पंचनामा

नुकतीच देशभरात नव्हे, तर जगभरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची १३५वी जयंती साजरी करण्यात आली. जगभरातील लोकांनी डॉक्टरांना अभिवादन केले. संपूर्ण जगाला झपाटून टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.  समानतेसाठी त्यांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केला. त्यांनी केवळ भारत असा विचार न करता अखील मानवजातीच्या कल्याणाचा विचार करून कार्य केले होते. देशातल्या इतर मागासवर्गियांचे (ओबीसी) प्रश्न सोडवण्यासाठी लोकसंख्येची गणना गरजेची असून ही मागणी पहिल्यांदा डॉ. आंबेडकर यांनी १९४६ मध्ये केली होती. इतर मागास वर्गाला घटनात्मक संरक्षण देण्याची मागणीदेखील आंबेडकरांनीच केली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना घटनात्मक संरक्षण दिले गेले पाहिजे अशी आग्रही सुचना त्यांनीच केली होती. त्याचप्रमाणे देशाच्या राज्यघटनेची निर्मिती करताना ३४० व्या कलमान्वये ओबीसी वर्गाला संरक्षण देण्याची तरतूदही केली होती. पण डॉक्टरांना ती तरतूद पुरेशी वाटत नव्हती, ते काळाच्या फार पुढे होते.

हिंदू कोड विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ १९५१ मध्ये त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण या राजीनाम्याचे दुसरे कारण ओबीसीच्या प्रश्नावर सरकारचे दुर्लक्ष झाले हेदेखील त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्टपणे मांडले होते. देशातल्या सर्व दीनदुबळ्या समाजाच्या पाठीशी डॉक्टर उभे राहिले. सर्व विश्वाचा अभ्यास करून त्यांनी आपल्या लेखणीचा वापर केलेला दिसून येतो. त्यांनी आपल्या पुस्तकात अत्यंत कठोर शब्दात गांधी आणि कॉंगे्रसवर आसूड ओढले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी फाळणीच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. फाळणीच्या वेळी लोकसंख्येच्या अदलाबदलीचा मुद्दा मांडला होता. पण ते न झाल्याने लाखो लोक दंगलीत मारले गेले. जाती व्यवस्थेवर बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यांनी केवळ हिंदूमधील जातीधर्मावर भाष्य केले नाही तर मुस्लिमांमधल्या जाती व्यवस्थेवरही नेमकेपणाने बोट ठेवले.

मुस्लीम महिलांच्या असुरक्षित आयुष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. या देशाला एक छत्राखाली, एका विचाराखाली आणि समतेच्या छायेत आणण्यासाठी त्यांचा विचार उपयुक्त आहे. मानव कल्याणासाठी त्यांची भूमिका होती. मासला म्हणून भारताची बाजू मांडली असली तरी ती जगातील प्रत्येक घटकाला सामान्य माणसाला, पीडित, शोषीत आणि मागासलेल्यांसाठी त्यांची शिकवण मार्गदर्शक आहे. खरेतर जागतिक पातळीवर अर्थशास्त्रातील त्यांच्या भूमिकेसाठी नोबेल मिळणे गरजेचे होते. कोणत्याही विषयावर खोलवर जाऊन ते संशोधन करत असत. त्यांचे गाजलेल्या भाषणांचे इतिवृत्तांत पहायला मिळतात. ते केवळ अभ्यासकच वा राजकारणी नव्हते त्यांनी पत्रकार म्हणूनही आपली जबाबदारी अत्यंत वेगळेपणाने मांडली. डोळे, बुध्दी, मन आणि विवेकावर त्यांचे लेखन होते. धर्म आणि धर्म ग्रंथ हे माणसामाणसामध्ये भेद निर्माण करतात, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्रीय चिकित्सा व तत्कालीन राजकीय प्रश्नाची उकल आपल्या विविध लिखाणातून केलेली आहे. आजच्या तरूण पिढीनी राजकारण्याच्या मागे न लागता डॉवटरांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. कारण वाचलं तरच आपण वाचू शकतो. त्यासाठी वाचाल तर वाचाल असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारताचे पहिले कायदेमंत्री, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक आहेत. त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात. आज आपण त्यांची केवळ जयंती करून चालणार नाही तर, त्यांना समजून घ्यावे लागेल. गत काही वर्षापासून देशात भाजपचे सरकार आहे. भाजपही ‘आर एस एस', च्या विचारधारेवर चालणारे सरकार आहे. आणि आर एस एस ला कधीही आंबेडकर, त्यांची विचारसरणी त्यांचे देशाचे संविधान मान्य नव्हते. ‘आर एस एस'ने त्यांवेळीही आंबेडकरांचा विरोध केला आणि आजही ते आपल्या मतावर ठाम आहेत. त्यांना देशाच्या संविधानापेक्षा मनूस्मृती जवळची वाटते. आज आपण सर्व धर्म समभाव, आम्ही सर्व भारतीय आहोत अशी वल्गना करतो पण, प्रत्यक्षात तसे वागतो का?

