महापालिका घणसोली विभाग कार्यालय ऍक्शन मोड मध्ये

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभाग ऍक्शन मोड मध्ये आला असून, या कार्यालयातर्फे मागील आठवड्यात चार अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अवैध बांधकामांवर कारवाईचा बडगा सातत्याने उगारला जाणार आहे, असे अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घणसोली मध्ये कार्यरत भूमाफियांचे धाबे कमालीचे दणाणले आहेत.

महापालिका घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रातील रबाळे, तळवली, गोठिवली आणि घणसोली गाव परिसरात अवैध बांधकामे चालू आहेत. परंतु, अवैध बांधकामांच्या शेजारी इतर घरांची दाटीवाटी असल्याने अतिक्रमण विभागाला कारवाई करण्यास प्रतिबंध येत आहेत. तसेच महापालिकाकडे अद्ययावत तोडकाम करणाऱ्या यंत्रणेचा अभाव असल्याने त्याचा फायदा भूमाफिया घेत असून, अवैध बांधकामे करत आहेत. आता या बेकायदा बांधकामांना  घणसोली अतिक्रमण विभागाने लक्ष्य केले असून, 'जैसे थे' परिस्थिती मध्ये अवैध बांधकामांवर तोडक कारवाईचा सिलसिला सुरु केला आहे.

घणसोली विभाग कार्यालयाने कारवाई करायची असलेल्या ५० अवैध बांधकामांची यादी तयार केली आहे. या बांधकाम धारकांना  कायदेशीर नोटीसा दिल्या आहेत. त्या नोटिसीचा कालावधी संपल्यावर गेल्या आठवड्यात चार अवैध बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. यापुढेही बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई नियोजनबद्ध आणि पोलिसांच्या  संरक्षणात केली जाणार आहे, अशी माहिती घणसोली विभाग कार्यालयातील अभियंता रोहित ठाकरे यांनी दिली. 

कोट

नवी मुंबई महापालिका  आयुक्त अभिजीत बांगर, उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या आदेशाने महापालिका घणसोली विभाग कार्यालय तर्फे सातत्याने अवैध बांधकामांवर नेहमीच कारवाई करण्यात येते. यापुढेही नियोजनपूर्वक अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.  - रोहित ठाकरे, अभियंता - नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन