चित्रीकरणासाठी उद्यानात डेब्रिजचा भराव
नवी मुंबई --: नवी मुंबईतील सिबिडी सेक्टर १५ येथील उद्यानात चित्रीकरण साठी चक्क डेब्रिजचा भराव टाकण्यात आले होते. मात्र स्थानीक ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा ही घटना उद्यान विभागाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा चित्रीकरण बंद केल्याचा सोपस्कार पार पाडल्याचा आव उद्यान अधिकाऱ्यांनी आणला असून कारवाई साठी मात्र अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
उद्यानाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे. मात्र या उद्यानाची देखभाल करण्यात मनपा पुरती अपयशी ठरली आहे.आधीच उद्यांनांची दुरवस्था असताना या उद्यानात आता चित्रीकरण करण्यासाठी चक्क डेब्रिजचा भराव टाकल्याची घटना नुकतीच सिबिडी सेक्टर १५ येथे घडली आहे. या प्रकाराला स्थानीक ज्येष्ठ नागरिकांनी विरोध करत सदर बाब बेलापूर उद्यान विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र उद्यान विभागाने सदर चित्रीकरण बंद केले असे मोघम उत्तर दिले आहे. मात्र उद्यानात डेब्रिज टाकल्याप्रकरणी कुठलीच कारवाई केली नाही. तर अतिक्रमण विभागात विचारणा केली असता त्यांनी परिमंडळ एक कडे बोट दाखवले. नवी मुंबईत डेब्रिज टाकण्यास सक्त मनाई आहे. मात्र तरी देखील सीबीडी येथे उद्यानात डेब्रिजचा भराव टाकून चित्रीकरण करण्यात आले. आणि यावर कुठलीच कारवाई न करता उद्यान विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांनी चित्रीकरण बंद केल्याचा दावा केला आहे. वास्तविक सदर प्रकाराला तेथील स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी विरोध केल्यानंतर उद्यान विभाग जागे झाले होते.जेव्हा कारवाई बाबत विचारणा करण्यात आली तेव्हा मनपा अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने उद्यान विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
बेलापूर सीबीडी मध्ये चित्रीकरण साठी परवाना विभागाने परवानगी दिली होती.मात्र उद्यानात डेब्रिज टाकून चित्रीकरण केले जात असल्याची तक्रार येताच सदर चित्रीकरण बंद करून उद्यान पूर्ववत करून घेतले.
विजयकुमार कांबळे,
उद्यान अधीक्षक,परिमंडळ १,न.मु.म.पा.