सायन्स पार्कची वैशिष्ट्यपूर्णता नजरेसमोर ठेवून कार्यवाहीचे आयुक्त यांचे निर्देश
21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारा सायन्स पार्क हा सेक्टर 19 नेरूळ येथील वंडर्स पार्क मध्ये उभारला जात असून तो पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र ठरणार आहे.
वंडर्स पार्कमधील मोकळ्या भागात 19500 चौ.मी.च्या बांधकाम क्षेत्रात सायन्स पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात असून त्याच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सद्यस्थितीत त्याठिकाणी प्लिंथ पर्यंतचे काम झाले असून कामाची पाहणी करताना मनुष्यबळात वाढ करुन कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. पावसाळी कालावधीत करता येऊ शकतील अशी कामे सुरुच ठेवावीत व नियोजित कालावधीत बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
या सायन्स पार्कमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान विविध मॉडेल्स, प्रकल्प, थ्रीडी इमेजेस, ऑडिओ–व्हिडिओ अशा विविध माध्यमांतून मांडले जाणार असून याव्दारे विज्ञानाची माहिती आकर्षित करेल अशा पध्दतीने साकारण्यात येणार आहे. याव्दारे शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असून नागरिकांसाठीही नाविन्यपूर्ण सुविधा मनोरंजक साधनांसह उपलब्ध होणार आहे.
सदर सायन्स पार्कमध्ये काय असणार आहे याचाही आराखडा बांधकाम सुरु असतानाच तयार करून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी असे निर्देशित करताना आयुक्तांनी सध्या तंत्रज्ञानामध्ये झापाट्याने बदल होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सद्यस्थितीत सर्वात नवीन व आधुनिक असणारे प्रकल्प याठिकाणी नागरिकांना अनुभवता येतील अशा प्रकारे सायन्स पार्क अद्ययावत राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
सायन्स पार्कमध्ये प्रदर्शित करण्यात येणा-या विविध बाबी, सुविधा, प्रकल्प उपलब्ध करून देताना भारतातील अशा प्रकारच्या सायन्स पार्कचा बारकाईने अभ्यास करावा व इतरत्र कुठेही पहायला मिळणार नाहीत असे आगळेवेगळे प्रकल्प, मॉडेल्स याठिकाणी उपलब्ध असतील अशाप्रकारे जागतिक पातळीवर शोध घ्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. महत्वाचे म्हणजे महानगरपालिका उपलब्ध करून देत असलेली ही अतिशय अत्याधुनिक सुविधा भविष्यात तितक्याच समर्थपणे सुरु राहण्यासाठी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक अंमलबजावणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमध्ये समाविष्ट निरनिराळी कामे एकाच वेळी कामे सुरु ठेवता येतील अशाप्रकारे विविध बाबींचे नियोजन करावे व विविध कामे समांतरपणे सुरु ठेवावीत आणि ती विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे व गिरीश गुमास्ते आणि इतर अभियंते उपस्थित होते.
नवी मुंबईतील आवर्जुन भेट द्यावी अशा वैशिष्ट्यपूर्ण स्थळांमध्ये यापुढील काळात सायन्स पार्क हे महत्वाचे ठिकाण असणार असून त्यादृष्टीने सायन्स पार्कची रचना व तेथे उपलब्ध प्रकल्प, मॉडेल्स अत्याधुनिक व अत्युत्तम असतील याची दक्षता घेण्याचे निर्देश देतानाच आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेली कामे गुणात्मकदृष्ट्या उत्तम असणे हे तेथील अभियंत्यांचे मुख्य कर्तव्य असून कामाची गुणवत्ता राखतानाच काम विहीत वेळेत पूर्ण होण्याचीही काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी अभियांत्रिकी विभागास दिले.