उरणकरानो आंबे घेताय सावधान ? 

  उरण : उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. सिडकोच्या माध्यमांतून हाती आलेला गडगंज पैसा व परप्रांतीयानी गजबजून गेलेले द्रोणागिरी शहर त्यामुळे या ठिकाणी पडणाऱ्या पैश्याच्या पावसाचा फायदा उचलीत कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे विक्रिते बेमालूमपणे आंब्याची विक्री करतात आणि ग्राहकांनी खरेदी केलेला आंबा हा घरी गेल्यावर कापून पहिला की 1 डझन आंब्यांतील कमीतकमी तीन ते चार आंबे हे जाळीदार असल्याचे निष्पन्न होत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. 

काही विक्रेते हे आपण आंब्याची बागच विकत घेतल्याचे भासवून चक्क नवी मुंबई वाशीच्या फळबाजारांतून आणलेल्या पेट्यांतील आंबा हा आपल्याच बागेंतील असल्याचे भासवून चढ्या भावात विक्री करतात, आणि उरणच्या बाजार पेठेत अलिबाग-रेवस कडून येणारा आंबाही आपल्याच घरातील परसबागेंतील आंबा असल्याचे भासवित विक्री करण्यात येतो परंतु प्रत्यक्षात हा आंबा त्यांनी साठेवाल्यानकडून विकत घेतलेला असतो. मात्र यामध्ये काही आंबे विक्रेते हे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आंबा विकण्याचा व्यवसायही उरणच्या बाजारपेठेत करीत आहेत.

 उरणच्या बाजारपेठेत बहुतांशी येणारा आंबा हा नवी मुंबई वाशीच्या फळ बाजारांतील येणाऱ्या पेटी मधील आंबा आहे. हा वाशी बाजारात कोकणातील विविध भागामधून येत असून वाशी बाजारात येताच घाऊक विक्रेते बेमालूमपणे यांतील आंब्याची हेराफेरी करून पेटीचे पॅकिंग व्यवस्थितपणे करून उरण सारख्या बाजारपेठेत पाठवून देतात, आंबे तपासून घेण्याचे कोणतेही प्रमाण नसल्याने ते प्रत्यक्षात तपासून घेता येत नाहीत, त्यामुळे आंबे डझनाला 500 ते 600 रुपये इतका चढा भाव देऊनही घरी घेऊन गेलेल्या 1 डझन आंब्यातून सुमारे 3 ते 4 आंबे आतून जाळीदार झालेले निघतात व ते खाण्यास अयोग्य असतात त्यामुळे ग्राहकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.

       अलिबाग-रेवस कडून आलेल्या आंब्यांबाबत तर न बोलणेच योग्य आहे. कधीकधी कोवळे आंबे अडीत टाकून पिकविलेले असतात तर कधी पडलेले आंबेहि अडीत टाकून विक्रीस आणले जात आहेत त्यामुळे आंब्यांना चढा भाव देऊनही ग्राहकांची हमखास फसवणूक होत आहे. आंबे कापल्यानंतर आत मध्ये तो जाळीदार निघाला आणि तो आंबा ग्राहक परत घेऊन गेल्यास आम्ही काय आंब्यात शिरून पहिले होते,असे उद्धटपणाचे विक्रेत्याचे उत्तर हमखास ऐकून घ्यावे लागते, परंतु तुम्ही खरोखरच चांगले आंबे निवडणार असाल तर त्याला कोणतेही प्रमाण नसले तरी मात्र बालदीभर पाण्यात आंबे टाकले तर त्यांतील जे आंबे पाण्यावर तरंगतील ते आतून हमखास जाळीदार अथवा खराब असतील आणि जे आंबे पाण्याच्या तळाला खाली जावून बसतील ते चांगले व खाण्यास योग्य आहेत असे समजावे सध्यातरी हेच तपासणीचे प्रमाणसिद्ध झाले आहे. तरी तुम्ही खात असणारा पिकलेला हापूस आंबा आत मध्ये जाळीदार तर नाही ! खात्री करून पहा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये सिडकोकडून पाणथळ जागेत भराव - पर्यावरण प्रेमी नाराज