अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी
नवी मुंबई : भित्तीचित्रे, शिल्पाकृती, कारंजे अशा विविध माध्यमांतून शहर सुशोभिकरणाला नवी झळाळी प्राप्त करून देतानाच प्रख्यात कवींच्या गाजलेल्या कवितांच्या ओळी नवी मुंबई शहरात मुख्य ठिकाणी चितारून वाचन संस्कृतीच्या वाढीवर भर दिला जात आहे. सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलात्मक अक्षरांनी नटलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, सुरेश भट, विंदा करंदीकर, वसंत बापट अशा 30 हून अधिक दिग्गज कवींच्या काव्य ओळींनी नवी मुंबईत नटलेल्या भित्तीचित्र कविता लक्ष वेधून घेत आहेत. 21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबईची ओळख आता कवितांचे शहर अशीही केली जात आहे.
यामध्ये सुलेखनकार अच्युत पालव यांनी सीबीडी बेलापूर विभागात सायन पनवेल हायवे नजीक सेक्टर 1 मध्ये असलेल्या अग्निशमन केंद्राच्या भिंतीवर "ऐसी अक्षरे रसिके मेळवीन" या संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आकर्षक देवनागरी चित्राक्षरांसह रेखाटून शहरातील महत्वाची दर्शनी भिंत बोलकी केली आहे.
स्वच्छ नवी मुंबई शहर या माध्यमातून सुशोभित झालेले दिसत असून यामध्ये मलाही एक कलावंत म्हणून सहभाग नोंदविता आला याचा आनंद व्यक्त करीत या माध्यमातून येता जाता कवितांच्या ओळी लोकांच्या नजरेस पडून अक्षरांविषयीचे, शब्दांविषयीचे, साहित्याविषयीचे प्रेम वाढीस लागेल असा विश्वास सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केला.