एफ. जी. नाईक महाविद्यालयात पदवी प्रदान व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
कोपरखैरणे : नवी मुंबई येथील श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ. जी. नाईक महाविद्यालयात कला, विज्ञान आयटी आणि वाणिज्य शाखेच्या 2020--21 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक साहेब उपस्थित होते त्याच प्रमाणे कोपरखैरणे, नवी मुंबई विभागातील समाजसेवक भालचंद्र मढवी, सदानंद म्हात्रे, प्रशांत नाईक, शुरूद वारडेकर तसेच श्रमिक शिक्षण मंडळाचे सदस्य अक्षय नाईक, स्वप्नील नाईक, दीपेश नाईक व रा .फ. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, रवींद्र पाटील तसेच श्रमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक नरेंद्र म्हात्रे इत्यादी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी पाहुण्यांचे स्वागत करून आपल्या प्रस्ताविकेतर भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याचा आढावा घेतला. श्रमिक शिक्षण मंडळाचे संस्थापक आमदार गणेश नाईक यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरु झालेले महाविद्यालय त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे अध्यक्ष संदीप नाईक साहेब यांचे मार्गदर्शन यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व इतर क्षेत्रांमध्ये देखील सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा आग्रह यामुळेच महाविद्यालयातील विद्यार्थी पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करताना दिसून येत असल्याचे प्राचार्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमात तृतीय वर्षाची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालया बद्दलच्या आपल्या भावना व आदर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. सन 2020-21 च्या वर्षांमध्ये महाविद्यालयात कला शाखेतून कुमारी बाठे सोनाली राजाराम ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर वाणिज्य शाखेतून कुमारी पाटील ऋतिका अशोक व विज्ञान आयटी शाखेतून कुमार पाटील शुभम रवींद्र हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे कला शाखेतून 70 विद्यार्थ्यांना तसेच वाणिज्य शाखेतून 140 व विज्ञान शाखेतून 60 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव कै. सुरेश शंकर नाईक यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाने पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 1001 चे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण असतानादेखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन स्पर्धांमध्ये तसेच वेबीनार मध्ये भाग घेतला होता त्या मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर नाईक यांनी आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतानाच महाविद्यालय भविष्यकाळासाठी कशा रीतीने विद्यार्थी घडवू शकेल याबाबत त्यांनी आपले विचार व मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. जयश्री दहाट व प्रा. सौ. संगीता वासकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेच्या प्रमुख प्रा.सौ.स्वाती हेलकर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.