आज प्रत्येक भारतीयांच्या मनात विविधतेचे विष पेरले गेले आहे. प्रांतवाद, धर्मवाद, जातीवाद एवढेच नाही तर लिंगवादही बोकाळला आहे. एकीकडे, आपण महिला व बालकल्याणाच्या गोष्टी करतो त्याचवेळी महिला व बालकावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. गत काही वर्षापासून सर्व समानतेची भावना पूसट होत चालली आहे. त्याउलट एकमेकांतील पुराव्याला खतपाणी घालण्याचे कुटील कारस्थान रचले जात आहे आणि या कुटील कारस्थानाला अंधभक्त बळी पडत आहेत. त्यात अशिक्षित नाहीत तर चांगले स्वतःला उच्चशिक्षित समजणारे लोक जास्त आहेत; जे केवळ धर्म व जातीवर आपले भविष्य पाहतात. त्यांना सर्वधर्म समभाव मान्य नाही तर त्यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था आपलीशी वाटते. जातीनिहाय कर्मकांड आपलेसे वाटतात. एवढेच नाही तर त्यांना समानतेचा अधिकारही नकोसा वाटतो. अशा तर्कटवादाला तळागाळातील समाजासह महिलांही बळी पडत आहेत. जेव्हा की या तर्कटवाद्यांनी महिलांना ‘चूल आणि मूल' च्या व्याख्येत बसवून महिलांना केवळ ‘भोगवस्तू'चा दर्जा दिला आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सुधारणावाद्यांच्या विचारसरणीवर आधारीत फुले दांम्पत्याच्या कार्याला बळकटी देण्यासाठी सर्व समानतेची भूमिका घेत संविधानात तशी तरतूदच करून ठेवली आहे. पण दुर्देवाने त्यांचे उपकार मानण्याऐवजी समाजातील काही कृतघ्न लोक मग ते मागासवर्गातील असोत, बहुजन समाजातील असोत, ओबीसी वा इतर मागास वर्गातील वा स्त्रिया असोत त्यांनी स्व स्वार्थासाठी आपली माणूसकी गहाण टाकली आहे. एवढेच नव्हे, तर आपली वैचारिक बुध्दीही कर्मटवाद्यांच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या वैचारिक भूमिकेवर हरताळ फासला आहे. अशांनी आपली नैतिकता कर्मकांडवाद्यांच्या चरणी अर्पण केली आहे व सिध्द केले आहे की, होय आम्ही त्याच लायकीचे आहोत. ज्यांना बुध्दी नाही, कणा ताठ नाही - नैतिकता तर नाहीच नाही, आम्ही सवयीचे व स्वार्थाचे गुलाम आहोत.

कोणीही उठावे आणि आमचा गैरवापर करून घ्यावा त्या विरोधात आम्ही चकार शब्द बोलणार नाही विरोध तर नाहीच नाही. जेव्हा की बाबासाहेबाचे तत्व होते की, सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्वावर आधारलेली विचारसरणी, रूढी, परंपरा आणि चालीरीतीच्या बंधनातून मुक्त करून सर्वांना जोखंडातून मुक्त समाज हवा होता. पण, त्यांच्या या विचारसरणीला म्हणावा तसा प्रतिसाद लोकांकडून मिळत नाही. आजही अनेकजण डॉक्टरांच्या संविधानातील तरतूदीचा लाभ घेतात पण, कर्तव्याची जाण ठेवत नाहीत. उलट बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन कर्मकांड व धर्ममार्तंडाच्या हातची खेळणी बनतात. सहन होईपर्यंत सहन करतात. जास्त झाल्यावर बोंबलायला सुरूवात करतात. मात्र काही लालूच मिळतात, ‘आळी मिळी गूपचिळी' या उक्तीनुसार ‘तोंड दाबून,  बुक्क्याचा मार सहन करतात.' अजूनही खेड्यापाड्यातून समाज जोखंडातून मुक्त  झालेला नाही. तिथे आजही, जाती-पातीवरूनच एकमेकांची ओळख सांगितली जाते आणि त्यानुसारच त्या व्यवितला वागणूक दिली जाते आणि ही मंडळी मुकाटपणे अशी वागणूक सहन करतात. पण उलटून बोलण्याची धमक दाखवत नाहीत.

मधल्या काळात अशा प्रकारांवर आळा बसला होता. पण जसे देशात भाजपचे सरकार आले त्यांनी आपली जुनी विचारसरणी उघड करत धार्मिकतेचे व जातीयतेचे विष लोकांच्या मनात भरायला सुरूवात केली. सुरूवातीला त्यांनी हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला. आता विविध जातीत व धर्मात एक दुसऱ्या विरोधात द्वेष निर्माण करून वाद चिघळवायला सुरूवात केली आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत त्यांनी हिंदू मधीलच विविध घटकांना एकमेकांसमोर उभे केले आहे. पूर्वी मराठा एक होता आता त्यात कुणबी आणि मराठा असा भेद निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.जेव्हा इंग्रज भारतात आले त्यांनी एकमेकांत फूट पाडा आणि राज्य करा ही भूमिका अंगीकारून देशावर सत्ता आणली आणि देशाची लूटमार केली, त्याच उवतीचा वापर करत मोदी-शहा व भाजपवाले सत्तेवर आरूढ आहेत. त्यांना विविध जाती धर्मातील गद्दार पावलोपावली मदत करत आहेत.

डॉ. बाबासाहेबांचे नाव सांगत व त्यांच्या तरतूदीचा फायदा घेऊन काही मंडळी सत्ताधारी पक्षात सामिल झाली, पण ज्या संविधानाच्या आधारे ही मंडळी निवडून आली, काही मागच्या दाराने  सत्तेत सामील झाली, पण त्याच संविधानाची गळचेपी होताना ही नमकहराम मंडळी मूग गिळून गप्प आहेत. सत्ताधारी पक्ष संविधान बदलायला निघाला आहे आणि ही बेशरम व गुलाम मंडळी मुकपणे त्याला साथ देत आहेत. ज्या महिलांना संविधानलाने मानाचे स्थान दिले, त्याच संविधानाला बदलवणाऱ्या सरकारला मदत करत आहेत.

अशा नमकहराम लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे? - भिमराव गांधले



 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 सफरनामा