मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागणार
उरण : मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील जलवाहतुकीच्या प्रवासी तिकीट दरात २६ मे पासून पावसाळी हंगामासाठी १५ रुपयांची वाढ करण्यात येणार असून पावसाळी हंगामासाठी दरवाढ होणार असल्याने सागरी प्रवास ९० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत महागणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात भरमसाट वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात ७५ रुपयांवरून ९० रुपयांपर्यंत अशी १५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात ९० रुपयांवरून थेट १०५ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. अर्ध्या तिकीट दरातही वाढ केली जाणार आहे. ही पावसाळी हंगामासाठीची तिकीट दरवाढ २६ मे पासूनच लागू करण्यात येणार असली तरी तिकीट दरवाढीची मंजुरी मेरिटाइम बोर्डाकडून २०२१ मध्येच घेण्यात आल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रभाकर पवार यांनी दिली.
कधी इंधन वाढीचे, तर कधी पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ केली जाते. हीच दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते. त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकीट दरवाढ केली जाते. या तिकीट दरवाढीवर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे २०२३ सालच्या पावसाळी हंगामात तिकीट दरवाढ १२० ते १२५ रुपयांपर्यंत पोहचल्यास आश्चर्य वाटणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.