कपटी मित्रापेक्षा दिलदार ....!

जगात दर्जेदार साहित्यिकांची कमतरता नाही. नोबेल, बुकर, न्यूस्टाड,  ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, सरस्वती, जनस्थान हे व असे मानाचे पुरस्कार रसिकांच्या-वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ख्यातनाम साहित्यिकांनी त्यांच्या संवेदनशील लिखाणामुळे मिळवले आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचाच विचार करायचा झाल्यास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा.सी. मर्ढेकर, चिंतामण कोल्हटकर, श्री.ना.पेंडसे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो.नी. दांडेकर, मंगेश पाडगावकर, वि. स.खांडेकर, पु.ल.देशपांडे, लक्ष्मण माने, आनंद यादव, लक्ष्मण गायकवाड, नामदेव कांबळे, गो.मा.पवार, जयंत पवार, आसाराम लोमटे या व अशा नामवंत गुणवंतांनी या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

.....हे झाले या साहित्यिकांच्या विविध पुस्तकांत, ग्रंथांत छापून आलेल्या रचनांनंतर त्यांच्या अशा बहुमोल योगदानासाठी अभिजनांनी, बहुजनांनी, शासन-शासकीय स्वायत्त संस्थांनी त्यांच्या केलेल्या सन्मानाबद्दल. पण याही पलिकडे दुसरे एक विशाल जगत आहे. त्यातही नामांकित, चौफेर वृत्तीचे, चौकस, गुणग्राही, नेमके वर्णन करणारे साहित्यिक आहेत. मात्र ते अज्ञात आहेत. त्यांचे चेहरे कधीच तुमच्याआमच्यासमोर येत नाहीत. त्यांनी केलेल्या रचनांच्या खाली त्यांची नावेही नसतात. असे हे छुपे, प्रच्छन्न साहित्यिकही खूप आहेत. पण त्यांची छापील माहिती कुणाकडेच उपलब्ध नाही. भिंती, चालत्या वाहनांची मागची बाजू, वाहनांचे दरवाजे ही त्यांची अभिव्यक्त होण्याची खात्रीची ठिकाणे होय. मला वाचता यायला लागल्यापासून या प्रकारचे साहित्य माझ्या नजरेला आवाहन करीत असते. लोकांनी ‘पुणे तिथे काय उणे' म्हणत उगाचच पुण्याला डोक्यावर बसवून (किंवा बदनाम करुन..!) ठेवलंय. पुणेरी पाट्या व त्यावरील टिपिकल खत्रुड मजकूरावरुन बिचाऱ्या पुणेकरांना जिकडे तिकडे लक्ष्य केलं जातं. पण त्यांच्यापेक्षा तसूभर जास्तीची विद्वत्ता या गावोगावच्या छुप्या साहित्यिकांकडे आहे हे मान्य करायला हरकत नसावी. या लेखाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा' असे कुणातरी नामांकित साहित्यिकाने कधीतरी लिहुन ठेवले आहे काय? पण आमच्या कित्येक ट्रकच्या मागील भागात ते तुम्हाला सहज पाहायला मिळेल, तेही त्या रचनाकाराच्या नावाविना. किती ही प्रसिध्दीविन्मुख मानसिकता म्हणावी?

   हे एवढ्यावरच संपत नाही. अनारकली भरके चली, पहले राम बोलो फिर दरवाजा खोलो, बुरी नजरवाले तेरा मुँह काला, माँ का आशीर्वाद, दम है तो क्रॉस कर नही तो बरदाश्त कर, माझ्याशी पैज लावू नका लय भारी पडेल, जलो मत बराबरी करो, बघतोस काय रागानं पंजा मारला वाघानं, बघतोस काय? मुजरा कर, बघ माझी आठवण येते का? साधूसंत नाही झालात तरी चालेल.. पण आधी माणूस व्हा, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..पण सुरुवात माझ्यापासून कर, लायनीत घे ना भौ, नाद खुळा, आई तुझा आशीर्वाद, सासरेबुवांची कृपा, पाहा..पण प्रेमाने, अच्छा - टाटा फिर मिलेंगे, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, घर कब आओगे, भिऊ नकोस मी तुझ्या पुढे आहे, सोनू-मोनू-चिंटू (आणि खालच्या ओळीत..!) बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने, चमकला तो शुक्रतारा धन्य ते कोल्हापूर सातारा या व अशा कमीत कमी शब्द व जास्तीत जास्त आशय म्हणजेच ‘गागरमे सागर' सामावून घेणाऱ्या रचना तुम्हाला त्या धावत्या विश्वात येता-जाता सहज वाचायला मिळतात. मी लिहिलेले एक पुस्तक मराठी भाषेत आले आहे, इतर लेखकांची मी चार पुस्तके मराठीत प्रकाशक म्हणून प्रसिध्द केली; तर आतापर्यंत अंध विद्यार्थ्यांसाठी माझी बत्तीस पुस्तके ब्रेल लिपीत आली असून आणखी तेरा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मला अधूनमधून वाटत राहते की मी मराठी साहित्यात एम ए झालो, ३१ वर्षे पत्रकारिता करतोय..आता या धावत्या वाहनांच्या मागे, पुढे काचेवर किंवा दरवाज्यावर लिहिलेल्या अशा अनमोल साहित्यावरही मी एखादे पुस्तक तरी लिहावे किंवा पीएचडी तरी करावी.

   ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा' हे वचन ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेले मी फार पूर्वीपासून वाचत आलो आहे. मग मी खोलात जाऊन ते कपटी मित्र कोण कोण बरे असावेत याची चाचपणी करायला सुरुवात केली. खरे तर "मित्र" ही संकल्पना आपण उगाचच खूप व्यापक अर्थाने वापरतो. आपले नातेवाईक नसलेले शेजारी, परिचित, कार्यालयातले सहकारी, गाडीत रोजच्या प्रवासात भेटणारे, आसपासचे दुकानवाले, हारवाले, पेपरवाले, भाजीवाले, आपल्या मुलांचे पालक वगैरे वगैरे घटकांना आपण या ‘मित्र' च्या वर्तुळात काेंबून बसवायला बघतो. यांच्यातील निवडक लोकच आपले मित्र होऊ शकतात बरे ! ज्याच्याशी "मैत्र" जुळते, जो आपल्या सुखादुःखाचा साथीदार असतो, ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा   मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा' - अडीअडचणीला स्वतःहुन उपयोगी पडावे या भावनेला जो जागतो, आपल्याकडून फार अपेक्षा कधीच बाळगून नसतो..पण तरीही त्याच्या निर्व्याज मैत्रीपोटी आपल्यालाही त्याच्याप्रति नेहमीच कृतज्ञभाव ठेवण्याची अकृत्रिम उर्मी होत असते अशांशीच आपली घट्ट मैत्री होऊ शकते. बाकी सारे सवंगडी, सहकारी, सोबती, नातेवाईक होत ! म्हणून त्यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. पण जन्मदाते व ठराविक मोजके नातेवाईक वगळता मैत्रीपेक्षा किंचित उतरणीवर पायरी त्यांची! आता दिलदार आणि कपटी प्रकाराकडे जाऊ या. सच्चा मित्र अपेक्षा बाळगत नाही. आपली इच्छा ओळखून तो वागतो. आताचे युग हे समंजसपणाचे, नागरी कर्तव्यांना जागण्याचे, सुसंस्कृतपणाचे, शांततामय, सौहार्दाचे जीवन जगण्याचे आहे. त्यामुळे आपण थेट कुणालाच शत्रू समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान - औरंगजेब ही शत्रुत्वाची उदाहरणे म्हणून सांगितली जातात. पण तरीही छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याला खतम केल्यावर ‘मरणान्तानि वैराणी - मृत्युनंतर वैर संपले' असे म्हणत त्याचा इस्लामी पध्दतीने अंत्यसंस्कार करवला व प्रतापगडावर त्याची कबर बांधली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसानानंतर औरंगजेबाने त्यांना ‘एक महान योध्दा व सत्यवादी शत्रू' म्हणत गौरवोद्‌गार तर काढलेच; पण ‘या खुदा या शिवाजीसाठी जन्नतचे दरवाजे खुले ठेव' अशी प्रार्थना केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. याला म्हणतात दिलदार शत्रुत्व. आपल्याकडे अनेक परिचित, जवळचे, ‘मित्र' म्हणवणारे अनेकजण त्यांच्या मित्रांच्या यशाबद्दल, त्यांच्या बहुमानाबद्दल, त्यांनी केलेल्या लक्षवेधी कामगिरीबद्दल साधे अभिनंदनाचे चार शब्द बोलायला तयार नसतात. बोलणे राहिले दूरच ! आता सारीच कामे मोबाईल करतो. त्यावर इतरांकडून शुभेच्छा, अभिनंदनाच्या संदेशांचा विविध समुहांवर पाऊस पडत असताना हे ‘तथाकथित मित्र' म्हणवणारे एक किलो मूग गिळून गप्प बसलेले असतात. विख्यात साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी अशा लोकांबद्दल एका जाहीर कार्यक्रमात लता मंगेशकर, शरद पवार, कुसुमाग्रज, डॉ.वसंत गोवारीकर या व अशा नामवंतांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणात असे म्हटले आहे की या लोकांना भिती वाटते आपण कौतुकाचे शब्द बोललो किंवा लिहिलं तर हा चढून जाईल की काय!

  मला तर असा अनुभव आहे की पत्रकारिता क्षेत्रात माझे अनेक परिचित आहेत. जवळचे मित्रही आहेत. अनेकजण मी ब्रेल लिपीत पुस्तक प्रकाशित केले तर आवडीने, आपलेपणाने बातम्या प्रसिध्द करतात. वर फोन करुन अभिनंदन करतात, काही सूचना असल्यास सांगतात. तर काहीजण याची बातमी छापायची नाही या भूमिकेत शिरतात. बातमी छापलीच तर माझे नाव, फोटो कसा कापता येईल याचा खटाटोप करण्यात धन्यता मानतात असेही मी गेली अनेक वर्षे पाहात आलो आहे. यांना मित्र कसे बरे म्हणावे? हे तर दिलदार शत्रूही नव्हेत. आपल्या सहकाऱ्याच्या, परिचिताच्या, जवळच्या, शेजारच्या, सोबत्याच्या यशाने ज्याला आनंद होत नाही, आनंद झालाच तर तो जाहिरपणे व्यक्त करायला जो टाळाटाळ करतो तो मला सौम्य अर्थाने कपटी शत्रूच वाटतो. कारण ‘याचे कौतुक केले तर हा मोठा होईल व आपण खुजे ठरु की काय' अशी अनाठायी भिती अशा लोकांना वाटत असावी. म्हणूनच म्हणतो की आपल्या अवतीभवती अनेक लोक वावरत असतात. पण ते सारेच आपले "मित्र" होऊ शकत नाहीत. १९७२-७३ या शैक्षणिक वर्षात मी इयत्ता पाचवीत गेलो व १९७७-७८ या शैक्षणिक वर्षात एस एस सी झालो. या साऱ्या शैक्षणिक प्रवासात माझ्या वर्गात किमान ५० ते ५५ मुले मुली होत्या. पण ते सारेच माझे व एकमेकांचे मित्र-मैत्रीणी बनू शकले नाहीत. मात्र जे बनले त्यांनी गेली ५४ वर्षे "मैत्र" जपले आहे. त्यात माझ्यासोबतचे बहुतेक सारेचजण आता ६३ ते ६७ या वयाचे असल्याने आजी-आजोबा बनले आहेत. पण त्यांच्या घरच्यांनीही आमचे हे "मैत्र" आदराने, आपुलकीने स्वीकारले आहे. माझ्या अनेक कार्यक्रमांना माझ्या या दहावीच्या बॅचचे बरेच जण उपस्थित राहिले आहेत. एवढेच नव्हे, तर माझ्यासोबत उत्तराखंड, केरळ, बंगलोर उटी म्हैसूर कोईमतूर अशा लांबच्या व ९ -१० दिवसांच्या सहलीला माझ्या "त्या शालेय जीवनातल्या" मैत्रीणीही आल्या आहेत. पुढेही येत राहतील. मित्र मैत्रीणी म्हटले की रोजच्या रोज भेटले पाहिजे, फोनवर बोलले पाहिजे, व्हाटस्‌ अपवर गुड मॉर्निंग, गुड नाईट, जेवलास का, जेवलीस का असे केलेच पाहिजे अशातला भाग अजिबात नाही. मित्र मैत्रीणीच्या हृदयात जी जवळीकीची, आस्थेची, आपुलकीची भावना असते ती तेवढ्याच तीव्रतेने आपल्याही हृदयात जागवली गेली तरी बास झाले. असे "मैत्र"च दीर्घकाळ टिकते. मला वाटत असते की पैलतिराकडे जाण्याची शेवटची यात्रा जेंव्हा निघेल तेंव्हा चारही खांदेकरी हे माझे मित्रच असावेत. पुढच्या खांदेकऱ्यांच्या खांद्यावर माझे हात असावेत. नेत्रदान, अवयवदान केल्यावर माझे उर्वरीत शरीर अग्नीच्या हवाली करताना त्या साऱ्या प्रसंगाला मित्रांची उपस्थिती असावी.  

 -  राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी सैन्याला बोलवायचे का ?