सिडकोची भूखंड, सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची महायोजना

सीबीडी : सिडकोतर्फे गुढी पाडव्याच्या शुभ दिनी दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी विविध भूखंड, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्री महायोजनेचा शुभारंभ मा. एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील वाणिज्यिक गाळे तसेच निवासी, वाणिज्यिक आणि सामाजिक उद्देशांसाठी भूखंड ई-लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी नोड्समध्ये या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाणिज्यिक गाळ्यांमुळे व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासोबतच वृद्धिंगत करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करूण देण्यात येणार आहे. तसेच लहान व मोठ्या आकाराच्या निवासी आणि वाणिज्यिक भूखंडांमुळे बांधकाम विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आपले हक्काचे घर साकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध सामाजिक उद्देशांकरिता मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध करून देत सिडकोने आपला सर्वसमावेशक आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा वारसा जपला आहे. याचबरोबर सिडकोच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमध्ये मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सदर योजनेतील वाणिज्यिक गाळ्यांची आणि भूखंडांची विक्री ही सुलभ आणि पारदर्शक अशा ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पार पडणार आहे. याकरिता https://cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज नोंदणी, अनामत रक्कम व शुल्क भरणा, निविदा सादर करणे, लिलाव या सर्व प्रक्रियेची माहिती उपरोक्त संकेतस्थळासोबतच सिडकोच्या अधिकृत समाज माध्यमांवर वेळोवेळी देण्यात येईल.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली महावितरणच्या कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात