बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ तसेच वंडर्स पार्कमधील कामाला गती देण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
नवी मुंबई: नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरु असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. आज आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स पार्क, सेक्टर 19 नेरूळ येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
सेक्टर 15 बेलापूर येथील भूखंड क्रमांक 39 याठिकाणी 4 मजली बहुमजली वाहनतळ विकसित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 3 स्लॅबचे काम पूर्ण झाले असून आयुक्तांनी संपूर्ण बांधकामाची बारकाईने पाहणी केली. या भागामध्ये महावितरणाचे सबस्टेशन असल्याने इमारतीच्या आराखड्यामध्ये काहीसा बदल करण्याची गरज भासली आणि वाहनतळ आराखड्यात तशा प्रकारचा बदल करूनच कामाला सुरूवात करण्यात आल्याची माहिती यावेळी आयुक्तांना देण्यात आली. वाहनतळाच्या पाहणीअंती आयुक्तांनी जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल अशा दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत पावसाचे पाणी आत येऊ नये याची काळजी घेण्याच्या तसेच आतील भागात पुरेशा प्रमाणात नैसर्गिक प्रकाश राहील यादृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.
सदर वाहनतळामध्ये प्रवेश करण्यासाठी कै. नागा गणा पाटील उद्यानासमोरून पूर्व दिशेने प्रवेशव्दार असून पश्चिमेच्या दिशेने वाहने बाहेर जाण्याचे प्रवेशव्दार आहे. या 4 मजली बहुमजली वाहनतळात 476 चारचाकी वाहने व 121 दुचाकी वाहने पार्कींग करण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे. आगामी काळात इलेक्ट्रीकल वाहनांची संख्या वाढणार आहे हे लक्षात घेऊन याठिकाणी चार्जींग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.
त्याचप्रमाणे सेक्टर 19 नेरूळ येथील वंडर्स पार्क हे नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईला भेटी देणा-या इतर शहरांतील नागरिकांचे व पर्यटकांचेही आकर्षण केंद्र असून त्याच्या नुतनीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अत्याधुनिक खेळणी (राईड्स) व्यवस्थितरित्या बसविली जातील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले. त्याचप्रमाणे सदर राईड्सवर खेळणा-या नागरिकांची सुरक्षा राखली जाण्याच्या दृष्टीनेही संपूर्ण खबरदारी घेतली जावी याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित केले. वंडर्स पार्क हे अत्यंत लोकप्रिय असे मनोरंजनाचे ठिकाण असून तेथील प्रत्येक सुविधा ही त्या दर्जाची राहील याची विशेष काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, गिरीश गुमास्ते, बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त मिताली संचेती आणि इतर अभियंते उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेली कामे गुणात्मकदृष्ट्या उत्तम असणे हे तेथील अभियंत्यांचे मुख्य कर्तव्य असून कामाची गुणवत्ता राखतानाच काम विहीत वेळेत पूर्ण होण्याचीही काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले.