नवी मुंबईतील माहिती भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हस्तांतरण
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे सिडकोच्या वतीने उभारण्यात आलेल्या माहिती भवन इमारतीच्या हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईतील नेरुळ येथे सिडकोच्या वतीने सुमारे 6 हजार 883 चौरस फुट क्षेत्रफळाच्या जागेत माहिती भवन उभारण्यात आले आहे. तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या माहिती भवनमध्ये कॉन्फरन्स रुम, कार्यालये, बहुद्देशीय सभागृह, अतिथी कक्ष, प्रतिक्षा कक्ष, स्वयंपाकघर, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या माहिती भवनचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला हस्तांतर करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांच्यात माहिती भवन सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे माहिती भवन प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच दैनिक सामनाचा काही काळ संपादक असल्यामुळे राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे पत्रकारितेशी आपले कायम ऋणानुबंध असल्याचे स्पष्ट केले. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात, त्या बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करतानाच माहिती भवनची संकल्पना महत्त्वपूर्ण असून येथे सुरु करायच्या उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सदर माहिती भवनमध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच महासंचालनालयाकडे असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करुन डिजिटल ग्रंथालय सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी या माहिती भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या मनोगतात सिडकोची ही इमारत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता ही इमारत प्रत्यक्ष हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांचेसह माहिती व जनसंपर्कचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.