ऐरोली महावितरणच्या कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
नवी मुंबई : इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये अतिरिक्त लोड वाढविण्याच्या कामामध्ये शिफारस करुन सदर प्रस्ताव मंजूरीसाठी पुढे पाठविण्यासाठी कंत्राटदाराच्या महिला प्रतिनिधीकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदरची रक्कम स्विकारणाऱया महावितरणच्या ऐरोली उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांना अँटी करफ्शन ब्युरोच्या ठाणे युनिटने बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले.
विद्युत कंत्राटदार धर्मराज देशपांडे यांनी इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये अतिरिक्त लोड वाढविण्याच्या कामाचे कंत्राट घेतले होते. त्यासाठी त्यांनी एका महिला प्रतिनिधीच्या मदतीने महावितरणच्या ऐरोली उपविभाग कार्यालयात कागदपत्रे सादर केली होती. मात्र ऐरोली उपविभाग कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांनी सदर कामाच्या मंजूरीसाठी तसेच सदरचा प्रस्ताव वाशी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी सदर महिलेकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे सदर महिलेने ठाणे ऍन्टी करफ्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने अँटी करफ्शन ब्यूरोच्या पथकाने पडताळणी केली असता वर्षा देशमुख यांनी इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये अतिरिक्त लोड वाढविण्याच्या कामामध्ये शिफारस करुन मंजूरीसाठी पुढे पाठविण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानुसार अँटी करफ्शन ब्युरो ठाणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक माया मोरे व त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी महावितरणच्या ऐरोली उप विभाग कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी अतिरीक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांनी तक्रारदार महिलेकडून 50 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वर्षा देशमुख यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.