यसनामुळे विवेक सुटतो आणि अविवेकामुळे त्याचे अधिकच पतन होते. अशा भयंकर दुष्टचक्रात तो अडकतो. पाप-पुण्य समान झाल्यावर मनुष्यजन्म मिळतो असे म्हणतात. या मनुष्यजन्मातच चौ-याऐंशी लक्ष जन्मांच्या फेऱ्यातून सुटण्याची संधी असते. मात्र अहंतेच्या आहारी जाऊन मनुष्य आपला अनमोल नरदेह वाया तर घालवतोच, शिवाय द्वेष-मत्सरादि नीच वासनांमुळे महाभयंकर अशा ‘ब्रह्मराक्षस' या पिशाच्च योनीत अडकतो. त्या पापयोनीतून लवकर सुटका होत नाही असे म्हणतात.
यासंदर्भात वामन पंडित नावाच्या एका विद्वानाची कथा सांगितली जाते. या पंडिताला आपल्या ज्ञानाचा प्रचंड गर्व होता. गावोगावी जाऊन तिथल्या पंडित सभेत शास्त्रांवर वाद करायचा, इतर पंडितांना हरवून अजिंक्यपत्रे मिळवायची आणि आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे असा छंदच त्यांना लागला होता. दिग्विजय करत हिंडणे हेच त्यांच्या जीवनाचे प्रयोजन झाले होते. शास्त्र काय सांगते याकडे संपूर्ण दुर्लक्ष, शब्दज्ञानाचे दांभिक प्रदर्शन आणि आपल्या अहंतेचे संगोपन एवढेच त्यांचे जीवन होते. एकदा असेच हिंडत असताना काही अडचणीमुळे त्यांना एका पिंपळाच्या पारावर रात्र काढण्याचा प्रसंग आला. त्या पिंपळावर दोन ब्रहमसमंध भांडत होते. एक ब्रहमसमंध दुसऱ्याला तिथून हाकलून लावत होता. ती जागा वामन पंडित या अहंकारी विद्वानासाठी राखीव आहे असे सांगत होता. ते ऐकताच भयभीत होऊन वामन पंडिताने ब्रहमसमंधाला विचारले की या योनीत न गुंतावे यासाठी काही उपाय आहे का? तेव्हा ब्रहमसमंधाने सांगितले की संतसंगतीने हे दुःख टाळता येते. पश्चात्तापदग्ध झालेले  वामन पंडित आपला अहंकार टाकून समर्थ रामदास स्वामींना शरण गेले. सद्‌गुरू आज्ञेनुसार त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. नामसंकीर्तन केले आणि नंतर अखंडपणे परमेश्वराचे गुणगान करण्यात आपली लेखणी चालवली. वेळीच सावध होऊन वामन पंडिताने आपली अहंता सांडली व हीत साधले. हाच संदेश या श्लोकांतून समर्थ आपल्याला देत आहेत.

आता ब्रह्मराक्षस खरेच असतात का, ते बोलतात का, त्यांची भाषा आपल्याला समजते का अशा कुशंकांना थारा न देता लक्षात घ्यायचा मुद्दा असा की अहंतेमुळे जीवन खरेच कष्टप्रद होते. अहंकारी मनुष्य स्वतः कायम अस्वस्थ असतो, स्वानंदाला पारखा असतो. त्याच्या ताठरपणामुळे इतरांनाही तो तापदायक असतो. आपले महत्त्व प्रस्थापित करण्याची त्याची वासना एवढी तीव्र असते की त्या हीन वासनेपायी त्याला नीच योनीत जन्म घ्यावा लागतो. महद्‌भाग्याने लाभलेला दुर्लभ नरदेह असा वाया जातो. यालाच "हीत सांडणे” असे म्हणतात. समर्थांचे सांगणे आहे की अहंता सांडावी आणि हीत साधावे. आपल्या विद्येचा, बुध्दीचा, सर्व सामर्थ्याचा दाता भगवंत आहे. साऱ्या ऐश्वर्याचे तो अक्षय भांडार आहे. मग त्याच्याहून अधिक विद्वान, अधिक सामर्थ्यवान, अधिक श्रेष्ठ कोणी असू शकेल का याचा माणसाने विचार करावा. आणि आपल्या क्षुद्र, नश्वर देहाचा, आपल्या मय्राादित बुध्दीचा वृथा अभिमान सांडावा. परब्रह्मस्वरूप सद्‌गुरूंना शरण जावे. आपले इहपर हीत साधावे आणि समाधानात रहावे. जय जय रघुवीर समर्थ.   - आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुक्तांगण -  छोट्या दोस्तांसाठी धमाल बालकविता