सुरक्षा रक्षकाचे थरारक कृत्य; भररस्त्यात दोघांची हत्या

पनवेल : आर्थिक तंगीतून आलेल्या नैराश्यातून सुरक्षा रक्षकाने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दोघा निष्पाप व्यक्तींचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना तळोजा एमआयडीसी परिसरात घडली. मात्र, या घटनेचे गांभीर्य ओळखून तळोजा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १० तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे.

३ मार्च २०२६ रोजी तळोजा एमआयडीसी मधील आयजीपीएल कंपनीच्या रोडवर सायकलस्वार रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत, तर दुसरा इसम गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घ्ोतली. तपासादरम्यान अज्ञात हल्लेखोराने डोक्यात जड हत्याराने प्रहार करुन दोघांनाही गंभीर दुखापत केल्याचे आढळून आले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर तळोजा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत मुळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी तुहीन बिश्वरूप घोष (३३, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी तुहीन घोष तळोजा एमआयडीसीतील कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो प्रचंड तणावात आणि वैफल्यग्रस्त झाला होता. याच रागाच्या भरात त्याने रस्त्याने जाणाऱ्या राजू बासूमतारी (२९) या सायकलस्वारावर लोखंडी पाईपने हल्ला करुन त्याला जागीच ठार केले.

सदर कृत्य सुरू असताना तेथून जाणाऱ्या साईनाथ भुऱ्या पाटील यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला का मारत आहे? अशी विचारणा केली. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने साईनाथ पाटील यांच्यावरही पाईपने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या दुहेरी हत्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी तत्काळ पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत घटनेच्या १० तासांच्या आत ४ मार्च रोजी रात्री ८.१५ वाजता त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

५८ मोटारसायकल जप्त, ४१ गुन्हे उघड