सहजच दान करा  

जशा नाण्याला दोन बाजू असतात, तशा अक्षय तृतीयेच्या सणाला दोन बाजु असतात, अेक बाजु खरेदीची असते तर दुसरी बाजु दान करणे ही असते. या सणाला खरेदी केलेले सुवर्ण, अलंकार, वास्तु स्थिर, अक्षय सुख देते, तिचा क्षय होत नाही.  ऐहिक सुखाच्या या बाजूची परिणीती म्हणून या साडेतीन मुहुर्तातील एक असलेल्या, सुमुहुर्ताला खूप खरेदी केली जाते. सामान्यपणे जनप्रवाहाची वृत्ती संग्रहाची असते. मी, माझे धन, सोने, वस्तु, संग्रह, अशीच असते. असलेल्या, लागणाऱ्या, न लागणाऱ्या सर्व वस्तूंचा तो मोह करतो व साठा बाळगतो. अक्षयतृतीयेच्या सणाबाबत या नाण्याची दुसरी बाजू मात्र दुर्लाक्षित राहाते, ती म्हणजे सत्पात्री, यथोचित दान करणे.

१ दानाची व्याख्या
दुसऱ्याच्या अभावाच्या जगण्याचा विचार करुन अनुकंपेने दुसऱ्या व्यक्तिला अन्न, आसरा, वस्तु, पैसे, धान्य, वस्त्र देणे.

२ दानाचे रिटर्न गिपट
मानस शास्त्रानुसार मोह ही वृत्ती, भावना दान करणे या  वृत्तीपेक्षा प्रबळ असते, दान करतानासुद्धा, परतावा काय मिळेल? याचा विचार करु लागल्यास, ते दान शुद्ध दान होऊ शकत नाही. बहीण भाऊ , नातेवाईक, संबंधीत, सगेसोयरे यांनाच दान केले तर ते कुठल्या ना कुठल्या रुपात परत मिळेल किंवा ही व्यक्ति उपयोगी पडेल म्हणून केली जाणारी देवाणघेवाण दान या सदरात मोडत नाही. शुभकार्यात दान देणाऱ्याला, रिटर्न गिपट काय मिळेल हया भावनेने दिले जाणारे भेट आहेर,  देवघेवीचे व्यवहार, शुद्ध दान या सदरात मोडत नाहीत.

देणाऱ्याने देत राहावे
घेणाऱ्याने घेत राहावे
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावे

या चार ओळीप्रमाणे देणाऱ्याला, परतावा मिळावा ही अपेक्षा असतेच. हल्ली कलियुगात, सर्वांनाच अधिक हवे असते, एक घर असेल तर दुसरे मोठे हवे, परदेशी सहली, वारंवार वाऱ्या, वस्तू हव्या, अधिकाधिक सहली, मौज मजा हवी असते. मानवाची ही वृत्ती ज्ञात असल्याने पूर्वजांनी संस्कृतीची दान प्रथा आणि विविध सणांची सांगड घातली आहे. दानाने पुण्य मिळते असे सर्व धर्मात सांगितले आहे.


३ काय देवु मी तुला?

काय मिळेल रिटर्न मला? हा विचार तर व्यवहार असतो, पोटभर जेवलेल्याला तुप वाढण्याऐवजी भुकेल्याला अन्न द्या, तिला/त्याला त्याची गरज असते व त्या दानात खरी माणुसकी असते।

जलदान, अन्नदान, ज्ञानदान, रक्तदान, काकबली, नारायणसेवा, अन्नछत्र घालणे, धर्मशाळा, पाणपोया बांधणे ही श्रेष्ठ दाने सांगितली आहेत. उपासनेत देवाच्या देवळांत तिळ तांदुळ, फळे दुध वस्त्र, अर्पण करायची पद्धती आहे, ते अन्न धान्य उपयोगी पडु शकते. त्या दानाच्या बदल्यात आशिर्वाद मिळेल, फिल गुड  वाटेल.

४ संस्कृती

एक तीळ सात जणांनी वाटुन खावा, ही शिकवण धर्म देतो. ही शिकवण दान संस्काराची पहिली पायरी आहे.

दुसऱ्याचा घास हिसकावून खाणे ही विकृती असते.
स्वतःचा घास स्वतः खाणे ही प्रकृती असते.
दुसऱ्याबरोबर वाटून खाणे ही संस्कृती असते.
ओंजळभर धान्य दिल्याने भांडार रिकामे होत नसते, त्यामुळे आपण तेवढे दिले तरी खुप झाले.

५ कोणी दान करावे?
ज्यांच्याकडे भरपुर आहे, जे श्रीमंत आहेत, त्यांनीच दान करावे असे नसते, यथा शक्ति सर्वजण दान करू शकता. शालेय शिक्षणात, दिनु म्हातारीला मदत करतो, त्याचे त्याला चांगले फळ मिळते असे धडे असतात. पोथ्यांत कहाण्यांमध्ये दानाचे फळ मिळते अशा कथा असतात. यथाशक्ती सेवा देणे हे दान असते.
त्यानुसार कोणीही दान करु शकतो, ते करावे.

६ आधुनिक दाने
विनम्रपणे जेष्ठांना वंदन करणे, कार्यक्रमाला दाद देणे, इतरांना शुभेच्छा देणे, कौतुकाचे चार शब्द देणे, दुष्काळग्रस्तांना दान देणे, आजारी रुग्णांची विचारपुस करणे, एखाद्या निधीला अल्प का होइना मदत करणे, कर्तव्यबुद्धीने मतदान करणे, एकाकी व्यक्तींशी संवाद सांधणे हेसुद्धा सद्‌भावना दान असते. जणु पसायदान, ओंजळभर दान असते.

७ दान मागणे
मी सुखद अशा दानाची महती, पुराणकथा सांगितली, पण आपणसुध्दा ,कधी ना कधी दान मागत असतो...  

हेचि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा

परमेश्वर जे जेवण देतो, ते दाणापाणी आपण खात/घेत असतो व त्या देवाचे ऋणी राहतो. मी नम्र होऊन आज दान मागते,

आता विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे
पसायदान,

असे दान आपणदेखील गरजु व्यक्तींना करुन हा सण साजरा करु या. सद्‌भाव वाढवू या.अक्षय पुण्य मिळवू या. गरजुंना सत्पात्री दान करा. - शुभांगी पासेबंद 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!