महापालिका तर्फे घणसोली समर्थ नगर मध्ये सुरु नागरी कामे अर्धवट
नवी मुंबई : घणसोली परिसरातील समर्थ नगर परिसरात नवी मुंबई महापालिकेकडून नागरी विकास कामे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु, त्या कामांना गती मिळाली नाही. त्यामुळे आता ती कामे अर्धवट स्वरुपात आहेत. परिणामी येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून तळे होणार आहे. याविरोधात 'माणुसकी युवा ग्रुप'चे अध्यक्ष सचिन शेलार उद्या २३ मे रोजी घणसोली गावातील समर्थ नगर मध्ये अन्नत्याग उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे निवेदन सचिन शेलार यांनी महापालिका घणसोली विभाग कार्यालयात दिले आहे.
घणसोली गावातील समर्थ नगर परिसरात रस्ता आणि गटारांच्या कामास साधारणतः तीन महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली. परंतु, कामास सुरुवात केल्यानंतर आता काम थांबविण्यात आले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कामांच्या संदर्भात कोणतीही माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही, असे सचिन शेलार यांनी महापालिका घणसोली विभाग कार्यालयात दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
नागरी कामे अर्धवट ठेवल्याने पावसाळ्यात समर्थ नगर मधील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच त्रासाचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय समर्थ नगर परिसरात बिकट परिस्थिती उद्भवणार आहे. त्यामुळे समर्थ नगर परिसरात महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या अर्धवट रस्ता आणि गटार कामांच्या विरोधात समर्थ नगर मध्येच उद्या २३ मे रोजी सकाळपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहे, असे उपोषणकर्ते सचिन शेलार यांनी सांगितले.