कांठीवली भक्त निवासावरील कारवाईमुळे बंजारा समाजाचे संत आक्रमक
नवी मुंबई : नवी मुंबईतील उरण तालुक्यातील कांठीवली गावातील शक्तीपीठ परिसरात गोर बंजारा धर्मपीठातर्फे उभारण्यात येत असलेल्या भक्त निवास येथे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या आदेशावरून सिडकोचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी डॉ. सतीश महावरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामुळे बंजारा समाजाच्या संतांनी सिडकोच्या या हुकूमशाहीचा निषेध करत आता आक्रमक भूमिका स्विकारली आहे. गोर बंजारा धर्मपीठाने दिलेल्या माहितीनुसार, या तोडफोडीच्या प्रकरणी १०० साधुसंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडणार आहेत.
सिडकोने १२ मे २०२२ रोजी मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेला भक्त निवास बेकायदेशीर ठरवून तो पाडला. सिडकोने केलेल्या या कारवाईनंतर गोर बंजारा धर्मपीठाने पोहरगड-उमरी येथे धर्म परिषद बोलावली होती, त्यात संत समाजाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि या संदर्भात रणनीती ठरविण्याबाबतही चर्चा केली.
उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात बंजारा समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात असेल, तर ते निषेधार्ह आहे, तर बंजारा संत समाजाने याला उघडपणे विरोध करण्याची गरज असल्याचे संतांनी धर्म परिषदेत सांगितले. यासाठी विविध राजकीय पक्षांशी संलग्न असलेल्या बंजारा समाजातील लोकांनाही एकत्र यावे लागेल, याशिवाय बंजारा समाजाच्या सामाजिक संघटनांना एकत्र येऊन उघड विरोध करावा लागेल, असे आवाहन बंजारा समाजाच्या संतांनी केले.बंजारा धर्मपीठाने बोलावलेल्या धर्म परिषदेत सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सिडकोच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तर उद्धव ठाकरे सरकारने बंजारा समाजाला न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ठराव धर्मपीठ परिषदेत संमत करण्यात आला.