अक्षय सुखाचा प्रशस्त राजमार्ग - अक्षय तृतीया
भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवसाच्या महत्वाचा युगानुयुगाचा असा प्राचीन इतिहास उपलब्ध आहे. त्याचे स्मरण केले जाते. आजचा दिवस हा तर युगप्रवर्तक. अनेक शुभसंकेताचा मानला जातोच. या दिवसाचे स्मरण.. चिंतन म्हणजे अक्षय सुखाचा प्रशस्त राजमार्ग आहे.
आजच्या दिवशीच सत्य तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. त्रेता युगातील प्रभू श्रीरामचंद्रांनी समस्त मानव जातीला कलियुगात जगण्यासाठी प्रेम.. संयम.. त्याग.. क्षमाशिलता शिकवणारी आदर्श जीवन प्रणाली प्रदान केलीय. प्रभूनी संयमी वागणूक.. मनःशांती राखणे हाच अक्षय सुखासाठी आरोग्य मंत्र स्वआचरणाने दिलाय.
आज जे मागाल ते अक्षय राहणार. सोन्यापेक्षा महत्त्वाची असतात ती नाती. जग आनंदी तर आपण आनंदी. सुदाम्याची पोह्याची पुरचुंडी मदत गरजूंना दिली तर दात्याला राजसौख्य लाभते हे कृष्णाने सिद्ध केले ते आजच्याच दिवशी. भारतीयांच्या सुखासाठी भाग्यविधाती ठरलेली गंगा मैय्या आजच पृथ्वीवर आली. आजच भगवान परशुराम प्रकट झालेत. अन्नपूर्णा देवीही आजच्या शुभ दिनी प्रकट झालीय. अन्अक्षय अन्नपात्रही आजच्याच दिवशी कृष्णाने द्रोपदीला दिले होते ज्यांच्यामुळे हे जग आम्हांला दिसले त्या सर्व पुर्वजांचे स्मरण करुन कृतज्ञतेने त्यांना जल अर्पण करण्याचा आजचा दिवस. हे जल जसे आम्ही त्यांना अर्पण करतो. तसेच मनुष्य, पशुपक्षी सर्वाना भरपूर जल मिळावे यासाठीही प्रयत्न करुन जल दिले जाते.
पाणी वाचवा थेंबभर
साठवून ठेवा घागरभर
अशा प्रकारे मनुष्य व प्राणी मात्रांसाठी जल दिले जाते.
आज जे दान प्राप्त कराल तेपण अक्षय राहणार, म्हणूनच अक्षय सुखासाठी ज्ञानप्राप्ती आजच मागतात. आज लक्ष्मी, विष्णूंची भक्ती केली जाते. आज गंगास्नानाचे महत्त्व. गावोगाव असलेल्या नद्या गंगेचेच रुप म्हणून नदीत स्नान केले जाते. देवाची पूजा गंगाजलाने केली जाते.
आज भावी पिढीलाही अक्षय सुख लाभावे यासाठी वृक्ष संवर्धनासाठी योगदान दिले जाते. घरोघरी उपलब्ध जागेत असलेल्या बगीच्यात शेंगाच्या वेली लावल्या जातात. जीवनात केव्हा तरी वाहने, सोने आपण घेतो तर आज मुहुर्त चांगला म्हणून त्यानिमित्याने ही खरेदी होते. सोने अडचणीत कामी येते म्हणून भविष्यात उपयोगी ठरावे यासाठी सोने घेण्याची प्रथा पडली.
आज दान देण्याचाही दिवस. भुकेल्या जीवाला अन्नदान,श्रमिकांसाठी श्रमदान, गरजूंना रक्तदान तसेत मृत्यूसोबत झुंज देणाऱ्या जीवाला जीवनदान मिळो ही प्रार्थना करुन दान देण्याची ऐपत आणि दान देण्याची बुद्धी मला द्यावी नकारात्मक विचाराचा अंत व्हावा. सर्वांचे सूर एकमेकाशी जुळावे. देशवासी आप्तेष्ट आनंदाने रहावेत. सर्वांच्या जीवनात नित्य पहाट आनंदी व्हावी ही या शुभंकर मुहुर्तावर श्रीगणेशाच्या व स्वामींच्या चरणी प्रार्थना करतात.
अक्षय राहो आपली "ऋणानुबंधाची नाती”
ह्रदयात तेवत राहावी
प्रेमाची अखंड पणती !
आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!
- कल्पना देशमुख