ओवेगाव पोलीस चौकी सुरू
खारघर : खारघर सेक्टर 30 येथील बंद असलेल्या ओवेगाव पोलीस चौकी सुरू करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर सेक्टर तीस ते चाळीस परिसर हा भाग खारघर पोलीस ठाणे पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. परिसरातील काही समस्या असल्यास राहिवासीयांना पोलीस ठाणे गाठावे लागत असे, खारघर पोलिसांनी सेक्टर तीस परिसरात पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी राहिवासीयांनी केली होती. राहिवासीयांची मागणी लक्षात घेवून खारघर पोलिसांकडून पाच वर्षांपूर्वी ओवेगाव पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पोलीस चौकीची दुरवस्था झाल्याने चौकी बंद करण्यात आली होती. पोलिस चौकीची दुरवस्था झाल्यामुळे चौकी बंद असल्याची माहिती मिळताच खारघर तळोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या वतीने सदर पोलीस चौकीचे नुतनीकरण करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते सोमवार ता. 23 रोजी बंद असलेली पोलीस चौकी सुरू करण्यात आली. दोन वर्षानंतर ओवे पोलीस चौकी सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. विमल बिडवे म्हणल्या सदर चौकीची दुरवस्था झाल्यामुळे बंद होती. सोमवारी चौकी सुरू करण्यात आली असून या ठिकाणी पोलीस तैनात असणार आहे.