परशुराम जयंती व अक्षय्य तृतीया
ओम ब्रह्मक्षत्रय विद्महे क्षत्रियन्तय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात
ओम जमदग्नाय विद्महे महाविराय धीमहि तन्नो परशुरामः प्रचोदयात
ओम रण रण ओम रण रण परशुरामाय नमः
असा महान मंत्र असणारे परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार मानले जातात. परशुराम जयंती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा पवित्र दिवस मानला जातो. तो भगवान परशुरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी साजरा होतो. या दिवशी हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त म्हणून पण साजरा होत असतो.
परशुरामाचा जन्म ऋषी जमदग्नी आणि रेणुका मातेचे पुत्र म्हणून वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी झाला. ब्राह्मण कुळात जन्माला येऊनही क्षत्रिय गुण असलेले परशुराम शिवाची उपासना करून प्राप्त परशु (कुऱ्हाड) शस्त्राने अन्यायी राजे आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे चिरंजीवी (अमर) अवतार मानले जातात. भगवान परशुरामाचे जन्माचे नाव राम होते. परशु धारण केल्यामुळे ते परशुराम झाले. पृथ्वीवरील पापी, अधर्मी क्षत्रिय राजांचा २१ वेळा संहार केला होता. पौराणिक कथेनुसार परशुरामांनी समुद्रात परशु फेकून कोकणभूमी निर्माण केली म्हणून त्यांना ‘कोकणचा भूमिपुत्र' मानले जाते.
भगवान शिवाला गुरु मानून त्यांच्याकडून अस्त्र शस्त्रांची विद्या त्यांनी आत्मसात करून घेतली. याला राम जामदग्य, राम भार्गव आणि वीरराम असेही संबोधले जाते. तसेच हिंदू धर्मातील पालनकर्ता देव मानले जाते आणि ते या ग्रहावरील दृष्टतेचा नाश करणारे आहे. भगवान परशुरामाच्या अशा अनेक कथा आहेत ज्यावरून हे दिसून येते की परशुराम अत्यंत क्रोधित स्वभावाचे आहेत. यासोबतच विश्वाच्या अंतापर्यंत परशुराम पृथ्वीवर विराजमान राहणार असल्याचे अनेक कथांमध्ये कळते.
गणेश पुराणानुसार महादेवाचे निस्सीम भक्त परशुराम कैलास पर्वतावर शिवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गणपतीने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले ते त्यांना खटकले. तेव्हा परशुरामाने गणाधीशाला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये युद्ध झाले, त्यात परशुरामांनी परशुने गणरायावर जोरदार प्रहार केला असता त्यातच लंबोदराचा एक दात निखळला. तेव्हापासून पार्वतीनंदन एकदंत नावाने ओळखले जाऊ लागले.
सीता स्वयंवराच्या वेळी रामाने भगवान शिवाचे धनुष्य तोडले तेव्हा पृथ्वी हादरली अशी आख्यायिका आहे. शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट झाले. त्यावेळी विष्णुरूप श्रीरामांना परशुराम ओळखू शकले नाहीत. ते जनक राजाच्या दरबारात जाऊन रामाला युद्धासाठी आव्हान देऊ लागले असता त्याचवेळी रामाने परशुरामाला आपण विष्णूचा अवतार असल्याची जाणीव करून दिली. भगवान रामाचे रहस्य कळल्यावर परशुरामाचा राग शांत झाला.
द्वापारयुगामध्ये भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले तेव्हा भगवान श्रीकृष्ण गुरु सांदीपनीच्या आश्रमातून शिक्षण घेऊन घरी जात. परशुराम ऋषी सांदीपनीच्या आश्रमात येऊन त्यांनी त्यांचे सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाला परत केले आणि सांगितले की हे युग तुमचे आहे. तुम्ही तुमच्या सुदर्शन चक्राची काळजी घ्या.
परशुराम यांच्या कथा रामायण आणि महाभारतातही सापडतात. त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रेतायुगाचा संधिकाल मानला जातो. परशुरामाचा अवतार हा विशेषतः धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. परशुराम जयंती आपल्याला शिकवते की आपण जीवनातील प्रत्येक परिस्थितीत धर्माचा मार्ग अवलंबून अधर्माचा विरोध करावा. त्यामुळे परशुरामाची जयंती साजरी करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात विजय मिळवू शकतो.
याच दिवशी येणारा अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ दिवस असून या दिवशी केलेले दान, पूजा आणि खरेदी अक्षय (कधीही नष्ट न होणारी आणि सतत वृद्धिंगत होणारी) असते. नवीन उपक्रम, शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने सोने, चांदी खरेदी, गृहप्रवेशास शुभ मानला जातो. आज अक्षय्य तृतीया असल्याने लक्ष्मी देवी, भगवान विष्णूची पूजा करून त्यांना फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करून सुख-समृद्धी मिळवावी. तसेच गरजूंना तांदूळ, तूप, फळे, कापड, पाण्याची भांडी आणि दिवा दान करावा. तसेच हा दिवस पूर्वजांचे स्मरण करणारा किंवा पितृतर्पण करण्याचा दिवस आहे. हा दिवस आनंद, सुसंवाद आणि सतत यश मिळवून देतो. कृतज्ञता, भक्ती आणि परिपूर्ण भविष्यासाठी आकांक्षासह साजरा करूया.
सुखांची चाहूल घेऊन आला
हा दिन कर्तुत्वाचे स्वप्न पाहून साजरा करूया अक्षय्य तृतीयेचा सण
सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
-लीना बल्लाळ