मंत्री महोदयांच्या उपस्थितीत उरण बायपास रस्त्याचा लवकरच भूमी पूजन सोहळा
उरण : उरण शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय असणाऱ्या उरण बायपास रस्त्याच्या कामांचा शुभारंभ लवकरच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई सूनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.त्यासाठी सिडकोने जय्यत तयारी सुरू केली आहे. एकंदरीत उरणकराना वाहतूक कोंडीतून मुक्त करणाऱ्या उरण बायपास रस्त्यामुळे गोपाळ पाटील यांचे स्वप्न साकार होणार आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यात तालुक्यातील खेड्याचे व उरण शहराचे नागरीकरण ही झपाट्याने वाढत आहे.अशा वाढत्या नागरीकांच्या नागरी सुविधांची पूर्तता करणारी मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालये उरण शहरात असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची रेलचेल सुरू असते, त्यात शहरातील अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.अशा वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी उरण कोट नाका ते उरण पेन्शन पार्क पर्यंत बायपास रस्त्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी तत्काळीन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या कडे वारंवार पत्र व्यवहार करुन केली होती.
त्या अनुषंगाने तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सिडको, उरण नगर पालिका आणि संबंधित अधिकारी व गोपाल पाटील यांच्यात संयुक्तपणे बैठकीचे आयोजन ही केले होते. त्यावेळी सदर बायपास रस्त्याच्या जागेचे सर्वेक्षण करून तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा असे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिले. परंतु गेली अनेक वर्षे शासन, सिडको कडून निधी व निविदा मंजूर होऊनही प्रक्रिया आज गेली अनेक वर्षे उरण बायपास रस्त्याचे काम रेंगाळत पडले. त्यामुळे नागरीकांना, चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि उरण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण बायपास रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे यासाठी शासनस्तरावर वारंवार मागणी केली. या मागणीची दखल घेऊन उरण बायपास रस्त्याच्या कामासाठी सिडकोच्या माध्यमातून ४५ कोटीचा निधी मंजूर होऊन, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सदर बायपास रस्त्याच्या कामांचा टेंडर नवी मुंबई येथील एका नावाजलेल्या कंपनीला देण्यात आला असून लवकरच उरण बायपास रस्त्याचा भूमी पूजन सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई सुनिल तटकरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यासाठी सिडकोने जय्यत तयारी सुरू केली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.