कांदा बटाटा पुनर्विकासाच्या संकल्प चित्रामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
नवी मुंबई -: नवी मुंबई शहरात पुनर्विकासाचे वारे वाहू लागले असताना आता एपीएमसी बाजार आवारातील कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प आकार घेताना दिसत आहेआणि या पुनर्विकासाचे संकल्प चित्र व्यापाऱ्यांच्या हाती लागले असून यातील एक विंग गायब असल्याने याठिकाणी आपल्याला व्यापार करण्यासाठी जागा असेल की नाही या विवंचनेत येथील व्यापारी पडले आहेत. तर या विंग मधील व्यापाऱ्यांना काही ठराविक रक्कम देऊन बाहेर काढले जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात मार्केट परिसरात सुरू असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातारण पसरले आहे.
वाशीतील एपीएमसी कांदा बटाटा बाजार आवारातील इमारती या १९८२ ला सिडको ने बांधल्या आहेत. मात्र २००५ साली नवी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत आणि या ठिकाणी व्यवसाय करू नये अशा नोटीसा महापालिकातर्फे देण्यात येत आहेत. मात्र सदर व्यापाऱ्यांना संक्रमण शिबिराप्रमाणे एपीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केलेली नाही. सेक्टर १८ मध्ये प्रशासनामार्फत तात्पुरती जागा देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र त्याठिकाणी योग्य सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांनी त्या जागेला नापसंती दाखवली. तर प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे कांदा बटाटा इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. तर येथील इमारतींना धोकादायक इमारती जाहीर करण्यात आल्याने दरवर्षी महापालिका आणि एपीएमसी धोकादायक इमारती खाली करण्याच्या नोटीस पाठवत आहे. मात्र आता सदर मार्केटच्या पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे एक संकल्प चित्र तयार करण्यात आले आहे. आणि हे संकल्प चित्र व्यापाऱ्यांच्या हाती लागले आहे. मात्र या चित्रात येथील ४५ गाळे असेलेली एच नावाची विंगच गायब असल्याने या ठिकाणी भविष्यात आपल्याला व्यापार करण्यासाठी जागा असेल की नाही या विवंचनेत व्यापारी पडले आहेत. तर या विंग मधील व्यापाऱ्यांना काही ठरावीक रक्कम देऊन मार्केट बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात मार्केट वर्तुळात सुरू असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कांदा बटाटा पुनर्विकासाचे जे संकल्प चित्र आमच्या हाती लागले आहे. त्यात आमची एच विंग गायब आहे. त्यामुळे आमच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे की आमचे पुढे काय होईल? - मनोहर तोतलानी, कांदा बटाटा व्यापारी.
कांदा बटाटा पुनर्विकासाचे जे संकल्प चित्र व्हायरल होत आहे ते अधीकृत नसून कोणीतरी खोडसाळ पणा केला आहे. कारण पुनर्विकास दरम्यान एका विंग मधील ४५ गाळे कसे काय डावलता येतील. त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही. - राजीव मणियार, सचिव, कांदा बटाटा व्यापारी संघ
एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील पुनर्विकासाचे कुठलेही अधिकृत संकल्प चित्र एपीएमसी प्रशासनाने प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे एक विंग गायब असलेले जे संकल्प चित्र व्हायरल होत आहे त्याबाबत चौकशी केली जाईल. - मेहबूब व्यापारी, अभियंता, कांदा बटाटा मार्केट, एपीएमसी.